Shrigonda : मोबाईलवरून फोन केला म्हणून तिघांना बेदम मारहाण

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे मोबाईल वरून फोन का केला या कारणावरून ओंकार दादाभाउ वाघमारे, सुमित भाउसाहेब वाघमारे, संतोष वाघमारे या तीन तरुणांना दि.३ जुलै रोजी सागर बनकर व इतर ५ जणांनी लोखंडी रॉडने व लाकडी दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात ओंकार दादाभाउ वाघमारे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.

याबाबत सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील ओंकार वाघमारे व त्याचा मित्र सुमित कौठाळे हे दोघे काही कामानिमित्त शिरूर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गेले असताना तेथून सुमित कौठाळे याने आरोपी सागर बनकर याला फोन केला असता त्याने तो न उचलल्याने सुमित याने ओंकार याच्या मोबाईलवरून फोन करून १५०० रुपये उधारीची मागणी केली याचा राग येऊन सागर याने ओंकार याला तुझ्या फोन वरून फोन का केला, असे म्हणत त्याला शिवीगाळ केली.
त्यानंतर दोघेजण देवदैठण येथे माघारी आल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सुमित याने पुन्हा फोन करून तू कुठे आहे, तुला भेटायचे आहे, अशी विचारणा करत ओंकार  वाघमारे, सुमित वाघमारे, संतोष वाघमारे हे तिघे गावातील एका दुकानासमोर उभे असताना तेथे मोहन धोत्रे, दादा ओहळ, गणेश ओहळ यांना घेऊन तेथे आला व ओंकार व दोघांशी बाचाबाची सुरू केली. त्यावेळी त्या ठिकाणी सागर ओहळ व त्याच्या बरोबर आणखी एक आनोळखी तरुण दुचाकीवरून आले.
त्यावेळी तुझ्या मोबाईलवरून फोन का केला, असे म्हणत सागर बनकर व इतरांनी शिवीगाळ करत त्याच्या हातातील लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने ओंकार दादाभाउ वाघमारे, सुमित भाउसाहेब वाघमारे, संतोष वाघमारे यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात ओंकार दादाभाउ वाघमारे यांच्या फिर्यादीवरून सागर बनकर रा. देवदैठण, सागर ओहळ, मोहन धोत्रे , दादा ओहळ ,गणेश ओहळ व  एक अनोळखी इसम रा. पिंप्री कॉलदर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी फरार झाले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी देऊन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here