!!भास्करायणः३९!! आनन्दी जगण्यासाठी…..

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )

आपण हसणंच विसरलोय. जिवनात जर हास्यच खुलत नसेल, तर जगायचं कशासाठी, हा प्रश्‍न पडतो. केवळ पैशासाठी आणि तो कमविण्याच्या धकाधकीसाठी? पळ पळ पळायचं, धाव धावून पैसा कमवायचा आणि अखेरीस डॉक्टरांच्या हाती सोपवायचा! याला जगणं म्हणता येईल कां? मुळीच नाही!जगण्याचा अर्थ म्हणजे जिवंतपणा. नदी वाहते, हे तिचं जगणं असतं. समुद्राच्या लाटा उसळणं, ही त्याची मस्ती असते. पशुपक्षांचं स्वच्छंदपणे वावरणं, फुलांचं खुलणं आणि सुगंध वाटणे, हे त्यांचं जगणं असतं. तसंच हसणं, खेळणं गप्पागोष्टींच्या मौफिली जमविणं, कला, क्रिडा अशा सर्वांचा आनंद घेणे, म्हणजे जगणं. 

आज माणसांत जिवंतपणाच राहिलेला नाही. समाज म्हणजे जिवंत माणसांचं स्मशान बनलंय! आपण हसणं का विसरलो, याची कारणं आपल्या बदलत्या जिवनशैलीत आणि जगण्याच्या संदर्भात दडलेली आहेत. आपण भौतिकवाद स्विकारला. जाहिरातींनी उदत्तीकरण केलेल्या बेगडी दुनियेची आपल्याला भूरळ पडली. माणसांशी संवाद करण्याऐवजी आणि त्यांच्याशी नातं जोडण्याऐवजी, आपलं नातं सोशल मिडियाशी आणि सिरियल्स मधील पात्रांशी जडलंय! संवादाची माध्यमे वाढली, पण संवाद मात्र हरपला!

करिअर आणि पैशाचं भूत आपल्या मानगुटावर बसलंय. ह्या भूतांनी आपल्याला झपाटून टाकलंय. इतकं की, आपल्याला जगण्याचांच विसर पडला. ‘जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला,’ अशी आपली गत झाली. लहाणपणीच दप्तराचं ओझं. खेळायची मुभा नाही. शाळा सुटली की क्लास, अन् क्लास सुटला की अभ्यास! मुलांना आपण घाण्याचा बैल करुन टाकलंय. मैदानं ओस पडलीत. सवंगडी नाही, की खेळणं बागडणं नाही. करिअरच्या हव्यासापायी आपण मुलांच्या बालपणाचा गळा घोटतोय. पालकच मुलांचे मारेकरी बनलेत.

बापानं ऑफिसला जायचं मुलांनी शाळेत जायचं. उरलेल्यांनी टि.व्ही. समोर बसायचं! मुलांना शालेय वेळेतून फूरसत मिळाली, की लागली बोटं मोबाईलवर फिरायला! माणूस समोर असताना बोलायचं नाही, अन् तो गेल्यावर ‘आय मिस यू’ संदेश पाठवायचा! अवघ्या समाजाला सोशल मिडियानं वेड लावलंय. आपण आपलं माणूसपणंच गमावून बसलोय. प्रत्येक घर, बंगला, फ्लॅट म्हणजे चार भिंतीचा सिमेंट काँक्रेटचं बंदिखाना बनलंय. डांबरी रस्त्यावरुन धावता, धावता आपलं मनही डांबरासारखं निबर बनलंय. यंत्र, संगणक, मोबाईल यांच्या नादी लागून आपलं मशिन कधी बनलं, हेच आपल्याला कळलं नाही!

