Sangamner : निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हाजीर हो…

0

इंदुरीकर महाराज यांना 7 ऑगस्ट रोजी संगमनेर न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेर – समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या अडचणीत आज शुक्रवारी वाढ झाली. पुत्रप्राप्तीच्या विधानावरुन अडचणीत सापडलेल्या इंदुरीकरांवर संगमनेर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात प्रोसेस इश्यू केली आहे. त्यानुसार इंदोरीकर महाराजांना आता सात ऑगस्टला संगमनेर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुत्रप्राप्तीचा मंत्र आपल्या कीर्तनातून देणाऱ्या निवृत्ती महाराजांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात तालुक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात न्यायाधीश पी. डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले. सरकारी वकील लिना चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडली. सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशुभ वेळेला झाला तर संतती रांगडी, बेवडी खानदान मातीत मिळविणारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून केले होते.

इंदुरीकरांविरोधात विविध संघटना पुढे आल्या होत्या. त्यांनी इंदुरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सचीव अॅड. रंजना गवांदे यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेकडून दबावामुळे इंदुरीकरांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत त्यांना नोटीस बजावली होती. यात जिल्हा शल्य चिकित्सकांनी जर न्यायालयात तक्रार दाखल केली नाही तर त्यांनी गुन्हेगारास पाठीशी घातल्याच्या कारणावरुन त्यांना सहआरोपी करत न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भातील पुरावेदेखील त्यांनी सादर केले होते.

येथील ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी भास्कर भवर यांनी ता.१९ जूनला न्यायालयात तक्रार दाखल केली होती. येत्या सात ऑगस्टला इंदुरीकर यांना आपल्या वकिलामार्फत न्यायालयात उपस्थित राहून जामीन द्यावा लागणार आहे. यासाठी त्यांना समन्स काढत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here