!!भास्करायणः४२!! युवा पिढीतील संवाद हरवलाय! 

भास्कर खंडागळे, बेलापूर, (9890845551)

संवाद हा मानवी संस्कृतीचा पाया आहे. अशा समृध्द संस्कृती आणि आपल्या समाजाला आ पण कोठून कोठपर्यन्त आणून ठेवलंय? समाज म्हणजे केवळ माणसांचा समुह नव्हे. तसे असते तर जनावरांचा कळपही समाज ठरला असता! समाज म्हणजे सहजीवन असते. या सहजीवनासाठी असतात सण आणि उत्सव! 

आज संपर्काची आणि दळणवळणाची साधने वाढली आहेत. मोबाईल, इंटरनेट, टि.व्ही.वाहिन्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत.संवादाची व संपर्काची साधने वाढताना, माणसामाणसातला संवाद आणि संपर्क मात्र हरवला आहे. मोबाईलवर दिवसभर व्यस्त माणसाला जवळच्या, अगदी घरातल्या माणसांशी बोलायला सवड नाही.

एस.एम.एस.फिरविण्यात दंग असणार्‍यांपर्यन्त त्याच्या घरातल्या व्यक्तींच्या मनाचे, भावभावनांचे संदेश पोहचत नाहीत. फेसबुकच्या दुनियेत रमणार्‍यांना स्वत:च्या माणसांचे, मित्रांचे ‘फेस’ बघायला ऊसंत नाही. मोबाईल, टी.व्ही., फ्रिज,संगणक, कार, बाईक्स हे त्याचे नातलग व मित्र बनलेत.माणसाशी व समाजाशी जुळलेली नाळ तुटून, ती या भौतिक गोतावळ्याशी जुळली. चंगळवादाच्या नंदनवनात रमलेला समाज, जिवंत माणसांचं स्मशानं बनलाय!

एकत्र कुटुंब पद्धती मोडीत निघाली. रक्तानात्याची माणसं तोडून, माणसांचं जंगल सोडून आपण सिमेंटच्या फ्लॅट, बंगलारुपी जंगलात गेलोे. एकाच घरात राहूनही आपण विभक्त झालोत. आई व बाप पैसा कमविण्यात दंग, तर मुले बालपणाचा बळी देत करिअरच्या तणावाखाली गुदमरत आहेत. आपणच आपल्या मुलांचे आणि संस्कृतीचे मारेकरी बनलो आहोत.

भोगवाद, चंगळवादाचा गर्भ आपण पोसला. आता ह्या गर्भाचं राक्षसात रुपांतर होवून, त्यानं माणसाला,समाजाला आणि संस्कृतीला गिळायला सुरुवात केलीय, भोगवादाचा हा राक्षस गाडल्याशिवाय आपल्यातला माणूस, सभ्य समाज आणि संस्कृती परतणार नाही. यासाठी भौतिक दुनियेतून, सिमेंटच्या जंगलातल्या विंजनवासातून पुन्हा माणसांच्या दुनियेत परतावे लागेल.व्हॅलेंन्टाईन डे, फ्रेंडशीप डे थांबवून, आपल्या सण-उत्सवांच उदात्तीकरण करावं लागेल. यासाठी प्रत्येकानं आपल्यातला माणूस जागववून माणसा माणसातला संवाद पुन्हा सुरु केला पाहिजे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here