Editorial : ठोशास ठोसा

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 30 जून

चीनचा आक्रमकता संपूर्ण जगाला माहीत आहे. चीनच्या फाईव्ह फिंगर धोरणाची वाच्यता तैवानच्या अध्यक्षांनी केली आणि भारताला सावध राहण्याचा इशारा दिला. भारतालाही त्याची माहिती  आहे. चीनच्या सैनिकांची संख्या आणि अत्याधुनिक युद्ध सामुग्री जास्त असली, तरी चीनचे सैन्य भारताच्या सीमेवर आणण्याची क्षमता कमी आहे. भारतीय सैनिक युद्धात चिनी सैनिकांपेक्षा जास्त तरबेज आहेत. चीनला ही ते माहीत आहे. त्यामुळेच तर आता चीन पूर्व लडाखमध्ये चीनने सुमारे ४० हजार सैनिक तैनात केले असताना भारताने त्याहून अधिक सैनिक तैनात केले आहेत.

अवाक्स नावाची क्षेपणास्त्रभेदक यंत्रणा बसविली आहे. माऊंटेनर्स ग्रुपवर भारतीय सीमांच्या रक्षणाची जबाबदारी दिली आहे. गलवान खो-यात चिनी सैनिकांनी भारताच्या सैनिकांवर हल्ले केले. त्यात भारताचे वीस जवानांना वीरमरण आले. चिनी कमांडरचा मृत्यू झाला. गेल्या १५ दिवसांत चीनने त्यांचे किती सैनिक ठार झाले, हे सांगितलेले नाही. चीन तेथील नागरिकांपासून ही माहिती लपवून ठेवली. त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबात अस्वस्थता आहे. भारतीय सैनिकांनीच त्यांच्या सैनिकांचे १६ मृतदेह ताब्यात दिले. असे असताना अजूनही सैनिकांच्या हाैतात्म्याबद्दल चीनमध्ये काहीही चर्चा नाही. सैनिकांचे कुटुंबीयांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली असताना सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही.

एकीकडे गलवान खो-यात भारताने अगोदर आगळीक केली म्हणायची आणि दुसरीकडे आता चीनच्या संरक्षणविषयक वृत्तपत्राने आणि सरकारी माध्यमांनीच चीनच्या आगळिकीच्या आणि त्यांनी केलेल्या अमानवी कृत्यांचा भांडाफोड केला आहे. भारताविरोधात दहशत निर्माण करण्यासाठी हे केले जात असले आणि त्यांची संरक्षणसिद्धता किती आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्यामुळे चीन तोंडघशी पडला आहे. भारत आणि चीन यांच्यात गोळ्या चालवायच्या नाहीत, असा करार झाला असताना चिनी सैनिकांच्या कूपमध्ये लोखंडी गज आणि धारदार शस्त्रे होती, हा भारताने केलेला आरोप आता चिनी माध्यमांनीच खरा असल्याचे स्पष्ट  केले आहे. त्यामुळे चीनचा आणखी मुखभंग झाला आहे. पूर्व लडाखमधील गलवान खो-यात भारताने चिनी सैन्यावर हल्ला केला, असा कांगावा करून भारताला जगात एकाकी पाडण्याचा चीनचा प्रयत्न होता; परंतु भारताने तो उधळून लावला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा हा कट पूर्वनियोजित होता, असे स्पष्टपणे सांगितले. त्याचे पुरावेही आता हळूहळू पुढे येत आहेत. चिनी सैन्याने लोखंडी गजाने भारतीय जवानांवर हल्ला केला. चीनने 15 जून रोजी गलवान खो-यातील चकमकीच्या आधी आपल्या सैन्याला प्रशिक्षित करण्यासाठी मार्शल आर्टिस्ट आणि तज्ज्ञ पर्वतारोहक पाठविले होते. यात तिबेटमधील मार्शल आर्ट क्लबमधील सैनिकांचा समावेश होता.

