Editorial : शेजारचे अस्थैर्य

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 4 जुलै 

भारताच्या शेजारच्या देशात अस्थैर्य असणे हे त्या देशांबरोबर भारतालाही परवडणारे नाही. खरेतर भारताला शेजारच्या देशांशी मैत्रीचे संबंध हवे आहेत; परंतु चीन हे संबंध बिघडवतो आहे. संबंधित देशांना आर्थिक मदत करून त्यांना आपल्या ओझ्याच्या दडपणाखाली ठेवतो. नेपाळ हे त्याचे उदाहरण. ज्या देशावर विसंबून भारताविरोधात भूमिका घेतली, त्या देशानेच जमीन बळकावली. आता तर चीनची एवढी हिमंत झाली, की त्याने रशियाच्या भूभागावार दावा केला आहे.

देशांतर्गत प्रश्न आणि मूलभूत प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी किंवा विरोधकांवर मात करण्यासाठी राष्ट्रवादाचा आधार घेतला जातो. त्याने काही काळ चालून जात असले, तरी सातत्याने राष्ट्रवादाची झालर उपयोगी पडत नसते. खोट्या राष्ट्रवादाचा बागुलबुवा फार काळ उपयोगी पडत नाही. खोटारडेपणा कधी ना कधी उघडकीस येतो, त्याचा अनुभव सध्या नेपाळचे पंतप्रधान खडग्‌प्रसाद ओली यांना येत आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारत आणि नेपाळमध्ये जमिनीचा वाद होता; परंतु त्यावरून कधी दोन्ही देशांत गैरसमज निर्माण झाले नव्हते.

जमिनीचा वाद शीतपेटीत ठेवूनही दोन्ही देशांत चांगले संबंध कसे निर्माण करता येतात, याचे चांगले उदाहरण म्हणून नेपाळकडे पाहिले जात होते; परंतु अंतर्गत प्रश्नांवरून अडचणीत आलेल्या ओली यांनी भारताची जमीन नेपाळच्या नकाशात दाखविली. त्यासाठी राष्ट्रवादाचा आधार घेतला; मात्र त्याच वेळी नेपाळची जमीन चीनने बळकावली. तिबेट प्रांतात तिचा समावेश केला. नद्यांचे प्रवाह बदलले; परंतु त्याविरोधात ओली यांनी अवाक्षरही काढले नाही. अखेर तेथील एका पक्षालाच त्यावर आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. अमेरिकेचे अध्यक्ष जसे निवडणुकीत चीन आपला पराभव करू पाहतो, असे सांगायला लागले, तसे ओलीही भारत आपला राजीनामा मागतो आहे, असे म्हणायला लागले.

विशेष म्हणजे दोन्ही देशांत पुढच्या चार महिन्यांत निवडणुका आहेत. आत्यंतिक राष्ट्रवादाचा बुरखा टराटरा फाडला, की काय होते, हे आता कोली यांना पटले असेल. याच ओली यांच्यामुळे भारत आणि नेपाळ संबंध बिघडले आणि नेपाळ चीनच्या आहारी गेला. दोन्ही देशांत रोटीबेटी व्यवहार होत असताना आणि दैनंदिन संबंध असतानही ओली यांनी भारताला दुखावले. त्याचा परिणाम दोन्ही देशांतील तणाव वाढीत झाला. आता नेपाळमधील कम्युनिष्ट पक्षाच्या नेत्यांनीच ओली यांना भारतविरोधी वक्तव्य केल्यमुळे पद सोडायला सांगितले आहे. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. कम्युनिस्ट पक्षाचे नेते सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत.

ओली यांनी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली.  त्यावरून ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचीही अटकळ बांधली जात आहे. त्याचबरोबर नेपाळ सरकारने संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ओली आणि माजी पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड यांच्यात वाद वाढत आहेत. संसदेचे अधिवेशन रद्द करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी मान्यता दिली  आहे.

बालूवतारमध्ये सुरू असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीस ओली उपस्थित नव्हते. पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत पुष्प कमल दहल प्रचंड, माधव नेपाळ, झालनाथ खनाल आणि बमदेव गौतम यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी ओली यांना राजीनामा देण्यास सांगितले. बुधवारी पक्षात फूट पडल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ओली यांनी कॅबिनेट मंत्र्यांसह आपल्या मुख्य विश्वासू नेत्यांसमवेत बैठक घेतली. राष्ट्रवादीच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत 17 सदस्यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एकूण 44 स्थायी समितीपैकी 31 सदस्य ओली यांच्याच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे ओली यांची राजकीय कोंडी झाली आहे. बुधवारी ओली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावरून ते प्रचंड तणावाखाली आहेत आणि पक्षातील नेत्यांनीच ओली यांना भारतावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्या, असे आव्हान दिल्याने त्यांच्यापुढं धर्मसंकट निर्माण झाले असून नेपाळमध्ये आता राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे.

सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षातून त्यांच्याविरोधात सूर उमटल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाची बैठक झाल्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे. भारत आणि नेपाळचे चांगले संबंध असताना लिपुलेखा मार्गाच्या बांधकामावरून नेपाळ सरकारने भारतविरोधी भूमिका घेतली. त्यानंतर संविधान दुरुस्ती करत नेपाळने भारताच्या भूभागावरही दावा ठोकला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये कधी नव्हे तो तणाव निर्माण झाला. भारत-नेपाळ वाद आणि चीनने नेपाळचा काही भूभाग ताब्यात घेतले असल्याचे समोर आल्यानंतर पंतप्रधान ओली यांच्याविरोधात वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली.

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत दिग्गज कम्युनिस्ट नेते प्रचंड यांनीदेखील ओली शर्मा यांच्यावर भारतविरोधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. स्थानिक नेत्यांच्या मदतीने भारताकडून माझे सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ओली यांनी केला होता. भारताविरोधात ओली यांचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. भारत नव्हे, तर मी स्वतः तुमचा राजीनामा मागत आहे. या बेजबाबदार वक्तव्यासाठी अगोदर पुरावे सादर करा, अशी मागणी पुष्पा कमल प्रचंड यांनी पक्ष बैठकीत केली. मित्र देशाविरोधात चुकीचे आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप नेपाळ कम्युनिष्ट पक्षाने केला. भारताविरोधात केलेल्या आरोपांवर ओली यांनी तातडीने पुरावे सादर करावेत, अशी मागणी नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टाराय यांनी केली. भारतीय दूतावास सरकार पाडण्याचे नियोजन करत आहे, तर मग तुम्ही राजदूताला काढून का टाकत नाही, असा सवालही त्यांनी केला.

भारत आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे वक्तव्य करून ओली स्वतःच अडचणीत आले आहेत. नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांनी ओली यांना भारताविरोधातील आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या, असा पर्याय दिला आहे. या नेत्यांमध्ये तीन माजी पंतप्रधानांचाही समावेश आहे. भारताविरोधात ओली यांचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. भारत नव्हे, तर मी स्वतः तुमचा राजीनामा मागत आहे. या बेजबाबदार वक्तव्यासाठी अगोदर पुरावे सादर करा, अशी मागणी पुष्पा कमल यांनी केली. ओली यांनी स्थायी समिती सदस्यांना उत्तरही दिले आहे. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील माहिती भारतीय माध्यमांपर्यंत कशी जाते, असा सवाल त्यांनी विचारला.

भारत काही नेपाळमधील नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय माध्यमातील याविषयीचे वृत्त आणि काठमांडूतील भारतीय दूतावासातील चर्चा यावरून हे स्पष्ट होते, असा आरोप ओली यांनी केला. दुसरीकडे नेपाळमधील चीनचे राजदूत होऊ यांकी यांनी भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यावर टीका केली. नेपाळ दुसऱ्या एका देशाच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे नरवणे म्हणाले होते. ओली यांच्या वक्तव्यानंतर आता स्वपक्षीय नेतेच आक्रमक झाले आहेत. गौतम हे बैठकीत सर्वात आक्रमक झाले होते. पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा राजीनामा ओली यांनी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पक्षाबाहेरूनही ओली यांवर टीका होत आहे.

नेपाळमधील एका पक्षाचे सहअध्यक्ष डॉ. प्रकाश चंद्र लोहानी यांनी ओली यांच्यावर निशाणा साधला. ओली यांना बाहेर काढण्यासाठी कुणाचीही गरज नाही. त्यांना स्वतःच बाहेर पडण्याची घाई झाली आहे, असे ते म्हणाले. स्वतःच्याच पक्षात पडलेली फूट पाहता नेपाळचे पंतप्रधान बिथरले आहेत. नेपाळच्या नव्या नकाशामुळे भारत नाराज आहे आणि माझे सरकार पाडण्यासाठी दिल्लीत बैठका होत आहेत, असा आरोप त्यांनी केला. नेपाळ सरकारकडे संसदेत पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे कुणी काहीही नियोजन केले, तरी ते यशस्वी होणार नाही, असेही ओली म्हणाले.

नेपाळने सुधारित नकाशासाठी जी घटनात्मक दुरुस्ती केली, त्याबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत बैठका होत आहेत, असे म्हणत हा माझा सरकार पाडण्याचा डाव असल्याचा आरोप ओली यांनी केला. नेपाळने प्रादेशिक रचना ठामपणे सांगितल्यामुळे भारताला राग आहे, असा आरोप त्यांनी केला. नेपाळचा राष्ट्रवाद एवढा कमकुवत नाही. आम्ही आमचा नकाशा बदलला आहे आणि देशाच्या पंतप्रधानालाच काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ते नेपाळसाठी अकल्पनीय असेल. काही लोकांच्या मते नेपाळचा नवा नकाशा हा गुन्हा आहे, असे म्हणत त्यांनी भारतावर आरोप केला. २०१६ मध्येही मी चीनच्या जवळ गेल्यामुळे बाहेरुन माझे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादाचा आधार कोली यांना वाचवू शकत नाही. त्याचे कारण ओली यांचा खरा चेहरा आता पक्षानेच पुढे आणला आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीला ओली यांनी हजेरी न लावल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. नेपाळमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून स्वतःच्या पक्षातीलच नेते ओली यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये निवडणुकीअगोदरच अस्थैर्य निर्माण झाले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here