Editorial : गांभीर्याने घ्यावा असा इशारा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याबाबत वेगवेगळ्या संस्थांनी अहवाल दिला आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न काही ठिकाणी शून्याच्या खाली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनामुळे स्थलांतरित मजुरांचे प्रमाण किती आहे आणि त्यांच्यावर किती कुटुंबांचे व्यवहार अवलंबून आहेत, हे स्पष्ट होते. जागतिक मंदीच्या काळात अनेक देशांतील लोकांच्या नोक-या गेल्या आणि त्यांच्या परत येण्याने संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांवर किती प्रतिकूल परिणाम झाला, हे दिसले होते. भारतासारख्या विकसनशील देशांना तर देशाबाहेर गेलेल्यांकडून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते.

आखाती देशांतून तर भारतात मोठ्या प्रमाणात चलन येत असते. कोरोनाच्या संकट काळात देशांतल्या देशांत स्थलांतर करणा-या मजुरांची संख्या किती मोठ्या प्रमाणात आहे, हे नव्याने समजले. बिहार, उत्तर प्रदेश या दोन राज्यांतील स्थलांतरित मजुरांचे प्रमाण साठ लाखांहून अधिक आहे. पूर्वी कोकणातील लोकांचे व्यवहार मुंबईतून येणा-या मनिआॅर्डरवर अवलंबून असायची. आता तर अहमदाबाद, सुरत, पुणे, मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबादहून येणा-या पैशावर देशातील ब-याच कुटुंबांचा संसार चालत होता, हे स्पष्ट झाले. कोरोनाकाळात एकट्या अमेरिकेत चार कोटी लोकांच्या नोक-या गेल्या. हीच स्थिती जगातील बहुतांश राष्ट्रांची आहे. दुष्काळ किंवा संकटाच्या काळात गुन्हेगारी वाढते, हा अनुभव असतो.

हाताला काम नसले आणि खिशात काही नसले, तरी पोट मात्र भुकेची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही. मोकळे हात आणि रिकामे मन मग काहीही करायला तयार होते. भारतात बेरोजगारीचे प्रमाण २७ टक्क्यांवर गेले आहे. गेल्या काही दिवसांत हाताला काम नसल्याने आणि उपजीविकेसाठी घरात काही नसल्याने अनेक कुटुंबांनी काळोखाचा मार्ग धरला. काही लोक तर गुन्हेगारीकडे वळले आहेत. दिल्लीत पकडलेल्या काहींनी रोजगार गेल्याने आता काही पर्यायच राहिला नसल्याने गुन्हेगारीकडे वळल्याचे सांगितले. स्थलांतरितांवर अनेक ठिकाणच्या अर्थव्यवस्था अवलंबून आहेत. आता टाळेबंदी काहीशी शिथिल झाली असली आणि उद्योगाची चक्रे फिरायला लागली असली, तरी पूर्वीइतक्या क्षमतेने कारखाने चालत नाही. काहींनी तर टाळे लावायला सुरुवात केली आहे. भारतात हाॅटेल, पर्यटन उद्योग मोठा आहे. आता काही काळ तरी पर्यटन सुरू होणार नाही. त्यामुळे पन्नास टक्के हाॅटेल्स बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पन्नास टक्के रोजगार कमी होण्याची भीती आहे. हाॅटेल उद्योगातही स्थलांतरितांबरोबरच स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.

स्थलांतरितांमुळे दरवर्षी किती लोकांना रोजगार मिळतो आणि त्यांच्यामुळे किती पैसे इतरत्र पाठविले जातात, याचा एक अहवाल जागतिक बँकेने दिला आहे. त्याचा अभ्यास केला, तर आताच स्थलांतरितांमुळे होणा-या पतपुरवठ्यात वीस टक्के कपात होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार २०१८- 2019 मध्ये जगातील जवळपास 40 लाख कोटी रुपये एका देशातून दुस-या देशात पाठविण्यात आले होते. कोरोनामुळे या वर्षी मोठ्या संख्येने लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. याचा थेट परिणाम पैशांच्या पाठवणीवर होतो. या वर्षी रेमिटन्स 20 टक्क्यांनी घसरून सुमारे 33 लाख कोटी रुपयांवर जाईल. म्हणजे सुमारे सात लाख कोटी रुपयांची कमी पाठवणी होईल. भारतात १३ कोटी लोक रोजगारासाठी स्थलांतर करतात.

बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून स्थलांतर करून अन्य राज्यांत नोकरी, व्यवसाय करणा-यांची संख्या मोठी आहे. त्यातील ब-याच लोकांचा रोजगार आता कोरोनामुळे हिसकावला गेला आहे. कोरोनाचे संकट लगेच संपण्याची चिन्हे नाहीत आणि आणखी काही वर्षे तरी भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशात रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. जगभरातील लोक रोजगाराच्या शोधात एका देशातून दुस-या देशात जातात आणि तेथून काही पैसे त्यांच्या घरी पाठवतात. ज्यात त्यांचे घर चालते. या रकमेस रेमिटन्स म्हणतात. आखाती देशांत स्थायिक झालेले भारतीय सर्वाधिक पैसे पाठवतात.

