Shrigonda : पोलिसांची दबंग कारवाई, दरोडा टाकणाऱ्या टोळीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यात दरोडा टाकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश श्रीगोंदा पोलिसांनी केला आहे. अधिक उकल केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली असून आरोपीकडून दरोड्यातील चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र, सहा मोटारसायकल, तीन इलेक्ट्रिक विद्युत पंप असे मिळून ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्यातील अनिल लहू गायकवाड, चंद्रकांत सुरेश गायकवाड दोघे रा. भिंगाण ता. श्रीगोंदा आणि अनिल संभा काळे रा. पिंपळवाडी ता. कर्जत यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

याबाबत सविस्तर अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले की दि.१५ एप्रिल २०२० रोजी पहाटे श्रीगोंदा शहराजवळील भोळेवस्तीवरील एका घरावर सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून फिर्यादीस मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल चोरला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सोपवला असता वरील दरोड्यातील आरोपी शेडगाव ता. श्रीगोंदा शिवारात आलेले आहेत. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत सापळा टाकून ३० जूनच्या पहाटे चार वाजता आरोपींना जेरबंद केले. सदर आरोपींनी नऊ ठिकाणी विविध गुन्हे केल्याची कबुली देऊन अन्य पाच साथीदारांची नावे पोलिसांना दिल्याने पोलीस यंत्रणेने त्यांचा शोध घेतला असता ते आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.

अटकेतील आरोपींकडून तीन मोटारसायकल हस्तगत केल्या. त्यांनी अजून विकलेल्या तीन मोटारसायकली इंदापूर जि. पुणे येथून हस्तगत केल्या तर तीन इलेक्ट्रिक मोटारी श्रीगोंदा येथील सोनवणे नामक भंगारवाल्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदर तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार जुलैपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असून या आणि फरार आरोपींकडून मागील अनेक गुन्ह्यांची उकल होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आणि पोलीस कर्मचारी अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, गोकुळ इंगवले, प्रताप देवकाते, योगेश सुपेकर, किरण बोराडे, सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, विनोद मासाळकर,सागर सुलाने यांचा तपास यंत्रणेत समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here