प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यात शेतक-यांनी बियाणे पेरणी करून न उगविलेल्या बियांणाची त्वरीत कृषिविभागाने पाहणी करून त्या शेतक-यांना दुबार बियाणे व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सभापती क्षितीज घुले यांनी निवेदनाद्वारे कृषिआधिकारी किरण मोरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेवगांव तालुक्यातील बहुतांश भागात बाजरी, तूर, ही बियाणे उगवलीच नसून शेतकरी यावर्षी मोठ्या अडचणीत असताना मोठा खर्च करून बियाणे खरेदी केले. मात्र, काही बियाणे उगवलेच नसल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून त्या शेतक-याच्या न उगवलेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी.
तसेच परिसरात युरिया खतांचा तुटवडा असल्याचे भासवून शेतक-यांना युरियाच्या बदल्यात कृषिसेवा केंद्र अन्य खते घेण्याची बळजबरी करत आहे. त्यांची चौकशी होऊन सर्व प्रकारची खते उपलब्ध असताना का दिली जात नाहीत याची चौकशी व्हावी. तसेच मागील हंगामातील पीक विमा रक्कम अजूनही ब-याचशा शेतक-यांना मिळाली नसून ती विमा कंपनीने त्वरीत देण्यात यावी, अशी मागणी सभापती घुले यांनी केली आहे. यावेळी संदीप बामदळे, राजेंद्र आढाव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येन उपस्थित होते.