संवाद हरपला, नात्याची विण उसवली. भौतिकवाद, भोगवाद आणि चंगळवादाची कास धरली. चैनीसाठी लागणार्‍या पैशासाठी ‘वाट्टेल ते’ सुरु झाले. यातून जन्माला आलं ‘टेन्शन’ आणि ‘तणाव!.’ जगताना तणाव सोबतीला असतोच. पण, तो खेळणे, गप्पा गोष्टी करणे, नाटक-सिनेमे बघणे, निसर्गाकडे जाणे यातून घालविता येतो. जगण्यासाठी आपणाला पुन्हा नवी उर्जा मिळते. आज ही उर्जाच मिळेनाशी झाली. मग ताण-तणाव सरतील कसे?

विनोदासारखं ताण-तणावावर दुसरं औषध नाही. हा विनोदही आता हद्दपार झालाय. विनोद नसल्यानं आपण हसणं गमावलं. त्यामुळ आपण ‘लाफ्टर शो’, ‘हास्यक्लब’ सारखं खुळ स्विकारलं! नैसर्गिक हास्य सोडून आपण हसूही कृत्रिम स्विकारलं! आचरटपणा, अश्‍लिलपणा, ओढूनताणून केलेला शब्दखेळ, अंगविक्षेप याला विनोद म्हणायचं? मुळीच नाही! अरे, घरातली माणसं, नातलाग, मित्रांच्या मैफीली जमवा. जरा एकमेकांची चेष्टा मस्करी करा. कधीतरी पैशाच्या, पदाच्या तोर्‍यातून बाहेर पडा. घरातल्या कोंडवाड्यातून कधीतरी बाहेर पडून समाजात या. माणसांत वावरा एकमेकाची चेष्टामस्करी करा. आपोआप हास्याचे कारांजे उडतील. खळखळून हसलं, तर टेन्शन कुठल्याकुठं पळून जाईल!

आजकाल शब्द परवलीचे झालेत. एक म्हणजे, ‘बोअर झालंय’ आणि दुसरं म्हणजे मला ‘डिप्रेशन’ येतंय’ इतके सोपे आहेत हे शब्द? हे शब्द उच्चारणे, हे मानसिक रोगाचे पुर्वलक्षण आहे. बरं, बोअर कुठं व्हावं? समारंभ, सोहळे, कार्यक्रमात? याचा अर्थ माणसांची गर्दी जमली, की बोअर होणार. किरकोळ अपयश आलं की, ‘डिप्रेशन’ येणार. अरे, परिस्थितीशी कसं दोन घ्यायचे, दोन द्यायचे, फिट्टम् फाट!

आपण जन्मापासून दोन गोष्टींचा शोध घेत असतो. सुख आणि समाधान. अगदी मरेपर्यंत आपण शोधत असतो, पण सुख आणि समाधान काही सापडत नाही. सुखं आणि समाधानाची व्याख्याच चुकीची असेल आणि शोधण्याचा मार्ग चुकीचा असेल, तर सुख आणि समाधान हाती लागेल कसे? मिरचीचं बी पेरुन, ऊस पिकेल कां? तसंच सुख व समाधानाच्या चुकीच्या समजाचं बी मनात पेरुन, सुखं-समाधानाचं पीक उगवेल कां? मोटार, बाईक्स, फ्रीज, एअर कंडिशन, बेडरुम, डायनिंग टेबल, टि.व्ही. मोबाईल्स, इसेन्स, ब्रॅन्डेड कपडे, यांच्या संगतीत राहून भौतिक सुख मिळेल. आत्मिक व मानसिक सुख मात्र मिळणार नाही आणि समाधान तर नाहीच नाही!

