Corona: श्रीरामपूरमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांच्या सीमा सील कराव्यात- केतन खोरे

0

श्रीरामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव श्रीरामपूर शहर व तालुक्यात झपाट्याने वाढत असल्याने श्रीरामपूरमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सीमा किमान सात दिवस सील करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यक्ती, वाहनांना श्रीरामपूरात प्रवेश देऊ नये. सोबतच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संपूर्ण माहिती घेतल्यास श्रीरामपूरात वाढू पाहणाऱ्या कोरोनाला रोखण्यात मोठे यश मिळेल अशी अपेक्षा मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी व्यक्त केली आहे. याविषयी त्यांनी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे श्रीरामपूरमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांच्या सीमा सील कराव्यात ही मागणी केली आहे.
श्रीरामपूर शहर व तालुक्यात सापडलेल्या बहुतांश कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवास केल्याने त्यांना लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आजवर एकही कोरोना रुग्ण नसलेल्या श्रीरामपूर शहरात व तालुक्यात कोरोना व्हायरस सध्या पहिल्या स्टेजवर येऊन पोहचला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्वरित रोखायचा असेल तर श्रीरामपूरमध्ये येणाऱ्या रस्त्यांच्या सीमा सील करणे गरजेचे आहे. सोबतच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन रुग्ण संख्या वाढण्याआधी संबंधितांच्या आरोग्याची काळजी घेतल्यास श्रीरामपूरात वाढण्याची शक्यता असणारा कोरोना रोखण्यात प्रशासनाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ज्याप्रमाणे राज्य शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिक व वाहनांना दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही ही भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर श्रीरामपूरच्या प्रशासनाने तालुक्याच्या रस्त्यांच्या सीमा सील करण्याचा निर्णय घेतल्यास शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. आपल्या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून किमान सात दिवस श्रीरामपूरमध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सीमा सील करत कडक अंमलबजावणी करण्याची मागणी तहसीलदार प्रशांत पाटील यांचेकडे मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here