Shirdi : साई भक्तांच्या संख्येवर मर्यादा येणार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगर: राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शिर्डी येथील ‘साईबाबा मंदिर ‘ही भाविकांसाठी बंदच आहे; मात्र मंदिर उघडण्याची परवानगी मिळाली, तरी त्यासाठी सर्व नियम पाळावे लागतील. तसे झाले तर दिवसभरात दर्शन मिळू शकणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट होणार असून अनेक भक्तांना दर्शनाच्या प्रतीक्षेत थांबावे लागणार आहे. तिरुपती देवस्थानने दररोज साडेसहा हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली आहे. शिर्डीत ही संख्या साडेतीन हजार असेल, असा अंदाज आहे.

राज्य सरकारने मंदिरे खुली केली, तर आपलीही तयारी असावी, या हेतूने साई संस्थानने नियोजन केले आहे. गर्दी टाळून आणि सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. नव्या योजनेनुसार शिर्डीत दिवसभरात केवळ साडेतीन हजार भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत. एरवी ही संख्या सरासरी पन्नास हजार असते. सुट्टी आणि उत्सवाच्या काळात ती लाखांत असते. आता मात्र तशी मोकळीक आता देता येणार नाही. त्यामुळे अशी गर्दी इतिहास जमा होण्याचीच शक्यता अधिक आहे.

या नव्या बदलाला सामोरे जाण्यासाठी संस्थान सज्ज झाले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. ‘धार्मिक स्थळे सुरू करण्यासंबंधी सरकारने परवानगी दिल्यानंतर घालून दिलेले सर्व नियम पाळून शिर्डीचे मंदीर खुले केले जाईल. दर्शनाची नवी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार तासाला साधारणपणे तीनशे तर दिवसभरात तीन हजार भाविक दर्शन घेऊ शकतील. यासाठी टाइम स्लॉट ठरवून देण्याच्या पद्धतीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे’, असे डोंगरे यांनी सांगितले.

कोरोना साथीचे संकट आल्यानंतर १७ मार्चपासून मंदिर बंद आहे. त्यामुळे साईबाबांचे लाखो भक्त मंदिर उघडण्याची वाट पाहत आहेत. उलट संकट काळात शिर्डीत येऊन साकडे घालणाऱ्यांची संख्या जास्त असते. आता तर एवढे मोठे संकट आलेले आहे. त्यामुळे मंदिर खुले होताच संकट टळले म्हणून किंवा टळावे म्हणून श्रद्धेने शिर्डीत येणाऱ्यांची संख्या वाढू शकते; मात्र, नव्या पद्धतीनुसार या सर्वांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भाविकांविना सजले मंदिर

गुरुपौर्णिमा हा शिर्डीचा मोठा उत्सव असतो. या काळात लाखो भाविक येथे येतात. या वर्षी मात्र भाविकांविनाच उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. संस्थानने त्याच पद्धतीने उत्सवाला सुरुवात केली आहे. उत्सवानिमित्त साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. पहाटेपासूनच धार्मिक विधी सुरू झाले आहेत. साईसच्चरित आणि बाबांच्या प्रतिमेची मिरवणूकही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत निघाली. या मिरवणुकीत संस्थानचे पुजारी उदय वाळुंजकर, दिलीप सुलाखे, विलास जोशी, चंद्रकांत गोरकर, मंदिर प्रमुख रमेश चौधरीही सहभागी झाले होते.

देणगी कार्यालय सुरू

या वर्षी उत्सवासाठी कर्नाटक येथील साईभक्त बसवराज आमली यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.  शनिशिंगणापूर येथील शनेश्वर लाइट डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. अनेक साईभक्तांनी साईबाबांना वस्त्र अर्पण व देणगी देण्यासाठी देणगी कक्ष सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंदिर परिसर प्रवेशद्वार क्रमांक चारच्या समोर देणगी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here