Editorial : पेरिले ते उगवते

0

राष्ट्र सह्याद्री 1 जुलै

संत रामदास स्वामी यांनी जीवनाचे सार काही शब्दांत सांगितले आहे. त्यांचा दासबोध आपल्याला छोटया छोटया पंक्तीतून मोठा आशय देऊन जातो. ते म्हणतात,
‘कठिण शब्दे वाईट वाटते,
हे तो प्रत्ययास येते,
तर मग वाईट बोलावे ते,
काय निमित्य?
पेरिले ते उगवते,
बोलण्यासारिखे उत्तर येते,
तरी मग कर्कश बोलावे ते,
काय निमित्य?’

या पंक्ती आपल्या केवळ बोलण्यालाच नाही, तर वागण्यालाही लागू होतात. करावे तसे भरावे, या म्हणीप्रमाणेच त्यांचा अर्थ आहे. पाकिस्तानला आता तो लागू होतो. दहशतवादाचे बीज पेरले, तर त्याला चांगली फळे येणारच नाहीत. दहशतवाद्यांत चांगले आणि वाईट असे भेद केले, की त्याचाही परिणाम भोगावा लागतो. भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी मुंबईसह देशभरात बाँबस्फोट घडवून आणण्यात पाकिस्तानचा हात होता. मुंबई शेअर बाजाराजवळ असे स्फोट घडवून आणण्यात आले होते. त्याला नुकतीच आता २७ वर्षे झाली. ज्या पाकिस्तानने हे घडवून आणले होते, त्यांना आता कराची येथील शेअर बाजारात स्फोटाने उत्तर मिळाले आहे.

अर्थात हा स्फोट घडवून आणण्यामागे पाकिस्तानातील अंतर्गत कारणे जबाबदार आहेत. कराची स्टॉक एक्सचेंज हे पाकिस्तानमधील सर्वांत मोठे स्टॉक मार्केट आहे. कराचीच्या सर्वांत व्यग्र महामार्गाच्या कोपऱ्यावर ही इमारत आहे. त्याचबरोबर या भागात पोलिस मुख्यालय, बॅंक, वाहिन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे हा भाग गजबजलेला असतो. कराची शेअर बाजार हल्ल्यामागे बलुचिस्तानवादी संघटनेचा हात असल्याची चर्चा होती. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने त्याची जवाबदारी स्वीकारली आहे.

भारताचा दहशतवादी कृत्याशी संबंध नसला, तरी पाकिस्तान मात्र तसा आरोप करू शकते. त्याचे कारण यापूर्वीही पाकिस्तानने भारताच्या ‘राॅ’ या गुप्तचर संघटनेचा बलुची दहशतवाद्यांना पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. त्यातही चीनने चीन-पाकिस्तान इकाॅनाॅमी काॅरिडाॅर सुरू केला. त्यावेळीही बलुचिस्तानातील नागरिकांनी त्याला विरोध केला होता. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या प्रमाणात छळ, अत्याचार केले जातात. त्यामुळे या प्रातांची स्वतंत्र देशाची मागणी असून भारताने त्यासाठी मदत करावी, असे जाहीर आवाहन तेथील नेत्यांनी केले होते. खान अब्दूल गफारखान यांना त्या प्रांताचे सरहद्द गांधी असे म्हटले जात होते. सुरुवातीपासून भारताचे बलुचिस्तानशी चांगले संबंध असून या प्रातांने कायम पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बलुच प्रातांतील फुटीरतावादी, बंडखोरांविरोधात पाकिस्तान लष्कराची मोहीम सुरू आहे. यामध्ये काही निष्पाप नागरिकांनाही गोवण्यात आला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. एका मोहिमेच्या दरम्यान नागरिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना पळ काढावा लागला होता. त्यातून पाकिस्तानी लष्कराविरोधात तिथे आंदोलने सुरू असतात. मागे एकदा तर थेट इस्लामाबादवर हल्ला करण्याचा इशारा बंडखोर बलुची नेत्यांनी दिला होता. भारतात जे स्थान मुंबईला आहे, तेच स्थान पाकिस्तानात कराचीला आहे. कराची ही पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे या आर्थिक केंद्रावरच बलुची दहशतवाद्यांननी हल्ला केला. हा हल्ला आत्मघाती होता. त्यात चार दहशतवाद्यांचा मृत्यू झाला, तर एक दहशतवादी चकमकीत मारला गेला.