भौतिक वस्तू ह्या साधनं आहेत. त्याने सुविधा मिळते, सौख्य व समाधान नाही! सुख असं विकत मिळत असतं आणि त्यातून समाधान लाभलं असतं, तर या सगळ्या साधनांची रेलचेल असणारांनी आत्महत्या केलीच नसती! सुख व समाधान हे विकत मिळत नसतं ते इतरांना देवून मिळत असतं, तेही फुकटात! इतकं सोपं असतांना आपण जगणं अवघड करुन ठेवतो.
एकलकोंडेपणा सोडून सोबती जमवा. हस्य विनोदाची बाग फुलवा, अधुनमधून निसर्गाकडे जा. डोंगर, दर्‍याखोर्‍यातलं त्याचं रुप न्याहाळा. त्याने केलेल्या सौंदर्याचा आनंद लुटा. हिरवा शालु पांघरलेली जमिन बघितली, तर कोणताही शालू तुम्हाला कवडीमोल वाटेल! खळाळते पाण्याचे प्रवाह, झरे, धबधबे, ओढ्यानाल्यातून अवखळपणे वाहणारं पाणी पाहून, तुमच्या मनाात आनंदाच्या धबधब्याला उधाण येईल! सरसर कोसळणार्‍या पाऊसधारा पाहून त्यात न्हाऊन तुम्ही निसर्गाचा शॉवरबाथ घेतला, तर तुम्हाला बाथरुममधल्या शॉवरचा विसर पडेल!

समुद्राची अथांगता तुम्हाला मोठेपणीही कसं विनम्र रहावं, याची शिकवण देत तुमच्यातला अहंकार, घमेंड घालवील. रानवार्‍याची झुळूक अंगाशी खेळून गेली, तर तुम्हाला एअरकंडिशन गुदमरल्यासारखं भासेल. रानफुलांनी नटलेल्या वाटांतून चाललात, तर डांबरी रस्त्याची भूरळ पडणार नाही. घनगर्द जंगलाच्या सावलीत विसावा घेतला, तर फ्लॅटमधील एअरकंडिशन्ड बेडरुम असतांना झोप लागणार नाही, अशी निवांत झोप लागेल! जाई, जुई, मोगरा अशा फुलांचा दरवळलेला सुगंध नाकी भरला, तर स्प्रे, डिओड्रन्टस् तुमच्या मनातून हद्दपार होतील. ऐन ग्रिष्मात, वैशाख वणव्यात फुलणारा लालजर्द गुलमोहर तुम्हाला दु:खाचे चटके सोसून फुलण्याचा मंत्र देईल. जंगलात बागडणारे प्राणी, आकाशात विहरणारे पक्षी पाहिले, तर स्वच्छंदी जगणं म्हणजे काय, याचा अर्थ गवसेल. भोगवाद, चंगळवादाचं भूत आपोआप उतरेल!
तर असं आहे. सुखाची आस धरली, की दु:ख वाढते! सुख वाटलं तर वाढतं आणि दु:ख वाटून घेतलं तर हलकं होतं.

आपण नैसर्गिक जंगलाबाहेर पडून भौतिकतेच्या जंगलात अडकलो. ठिक आहे. पण या जंगलाच्या कचाट्यात किती अडकायचं, हे ठरवलं पाहिजे. खपून खपून आनंद मिळत नसेल, तर अशा जगण्याला अर्थ नाही. जगणं सुंदर आहे. फक्त एकदा या भोगवादाच्या विळख्यातून, भौतिक बेगडी सुखवस्तुंच्या दुनियेतून बाहेर पडा आणि निसर्गाकडे चला.
पैसा कमविताना माणसंही जमवा. टि.व्ही.सिरिअल्सवरील  मालिकांतील पात्रांइतकेच घरातील आई, वडिल, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी, आत्या, मावशी, मामा, मामी यांच्याशीही नांत जोडा. सोशल मिडीयातून फुरसत काढून, माणसांशी, मित्राशी गुज गोष्टी, गप्पागोष्टी करा. एअरकडिंशनींग सोडून रानवार्‍यात फिरा. कृत्रिम स्प्रे ऐवजी जाई, जुईच्या गंधाचा आस्वाद घ्या. प्राणी, पाखरं जशी समुहानं वावरतात, तसं माणसांचं सहजीवन घडवा. एकमेकाचं सुख-दु:खं वाटून घ्या. खळाळत्या ओढ्यानाल्याप्रमाणे अवखळ बना. हास्यविनोदाचे धबधबे गप्पाटप्पातून कोसळू द्या. मग बघा सुख, समाधान, आनंद सर्व काही मिळेल. शेवटी एवढंच की, जिवन आनंदी करण्यासाठी ‘मुस्कुराते रहो’…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here