Editorial : वर्दीवरच हात

2

 प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

उत्तर प्रदेशात सत्ता कुणाची असली, तरी तिथे गुंडाराज चालते, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणीतील आकडेवारी पाहिली, तरी त्यावर शिक्कामोर्तब होते; परंतु लोकसंख्येची आकडेवारी तोंडावर फेकत उत्तर प्रदेशात गुन्ह्यांची संख्या कशी कमी आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात असतो. गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती किती चांगली आहे आणि त्यांचे काम कसे आहे, याचा गाैरव केला होता. अर्थात आताच उत्तर प्रदेश गुंडाराज झाले असे नाही. एखाद्या गुन्हेगारावर वेळीच कारवाई केली नाही, तर त्याचे स्तोम वाढत जाते. पोलिसही त्याला घाबरायला लागले, तर त्याची दहशत आणखी वाढत जाते आणि तो पोलिसांच्याच जीवावर उठतो, याचे ज्वलंत उदाहरण विकास दुबे याच्यावरून दिसते. कानपूरमध्ये विकास दुबे याला अटक करायला गेलेल्या पोलिस पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात जिल्हा पोलिस प्रमुखासह आठ पोलिस ठार तर सात पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. 

मृतांमध्ये बिल्हौरचे पोलिस क्षेत्र अधिकारी देवेंद्र मिश्र आणि एसओ शिवराजपूर महेश यादव यांचाही समावेश आहे. ज्या विकास दुबे याला अटक करायला हे पोलिस पथक गेले होते, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे. खून, खुनाचा प्रयत्न यांसह साठ गंभीर गुन्हे दाखल असताना एकाही प्रकरणात त्याला शिक्षा झाली नाही. याचा अर्थ पोलिसांचे गुंडांशी वेगळे संबंध असून पोलिसांनी तपासात त्रुटी ठेवल्या आहेत. आताही पोलिस एका खून प्रकरणातच विकास दुबे याला अटक करायला गेले होते.

मृत पोलिसांची संख्या आणि जखमी झालेल्यांची संख्या पाहता पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात कुणा एकाचा हात नसला पाहिजे. हे संघटितपणाचे भ्याड कृत्य असून त्याचा निषेध करावा, तेवढा थोडाच आहे. चौबेपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचे स्वरुप आणि त्याचा कालखंड पाहिला, तर गेल्या 30 वर्षांपासून गुन्हेगारी जगताशी विकास दुबे याचे नाव जोडले गेले आहे. त्याला अनेकदा अटकही करण्यात आली; मात्र अजूनतरी कुठल्याच प्रकरणात त्याला शिक्षा झालेली नाही. या दुबे प्रकरणाचा ठपका तरी काँग्रेसवर ठेवता येणार नाही. गेल्या तीस वर्षांत काँग्रेसचे तेथे कधीही सरकार नव्हते. मुलायमसिंह, मायावती आणि भाजपचेच सरकार तिथे सत्तेवर होते.

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी वाढायला ही सर्वंच सरकारे या ना त्या प्रकारे जबाबदार आहेत. 2001 मध्ये विकास दुबे याच्यावर पोलिस ठाण्यात घुसून भाजपचे राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केल्याचा आरोप होता. शुक्ला हत्याप्रकरण हायप्रोफाईल होते. इतकी मोठी घटना घडूनही एकाही पोलिस कर्मचाऱ्याने दुबेविरोधात साक्ष दिली नाही. न्यायालयात दुबे याच्याविरोधात कुठलेच पुरावे सादर न झाल्याने त्याची सुटका झाली. कानपूरच्याच शिवली पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहव्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्या प्रकरणातही दुबे याचे नाव होते. पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींनुसार, 2000 मध्ये दुबे याच्यावर रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दुबे याने कारागृहातूनच हा कट रचल्याचे बोलले जाते.

2004 साली एका केबल व्यावसायिकाच्या हत्येतदेखील दुबे याचे नाव आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार यातल्या अनेक प्रकरणांमध्ये दुबे याला अटक झाली; मात्र दरवेळी तो जामिनावर सुटला. याचा अर्थ पोलिसांनी त्याच्या पोलिस कोठडीसाठी प्रबळ पुरावे न्यायालयासमोर ठेवले नाहीत. 2013 मध्ये एका खून प्रकरणात दुबे याचे नाव आले होते. 2018 मध्ये त्याच्यावर चुलत भाऊ अनुराग यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचाही आरोप ठेवण्यात आला. त्या प्रकरणात अनुराग यांच्या पत्नीने विकाससह चार लोकांविरोधात फिर्याद दाखल केली होती.