पोलिस अधिका-यासह सुरक्षा रक्षकही ठार झाले. सुरुवातीच्या वृत्तानुसार हल्लेखोर पार्किंग लॉटमधून इमारतीमध्ये घुसले आणि त्यांनी रस्ता मोकळा व्हावा म्हणून हॅंडग्रेनेड फेकले. सोमवारी सकाळी दहा वाजता चार हल्लेखोरांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे. माजिद ब्रिगेडने हे कृत्य केले आहे.  हल्लेखोर सिल्वर कलरच्या कोरोला कारमध्ये आले. त्यांना पोलिसांनी तिथेच थांबवले. दोन हल्लेखोरांना पोलिसांनी गेटवरच ठार केले; पण नंतर दोन हल्लेखोर आतमध्ये घुसले आणि त्यांनाही नंतर ठार करण्यात आले असे सांगितले जात असले, तरी या माहितीतही ही विसंगती आहे. एका मुलाखतीत हल्लेखोर ट्रेडिंग हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला, असे सांगण्यात आले. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट मोडून काढल्याचे पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. पोलिसांनी वेळेवर कारवाई केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळे इमारतीमध्ये असलेल्या अनेकांचे प्राण वाचले. पाकिस्तान सरकारने दहशतवादाविरोधात जी कठोर पावले उचलली आहेत, ती कशी तकलादू आहेत, हे दाखवून देणे हाच या या हल्ल्याचा उद्देश असावा.

बलुचिस्तानवादी चळवळीने १९७० च्या दशकात जोर पकडला होता. १९४७ ते १९५५ दरम्यान पाकिस्तान सरकारविरोधात बलुचिस्तानवादी चळवळीने संघर्ष केला होता. त्या चळवळीची पार्श्वभूमी या १९७० च्या दशकात सुरू झालेल्या बलुच चळवळीला होती. त्यावेळी बलुच विद्यार्थी संघटना व इतर काही बलूच संघटना सक्रिय झाल्या होत्या. पाकिस्तानमध्ये त्याकाळी झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार होते. पाकिस्तानकडून बलुच नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारामुळे या संघटनेची वाढ होत गेली. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी पाकिस्तानसह परदेशातही बलुच नागरिकांकडून आंदोलन केले जाते.

पाकिस्तानपासून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारी जहाल संघटना म्हणून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ओळखली जाते. ही संघटना २००० मध्ये स्थापन झाली होती. या संघटनेने पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.  २००० मध्ये या संघटनेने साखळी बॉम्बस्फोट केले होते. त्यानंतर या संघटनेची अधिकच चर्चा झाली. कराची शेअर बाजारावर झालेल्या हल्ल्याची जवाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे. स्वतंत्र बलुचिस्तान चळवळ १९७० च्या दशकात पुन्हा एकदा सुरू झाली होती. त्या वेळी पाकिस्तानमध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार होते. पाकिस्तानकडून मिळत असलेली भेदभावाची वागणूक, सरकारकडून होणारा छळ यामुळे बलुच राष्ट्रवादी संघटनांना बळ मिळाले. बलुचिस्तान प्रातांत या संघटनेने पाकिस्तान सरकारच्या नाकी नऊ आणले होते. पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख झिया उल हक सत्तेवर आल्यानंतर त्यांनी बलुच नेत्यांशी चर्चा करत अघोषित शस्त्रसंधी केली.