चीनच्या सरकारी माध्यमांनी आपल्या अहवालात असे म्हटले आहे, की चिनी सैनिकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी अगोदरच पावले उचलली होती. चीनचे अधिकृत सैन्य वृत्तपत्र ‘चायना नॅशनल डिफेन्स न्यूज’ च्या वृत्तानुसार, चीनने तिबेटची राजधानी ल्हासामध्ये पाच लष्करी विभाग तैनात केले. यामध्ये माउंट एव्हरेस्ट टॉर्च रिले टीमचे माजी सैनिक आणि मार्शल आर्ट क्लब सेनानींचा समावेश होता. माउंट एव्हरेस्ट टॉर्च रिले टीमचे सदस्य पर्वतीय भागात लष्करी कारवाई करण्यात तरबेज असतात. त्यांच्या हालचाली गतिमान असतात. मार्शल आर्टिस्ट धोकादायक सैनिक असतात. जवानांना चपळ आणि प्रशिक्षित बनवण्यासाठी त्यांना तैनात केले होते.

मिलिशिया विभाग हा चीनच्या सैन्याचा अधिकृत विभाग नाही. त्याचा उल्लेख फाईट क्लब  असा केला जातो. त्यांना लडाखमध्ये पाठविल्याने सैन्यांची संख्या आणि वेगाने प्रतिकार करण्याची क्षमता वाढली. गलवान खो-यात संघर्ष झाल्यापासून चिनी माध्यमे लष्करी कवायतीच्या बातम्या मोठया संख्येने प्रकाशित करीत आहेत. सैन्याची जमवाजमव, लष्कर सिद्धता, नवे तंत्रज्ञान आदींची माहिती त्यात असते. तिबेटमधील चिनी सैन्याचे सराव माध्यमांमध्ये आक्रमक पद्धतीने दाखवले जात आहेत. 1996 आणि 2005 च्या करारामुळे सैनिक शस्त्रे वापरू शकत नव्हते. हे चीनला माहीत असल्यानेच त्याने आपल्या सैनिकांना मार्शल आर्टसद्वारे प्रशिक्षण दिले. सध्या चिनी लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्स प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) फिरतात. चीनमधील या हालचाली नियंत्रण रेषेच्या दहा किलोमीटर परिसरात सुरू आहेत. अशा परिस्थितीत भारताने आता पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) आपल्या भाषेत उत्तर देण्याची तयारी दर्शविली आहे.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलएसीवर चीनच्या लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा मागोवा घेण्यासाठी सैन्याने पूर्वेकडील लडाखमध्ये ‘आकाश’ अ‍ॅडव्हान्स हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला चीनच्या प्रत्येक गोष्टीवर सहज नजर ठेवता येते. अशा परिस्थितीत चिनी विमानाने एलएसी ओलांडली, तर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा त्वरित नष्ट करेल. त्यामुळे चीननेही केवळ जमवाजमव करून दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. पूर्वेकडील लडाखच्या गलवानमधील कठोर परिस्थितीत आमचे जवान उंच पर्वतीय भागातील आव्हानांच्या दरम्यान प्रत्येक शत्रूचा पराभव करण्यास सक्षम आहेत. तीव्र विचारांच्या बळावर भारतीय सैन्याने कडक हवामान आणि वादळ, वारा यांच्या दरम्यान जगाच्या सर्वोच्च शिखरावरील शत्रूला नामोहरम करण्याची कला आत्मसात केली आहे.

सियाचीन हे जगातील सर्वांत उंचावरचे रणांगण आहे. १९६२ नंतर १९८४ मध्ये तेथे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारतीय वायुसेनाला माउंटन वॉरफेअरमधील जगातील सर्वात अनुभवी सैन्यापैकी एक बनवले. कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून ते दाखवून दिले. पाकिस्तानी सैन्य पर्वतांवर उंचावर असताना द्रास क्षेत्रात खालून लढा देताना  दुसरीकडे मोठया दरीच्या दुस-या बाजूने बोफोर्स तोफा चढवून पाकिस्तानी लष्कराचे कितीतरी जवान मारले. त्यांचा निप्पात केला. शिवाय त्यांच्याकडील लष्करी साहित्यही जप्त केले. आता तेथे मोठे विजय स्मारक आहे. आता पूर्व लडाखमधील गलवानमध्ये भारतीय सैन्याला उंचीवर बसलेल्या शत्रूला कसे पराभूत करायचे, याची चांगली कल्पना आहे. चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षामुळे सरकार आता सीमेवरील दळणवळणाची यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रक्त गोठवणारी थंडी, बर्फाळ वारा, खाली सरळ शिखरे. चौदा हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवर कमी ऑक्सिजन अशा प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची भारतीय सैनिकांत क्षमता आहे. लढणे तर दूरच आहे. अशा परिस्थितीत जिवंत राहणे हे एक मोठे आव्हान असते; परंतु अशा परिस्थितीतही भारतीय सैन्य लढण्यास सज्ज असते.