प्रत्येक राजकीय पक्षात विकास दुबे याचा दबदबा आहे आणि त्यामुळेच त्याला आजवर अटक होऊ शकलेली नाही आणि अटक झाली तरी तो काही दिवसातच  बाहेर आला. विशेष म्हणजे एवढा मोठा गुन्हेगार असूनही त्याचा उल्लेख तेथील माध्यमे आदरातिर्थी करतात, यावरून त्याची दहशत किती आहे, याचा प्रत्यय यायला हरकत नाही. कानपूरजवळ विठूरच्या शिवली पोलिस ठाण्यांतर्गत येणारे बिकरू हे त्याचे मूळ गाव आहे. गावातील त्याचे घर एखाद्या किल्ल्यासारखे आहे. स्थानिक सांगतात की त्यांच्या मर्जीशिवाय कुणीही आत जाऊ शकत नाही. याचा अर्थ आता काहीतरी लपवण्यासारखे असते. 2002 मध्ये जेव्हा राज्यात बहुजन समाज पक्षाची सत्ता होती, त्या वेळी दुबे याचा बराच दबदबा होता. त्या काळात त्याने गुन्हेगारी जगतात चांगलाच जम बसवला. शिवाय गडगंज पैसा कमावला. गुंडगिरीच्या जोरावर त्याने अनेक जमिनी बळकावल्या. त्याच्यावर चौबेपूर पोलिस ठाण्यात दाखल सर्व प्रकरणे जमीन गैरव्यवहारांची आहेत. भूखंडाच्या या कथित बेकायदेशीर खरेदी-विक्रीतूनच दुबे याने कोट्यवधी रुपयांची माया जमवली. विठूरमध्येच त्याची काही शाळा आणि महाविद्यालये आहेत. गुंडगिरी आणि शिक्षण यांचा हा संबंध जरा विचित्रच वाटतो.

फक्त एका गावातच नाही तर आसपासच्या गावातही विकास दुबेचा दबदबा कायम होता. जिल्हा पंचायत आणि अनेक गावांमधल्या सरपंच निवडणुकीत दुबे याचा शब्द अंतिम असतो. त्याचे ऐकले नाही, की त्याचे परिणाम पाहूनच कुणी विरोधात जाण्याच्या भानगडीत पडत नाही. दुबे याच्या बिकरू गावात गेल्या 15 वर्षांपासून संरपंचाची निवड बिनविरोध होत आहे. दुबे याच्या कुटुंबातील लोकच गेल्या 15 वर्षांपासून जिल्हा पंचायत निवडणूक जिंकत आहेत. दुबे याचे वडील शेतकरी आहेत. त्यांना तीन मुले. त्यापैकी एकाची आठ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली. भावंडांमध्ये विकास दुबे मोठा. विकासच्या पत्नी रुचा सध्या जिल्हा पंचायत सदस्य आहेत.

दुबे याच्याविरोधात पोलिस ठाण्यात कितीही तक्रारी दाखल असल्या, तरी गावात त्याच्याविषयी वाईट बोलणारे कुणीही सापडणार नाही आणि कुणी त्यांच्याविरोधात साक्षही देणार नाही. शिवलीचे तत्कालीन नगर पंचायतीचे अध्यक्ष लल्लन वाजपेयी यांच्याशी झालेल्या वादानंतर विकास दुबे याने २००० मध्ये गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. लल्लन बाजपेयी आणि दुबे याची 22 वर्षांपासून दुश्मनी आहे. विकासने वयाच्या 17 व्या वर्षी प्रथम एक हत्या केली; परंतु त्या प्रकरणात त्याला कोणतीही शिक्षा भोगावी लागली नाही. त्यानंतर त्याचा गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा वाढत गेला आणि गुन्ह्यांचा आलेखही वाढला.

आता पोलिसांच्या खूनप्रकरणात पोलिसांनी त्याचा मामा प्रेम प्रकाश आणि नातेवाइक अतुल यांना चकमकीत ठार केले आहे. परिसरात विकासाचे अनेक शत्रू आहेत. सहारनपूरमधील एका प्रकरणात विकासवर हल्ला झाला. त्यानंतर त्याच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तो पाचशे पावलेही चालू शकत नाही. विकासचे गावात इतके वर्चस्व आहे, की महिला आणि पुरुष त्याच्याविरूद्ध काहीही बोलत नाहीत. तो आपल्या गावात पंडितजी म्हणूनही ओळखला जातो. 1991 मध्ये त्याने आपल्याच गावातील झुन्ना बाबाची हत्या केली. बाबांच्या जमिनीवर कब्जा करणे हा या हत्येचा हेतू होता. जुन्या काळाचे लोक जमिनीत दागदागिने ठेवत असत. विकासला हे माहीत होते. नंतर तो ठेकेदाराच्या हत्येकडे वळला. त्यानंतर त्याने 1993 मध्ये रामबाबू हत्याकांड घडवून आणले. त्यानंतर सिद्धेश्वर पांडे यांनी ही हत्या केली. तत्कालीन राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची पोलिस ठाण्यातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सतत दरोडे टाकून दरोडे टाकणा-या विकासची दहशत वाढत गेली. त्याचबरोबर जवळच्या कारखान्यांकडून तो खंडणी वसूल करायचा. कारखाना जितका मोठा असेल, तितके जास्त पैसे गोळा केले जात.

सहा वर्षांपूर्वी आपला प्रभाव वापरण्यासाठी त्याने पश्चिम उत्तर प्रदेशाकडे आपला मोर्चा वळविला. सहारनपुरात काही वादग्रस्त जागेची दलाली त्याने केली. तरुणांना प्रथम मद्य आणि खायला प्यायला दिले जाते. त्यांना महागडे कपडे आणि मोबाइल फोन दिले जातात. मुले एकदा, की व्यसनाधीन झाली, की तो त्यांना त्याच्या टोळीत सामील व्हायचा. गावात तो कुणालाच त्रास देत नाही. लग्नात मोठमोठे आहेर करतो. लोकांना मदत करतो. त्यामुळे गावात त्याच्याविरोधात कुणी साक्ष देत नाही आणि पोलिसही तपास नीट करीत नाहीत. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी साम्राज्य वाढले असून आता त्याने थेट वर्दीवरच हात टाकला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here