रुग्ण अन् नातेवाईकांच्या रोषाला बळी पडतात वैद्यकीय अधिकारी
प्रतिनिधी | राजेंद्र जैन | कडा
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोरोना पथकाच्या रुग्णवाहीकेला तीन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता, तेंव्हापासून आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका कायम दुरुस्तीच्या असून रुग्णांच्या अडचणीत भर पडली आहे. सरकारी रुग्णवाहीकेअभावी येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला नाहक बळी पडावे लागत आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहराकडून गावी येणा-या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करुन परतणा-या कडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोविड-१९ पथकाच्या रुग्णवाहीकेला तीन महिन्यापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. तेंव्हापासून दवाखान्याच्या नादुरुस्त झालेल्या रुग्णवाहीकेची आरोग्य विभागाकडून अद्यापपर्यंत दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाही.
त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ येणा-या रुग्णांसह नातेवाईकांची सरकारी रुग्णवाहीकेअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे. तर रुग्णवाहीका नसल्यामुळे वैद्यकीय अधिका-यांसह आरोग्य कर्मचा-यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तीन महिन्यापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेली रुग्णवाहिका तात्काळ दुरुस्त रुग्णांची हेळसांड थांबवावी. अशी मागणी कडा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
१०८ रुग्णवाहीका नावालाच ?
रुग्णांच्या सेवेसाठी शासनाने उपलब्ल करुन दिलेली १०८ क्रमांक असलेली शासकीय रुग्णवाहिका केवळ नावापुर्तीच आहे की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अपघातानंतर फोन केल्यावर ही रुग्णवाहीका कधीच वेळेवर उपलब्ध होत नाही. त्या रुग्णवाहिकेत कधी चालक तर कधी डाॅक्टर हजर नसतात. त्यामुळे रुग्णांची हेळसांड आता नित्याचीच झाली आहे.