गलवान येथे भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांनी उंचावरून दगडफेक केली. शत्रू प्रत्येक हालचाली उंचावरून पाहू शकतो. अशा परिस्थितीत लढण्यासाठी विशेष प्रशिक्षित सैनिक असणे आवश्यक आहे. जवान शस्त्रास्त्रांसह खाद्यपदार्थही घेऊन जातात. जवानाला पर्वतावर चढताना 30-30 किलो वजन वाहून न्यावे लागते. कमी ऑक्सिजनमुळे वजन उचलणे खूपच कठीण आहे. उंच डोंगराळ भागात लढाई करण्यासाठी सैन्य नियमितपणे आपल्या सैनिकांना तयार करते. काश्मीरच्या गुलमर्गमध्ये नऊ हजार फूट उंचीवर असलेल्या हाय अल्टिट्यूड माउंटन वॉरफेअर स्कूलमध्ये बर्फाचे योद्धे तयार केले जातात. येथे सैनिकांना बर्फीली भागात शून्यापेक्षा कमी तापमानात लढा देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सियाचीनसारख्या भागात हिमस्खलन आणि इतर हिम आव्हानांचा सामना कसा करावा आणि त्याचे संरक्षण कसे करावे हेदेखील त्यांना शिकवले जाते. सियाचीनच्या वीस हजार फूट उंचीवर सैनिक थेट पाठवले जात नाहीत.

सियाचीन बेस कॅम्पमध्ये त्यांना थोड्या काळासाठी ठेवून प्रथम ते अनुकूल केले गेले, त्यानंतर त्यांना सियाचीन ग्लेशियरकडे पाठविले जाते. सैनिकी वाहने, मशीन्स, जनरेटरमध्ये वापरलेले डिझेलही गोठण्यास सुरवात होते. ते वितळविण्यासाठी पातळ आणि इतर रसायने आवश्यक आहे. संप्रेषण उपकरणांमध्ये वापरल्या गेलेल्या बॅटरीदेखील कालबाह्य झाल्या आहेत. मैदानामध्ये 24 तास टिकणा-या बॅटरी उंच डोंगराळ भागात एक किंवा दोन तासांत संपतात. नाइट व्हिजन, थर्मल इमेजर सारखी अनेक उपकरणे शून्यापेक्षा कमी तापमानात योग्यप्रकारे कार्य करत नाहीत. या सर्व परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा, याचे प्रशिक्षण भारतीय सैनिकांना दिलेले असते, म्हणूनच लडाख स्काऊट्स सैनिकांना बर्फावरचे चित्ते मानते. भारतीय सैनिकांचे मोठे ध्येय त्यांना उंच डोंगरावरील युद्धासाठी सज्ज ठेवले जाते. गलवानमध्ये चीनसमोर उभे असलेले सैनिक कठीण परिस्थितीत लढा देण्यास तरबेज आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीचा हा परिणाम आहे. हे प्रोत्साहन त्याला उणे 35 अंश तापमानात रात्रीच्या अंधारात पंधराशे फूट उंच बर्फाच्या भिंतीवर चढून शत्रूचा नाश करण्यासाठी प्रेरणा देते. ही परिस्थिती लक्षात घेऊनच तर भारतीय माऊंटेनर्सना तिथे तैनात केले आहे. त्यामुळे चीन धास्तावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here