Corona : नगरमध्ये पुन्हा टाळेबंदी …… ?

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगरः नगरमध्ये मागील आठवड्यापासून रुग्ण वाढीचा वेग वाढल्यामुळे कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढू लागली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा देण्याची जबाबदारी त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. त्यामुळे कंटेन्मेंट झोन अजून वाढल्यास तेथे अत्यावश्यक सेवा देताना मनुष्यबळाची कमतरता भासण्याचा धोका असल्याने महापालिकेसह जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे संपूर्ण नगरच लॉकडाऊन करण्याचा पर्याय समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या तातडीची बैठक यावर चर्चाही झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव नगर शहरामध्ये वाढू लागल्याने आज दुपारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिका, पोलीस  प्रशासन या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये नगरमध्ये वेगाने होणारा करोना फैलाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

परिस्थिती नियंत्रणात न आल्यास वेळप्रसंगी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिका नोडल अधिकारी डॉ.सतिष राजूरकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे डॉ. विरेंद्र बडदे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here