Karjat : त्यांची फक्त प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी, त्यांनी आधी स्वतःच्या प्रभागात लक्ष द्यावे

0

नगरसेविका पाटील यांचा नाव न घेता नगरसेवक घुले यांच्यावर घणाघात

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : पावसापूर्वी प्रभाग क्रमांक चार मधील रस्त्याचे डांबरीकरण काम ७०% पूर्ण झाले होते. आपण स्वता त्यांची पाहणी केली होती. सदरचे काम सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला आणि ठेकेदारास ते काम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अचानक एक नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र येत केवळ प्रसिद्धीपोटी स्टंट करत काम बंद पाडल्याचे खोटेनाटे सांगत आहेत असा घणाघात नगरसेविका वृषाली किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत सचिन घुले यांचे नाव न घेता केला.  
सोमवार, दि २९ रोजी काँग्रेसचे नगरसेवक सचिन घुले यांनी प्रभाग क्रमांक चार मध्ये पावसात डांबरीकरण काम सुरू आहे. ते काम आपण ठिय्या आंदोलन करत बंद केले याबाबत कर्जत नगरपंचायतीवर आरोप केले होते. त्यास भाजपाच्या प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका वृषाली किरण पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.
कर्जत नगरपंचायतीच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक चार मध्ये १४ वा वित्त आयोगातुन शाहु कॉलनी येथे रस्ते विकासाचे डांबरीकरण काम सुरु आहे. लॉकडाऊनमुळे सदरचे काम उशिरा चालू झाले. पावसापूर्वी हे काम ७०% पूर्ण झालेले होते. आपण स्वतः त्याची पहाणी करून नगरपंचायतीला या कामासंबधित सूचना केलेल्या होत्या. सदर काम चालू असताना पाऊस सुरू झाला ठेकेदारास ते काम तात्काल बंद करण्यास सांगितले होते.
काम बंद करून कामावरील कामगार त्याच ठिकाणी पाऊस सुरू असल्याच्या कारणाने आडोश्याला बसले होते. यावेळी कामाच्या ठिकाणी एक नगरसेवक त्यांच्या कार्यकर्ते समवेत येत. केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यासह या रस्त्यावर चार वेळा काम करण्यात आल्याचे खोटेनाटे आरोप व व्हिडिओ प्रसारित केले असून त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
वास्तविक पाहता साडेचार वर्षामध्ये पहिल्यांदाच सदर रस्त्यासाठी निधी मिळालेला आहे. सदर काम दर्जेदार करण्याची सुचना आपण स्वतः नगरपंचायत अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदारास दिल्या होत्या. काम दर्जेदार होत असताना वरील नगरसेवकाचे आरोप व सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ हे राजकीय द्वेषापोटी करण्यात आले आहे असा खुलासा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शेवटी काम होत असल्याला प्रभागात पत्रकार समवेत झालेल्या कामाचा आढावा घेतला.
प्रसिद्धीचा स्टंट म्हणून आरोप करू नये 

काम चार वेळा झाले असेल तर त्यांनी समोर येवून सांगावे. उगाच राजकारणाच्या स्वार्थापोटी आणि प्रसिद्धीचा स्टंट म्हणून कोणावर आरोप करू नये. स्टंट करणाऱ्या नगरसेवकाने स्वतःच्या प्रभागात लक्ष द्यावे. तेथील जनतेचे कामे करावीत. उगाच दुसऱ्याच्या प्रभागात ढवळा-ढवळ करू नये, असा उपरोधिक सल्ला नगरसेविका वृषाली पाटील यांनी सचिन घुले यांचे नाव न घेता दिला. आपण प्रभागात सुंदर बगीच्यासह जवळपास पावणे तीन कोटींची विकासकामे केली आहेत. त्यांनी आपल्या प्रभागात काय-काय काम केले आहेत ते समोर येऊन सांगावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here