या संघटनेत मुख्यत: मिरी आणि बुगती या जमातीतील लढाऊ तरुणांचा समावेश आहे. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ सत्तेवर येईपर्यंतच्या काळात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या विशेष कारवाया झाल्या नव्हत्या. मुशर्रफ यांनी पाकिस्तानची सत्ता हस्तगत केल्यानंतर २००० मध्ये बलुचिस्तान उच्च  न्यायालयाचे न्यायाधीश नवाब मिरी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने या हत्येप्रकरणी बलुच नेते खेर बक्श मिरी यांना अटक केली. त्यानंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आपल्या कारवाया पुन्हा एकदा सुरू केल्या. बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांवर बलुची बंडखोरांकडून सातत्याने हल्ले वाढू लागले होते. २००० मध्ये पाकिस्तानमध्ये साखळी बॉम्बस्फोट बलुच लिबरेशन आर्मीने केले असल्याचे म्हटले जाते. बलुच लिबरेशन आर्मीच्या वाढत्या हिंसक कारवायांनी त्रस्त झालेल्या पाकिस्तान सरकारने २००६ मध्ये या संघटनेला दहशतवादी घोषित केले. सं

घटनेचा नेता नवाबजादा बालाच मिरी यांच्या आदेशाने बलुच लिबरेशन आर्मी हल्ला करत असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे. पाकिस्तानसोबत अमेरिका आणि ब्रिटननेही या संघटनेला दहशतवादी घोषित केले. २००७ मध्ये नवाबजादा बालाच मिरीच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ हिरबयार मिरी याला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची सूत्रे सोपवण्यात आली; मात्र ब्रिटनमध्ये वास्तव्य करत असलेल्या हीरबयार मिरी याने संघटनेशी संबंध नसल्याचे सांगतिले. त्यानंतर संघटनेची सूत्रे अस्लम बलोच यांच्याकडे गेली. बलुचिस्तानचे सर्वांत मोठे नेते नवाब अकबर बुगती यांची २००६ मध्ये हत्या करण्यात आली होती. ही हत्या मुशर्रफ यांच्या आदेशावरून करण्यात आली असल्याचा आरोप होता.

मुशर्रफ यांना २०१३ मध्ये या प्रकरणी अटकही झाली. त्या वेळी बुगती हे तेल व खनिज उत्पादनातल्या कमाईत वाटा मागत असल्याचे मुशर्रफ यांनी बचावात सांगतिले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरला कायम विरोध केला आहे. चीन आणि पाकिस्तानच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पात काम करणाऱ्या चिनी कामगारांवर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याशिवाय या संघटनेने कराचीमधील चीनच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात आला होता. बलुचिस्तानची सीमा ही इराण आणि अफगाणिस्तानला लागून आहे. त्यामुळे बलुच प्रातांचेही विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय ग्वादर बंदरही बलुच प्रांतात येते.

हे बंदर सध्या चीनच्या ताब्यात आहे. ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांकडून या संघटनेला प्रशिक्षण आणि इतर मदत दिली जात असल्याचा आरोप करण्यात येतो. बलुचिस्तानमधील या संघटनांना रशियाकडून मदत करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता. पाकिस्तान पोलिसांनी इस्लामाबाद येथील इराकच्या दूतावासावर १९७३ मध्ये अचानक छापा घातला. या छाप्यात शस्त्रसाठा आढळून आला. हा शस्त्रसाठी बलुच बंडखोरांना देण्यात येणार होता, असा पाकिस्तानचा आरोप होता. यामागे भारत आणि रशियाचा डाव असल्याचा आरोप तत्कालिन पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांनी केला होता. भारतात घातपाती कृत्ये करण्यासाठी दहशतवाद्यांना मदत करायची, त्यांना आर्थिक रसद पुरवायची, अफगाणिस्तानबाबतही तेच करायचे, अमेरिकेने दिलेला निधी दहशतवाद्याना पुरवायचा असे केल्यानंतर पाकिस्तानात दहशतवादाच्या विषवल्लीला वेगळी फळे कशी येतील, याचा विचार करायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here