Newasa : कोरोनाच्या महामारीमुळे श्री क्षेत्र देवगड येथील रविवारचा गुरुपौर्णिमा महोत्सव रद्द

देवगडला न येता घरी बसूनच सर्वांनी श्री गुरूंचे स्मरण करावे – गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे आवाहन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा – कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रविवार दि.५ जुलै रोजी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील गुरुपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे देवगडला न येता घरी बसूनच सर्वांनी श्री गुरूंचे स्मरण करावे, असे आवाहन श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी भक्तगणांना केले आहे.

कोरोना या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन घोषित केलेले आहे. राज्यभरातील संपूर्ण मठ-मंदिरे बंद आहेत. सर्वच सण-उत्सव यात्रा या कालावधीत बंद आहेत. यामध्येच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री क्षेत्र देवगड येथील श्रीदत्त मंदिर संस्थानच्या गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भगवान दत्तात्रयांसह श्रीसमर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

या वर्षीचा गुरुपौर्णिमा महोत्सव हा रद्द करण्यात आलेला असल्याने सर्व भाविक भक्तांनी घरी बसूनच आपआपल्या श्रीगुरुंचे स्मरण करावे. तसेच कोणीही देवगडला दर्शनासाठी येऊ नये. जेणेकरून आपली गैरसोय होईल. त्यासाठी श्री दत्त मंदिर देवस्थान व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्रीदत्त मंदिर संस्थानचे महंत परमपुज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here