याशिवाय अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यासारख्या विकसित देशांमध्ये काम करणारे लोक आपल्या कुटुंबांना पैसे भारतात पाठवतात. या परदेशस्थ भारतीयांचा परकीय चलनाचा साठा वाढविण्यात मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेसह अन्य देशांनी स्थानिकांना प्राधान्य देण्याचे धोरण जाहीर केले आहे. सुमारे 75 टक्के स्थलांतरित जे इतर देशांकडून पैसे पाठवितात, म्हणून त्यांच्या कुटुंबीयांचे पोट चालते. दहा टक्के शिक्षणासाठी आणि उर्वरित 15 टक्के बचत म्हणून वापरले जातात. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, या वर्षी भारतात परदेशातून पैसे परत पाठविण्यात २३ टक्के घट झाली आहे. मागील वर्षी परदेशस्थ भारतीयांकडून सुमारे सहा लाख कोटी रुपये पाठविण्यात आले. यंदा हा आकडा चार लाख ऐंशी हजार कोटी रुपयांवर येण्याची शक्यता आहे. भारताप्रमाणेच कोरोनाचादेखील जगातील इतर देशांमधील पैसे पाठविण्यावर परिणाम झाला आहे. दक्षिण आशियामध्ये पैशाच्या पाठवणीचा 27.5 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये 23 टक्के, नेपाळमध्ये 19 टक्के, श्रीलंकेत 14 टक्के आणि बांगला देशात 22 टक्के घट होण्याचा अंदाज आहे.

जगभरात राहणा-या परदेशस्थ भारतीयांची मिळकत सुमारे २२२ लाख कोटी रुपये आहे. यातील 15 टक्के रक्कम त्यांच्या घरी पाठविली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार सुमारे 20 कोटी परदेशी लोक इतर देशांत काम करतात. ते इतर देशांकडून त्यांच्या घरी पाठवतात, त्या प्रमाणात ऐंशी कोटी लोकांना आधार मिळतो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार भारतातील बहुतेक प्रवासी आखाती देशांमध्ये काम करतात. यातील ९० टक्के लोक कमी किंवा अर्ध-कुशल आहेत. यापैकी ब-याच लोकांचा रोजगार गेला आहे. अहवालानुसार अमेरिका, सौदी अरेबिया, रशिया, संयुक्त अरब अमिरात, जर्मनी, कुवैत, फ्रान्स, कतार, इंग्लंड आणि इटली हे 10 देश आहेत, ज्यातून इतर देशांत सर्वाधिक पैसे पाठविले जातात. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातील भारतीयांनी पाठविलेल्या पैशांचा मोठा वाटा असतो.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार सर्वाधिक पैसे पाठविणा-या देशांत त्यांच्या जीडीपीच्या दहा टक्के रक्कम स्थलांतरितांच्या पैशांचा आहे. २०१८ च्या च्या अहवालानुसार, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नांत रेमिटन्सचे प्रमाण २.9 टक्के होते. पाकिस्तानच्या जीडीपीत 6.7 टक्के, नेपाळच्या जीडीपी 28 टक्के, बर्म्युडाच्या जीडीपीत 22 टक्के, तर चीनच्या जीडीपीत 0.2 टक्के होते. भारतात काम करणारे प्रवासी दरवर्षी सुमारे दोन लाख कोटी रुपये त्यांच्या घरी पाठवतात. जागतिक बँकेच्या अहवालानुसार (एप्रिल 2020) कोरोनामुळे सुमारे चार कोटी स्थलांतरित झाले आहेत. यावर्षी देशांतर्गत पैशांतून 80 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.

इकॉनॉमी सर्व्हे 2017 च्या अहवालानुसार भारतातील सुमारे 13 कोटी स्थलांतरित अन्य राज्यात काम करण्यासाठी स्थलांतर करतात. यापैकी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील स्थलांतरित लोक प्रेषण म्हणून 60 टक्के रक्कम पाठवतात. रेमिटन्समधील कपातीचा परिणाम केवळ लोकांच्या दैनंदिन जीवनावर होणार नाही, तर गरीबी, उपासमार, गुन्हेगारी, मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. कारण जास्त पैसे पाठविणारे लोक गरीब वर्गाचे असतात. ‘नेपाळ इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेन्ट स्टडीज’चे तज्ज्ञ गुरुंग यांचे मत आहे, “पैसे पाठविल्याशिवाय या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ढासळेल आणि त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यास भाग पाडले जाईल, असा त्यांनी दिलेला इशारा गांभीर्याने घ्यावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here