!!भास्करायण !! ‘गुरु’ विषयी जाणू काही…

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )

जीवनात गुरुचे स्थान अढळ असे आहे. समाज व्यवस्था किंवा संस्कृती कोणतीही असो, तिच्या उभारणीत आणि जडणघडणीत गुरुचा मोलाचा वाटा असतो. अखिल मानवजातीमध्ये गुरुचे स्थान अधोरेखित झालेले आहे. आपल्याकडे गुरु या शब्दाचा अर्थ ‘शिक्षक’ एवढाच अभिप्रेत धरला जातो. खरं तर, केवळ शिक्षक म्हणजे गुरु नव्हे. शिक्षक आणि गुरु यात थोडेसे अंतर आहे. गुरु या शब्दाचे इंग्रजीत सरळसरळ ‘टीचर’ असे रुपांतर केल्यामुळे चूक होते. इंग्रजीत गुरु शब्दाला प्रेसिप्टर असा शब्द आहे. याचाच अर्थ गुरु शब्दाची व्याप्ती शिक्षकाच्या पलिकडे आहे. शिकविणारा, ज्ञान देणारा, उपदेश करणारा, समुपदेशन करणारा, सुप्तगुण शोधून त्यांना विकसित करणारा, जगण्याची प्रेरणा देणारा, चुकते त्याला योग्य वाटेवर आणणारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसाला माणुसपणाची ‘ओळख’ देणारा, अशी भूमिका पार पाडणारी व्यक्ती म्हणजे गुरु!

गुरु या शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याची व्याप्ती शोधली पाहिजे. मानवी संस्कृती आणि समाज अस्तित्वात आला. भटक्या जीवन पद्धतीपासून, तर आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत माणूस येऊन ठेपला. या वाटचालीला लाखो वर्ष लोटली. मानवाच्या अथपासून ते इथपर्यंतच्या प्रवासात ‘वाटाड्या’चे महत्व वादातीत आहे. मानवी संस्कृतीमध्ये आणि त्याच्या जीवनातले विविध अंग आहेत. त्याच्या विकासासाठी खटाटोप करणारा, माणूस म्हणून जगण्यासाठी योग्य वाट दाखविणारा आणि चूकत असेल, तर ती शोधून चुकलेल्यास पुन्हा वाटेवर आणणार्‍याला वाटाड्या संबोधले जाते.

प्रारंभीच्या वाटचालीत मानव वनवासी होता. या अवस्थेत मानवी समाज अज्ञानी होता. अशावेळी अनेकांनी अनुभवातून आलेल्या प्रगल्पतेच्या माध्यमातून मानवी समाजाला पुढे नेले. त्याच्यामध्ये जिज्ञासा निर्माण केली. जिज्ञासा ही शोधाला आणि विकासालां प्रेरणा देते. असे प्रेरकच आपल्याला वनवासी, रानटी अवस्थेतून येथपर्यंत घेऊन आलेत. हे सगळे ‘प्रेरक’ मानवी समूहाचे गुरुच ठरतात. वनवासात असताना, माणसाला निसर्गाशी मैत्री करण्याचा आणि त्याच्याशी समरस होण्याचा  मार्ग, अशा अज्ञात वाटाड्यांनी दाखविला. वनचरांच्या सहवासातून काहींनी वनस्पती, प्राणी, पशू याबाबतचं ज्ञान मिळवलं. कोणत्या वनस्पती मानवी जीवनाला वरदान आहेत, ते शोधलं. यातूनच पुढे आयुर्वेद व निसर्गोपचार जन्माला आला! हे येर्‍या गबाळ्याचे काम निश्‍चितच नाही. ज्यांनी कोणी निसर्गाला जाणलं असेल, त्याला मानवी जीवनाशी बांधलं असेल, ते निश्‍चितच गुरुपदासाठीचे दावेदार ठरतात.

निसर्गाशी समरस होऊन मानवी जीवन समृद्धीकडे नेण्याचा मार्ग खुला झाला. मानवातील प्रगल्भांनी पशू, पक्षी, जलचर,  माती आणि मानवीजीवन याचा मेळ घालून एक प्रशस्त व विशाल सहजीवन अस्तित्वात आणले. याच सहजीवनामुळे त्याला अन्न मिळाले. धान्य व फळांची ओळख पटली. या ओळखीने मानवाला शेतीची प्रेरणा मिळाली. मानवाची अन्नासाठीची भटकंती संपली. तो स्थिरावला. निसर्गाच्या कुशित निवांतपणे विसावला. या स्थिरतेतून पुढे नद्यांच्याकाठी शेती आणि समृद्ध संस्कृती नांदू लागल्या! ज्यांनी कोणी ही किमया घडविली, ते किमयागार गुरुस्थानीच मानले पाहिजेत.

आज आपण अत्यंत प्रगत अशा अवस्थेत पोहोचलो आहोत. भौतिक, मानसिक, सामाजिक व सांस्कृतिक अशी विविध अंगे मानवाने विकसित केली आहे. या विकास प्रक्रियेत गुरु या शब्दाचा अमर्याद आशय मात्र संकुचित झाला. गुरु शब्दाचा केवळ व्यक्तीच संकुचित झाली असं नाही, तर त्यांचं अवमुल्यन झाल्याचं स्पष्टपणे जाणवतं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुची आठवण करताना, त्यांचे ऋण व्यक्त करतानाच गुरुचं अवमुल्यन कां झालं, याची कारणमिमांसा करणे अधिक महत्वाच ठरतं.
साधारणत: अठराव्या शतकात मानवाने भौतिक जीवनपद्धती स्वीकारली. या जीवनपद्धतीचा ‘भोगवाद’ हा अविभाज्य घटक असतो. आत्मिक व आंतरिक भौतिक सुखांचा शोध सुरु झाला. मानवाने या सुखांच्या शोधासाठी विविध शोध लावले. या शोधांनी माणसाला अशा काही वस्तू व साधने दिली, की तो या साधनांच्या स्वाधीन झाला. या वाटचालीत माणूसपण पराधिन झाले. माणसानं भौतिक जीवनपद्धतीच्या माध्यमातून भौतिक पद्धती जन्माला घातली. यात साधनांचं महत्व वाढलं आणि माणसाचं व माणूसपणाचं अवमुल्यन झालं!
मानवी जीवनपद्धतीचा अवमुल्यनातच सगळं सांस्कृतिक अवमुल्यनाची कारणं दडलेली आहेत. आज माणसाच्या हा संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, फेसबुक अशी अगणिक माध्यम आहेत. या माध्यमावर केवळ ‘गुग्गल  सर्च’ केला की, हवी ती माहिती आवश्यक ते ज्ञान मिळतं. त्यासाठी माणसाची गरज काय उरलेली नाही, इथं आपली नाळ आइ-वडील, नातलग, मित्र परिवार, समाज आणि त्यातील गुरु या नात्यांपासून दुरावली आहे.

आज माहिती व ज्ञान देणारे साधन उपलब्ध असल्याने गुरुजी किंवा शिक्षकांची अवहेलना होते. त्याविषयी आत्मियता आढळत नाही. मानव एका अहकांरात वावरत आहे. झालं एवढं अवमुल्यन पुरे, आता जर याच अहंकारात माणूस राहिला, तर विनाशाशिवाय काहीच हाती पडणार नाही. माहिती देणारा ‘गुग्गल’ आहे, पण जीवन शिक्षक देणारा गुरु कोठेय? तो नाही म्हणून प्रगत समाज आणि असुसंकृत माणसं असं विश्‍वाचं रुप बनलंय. हे रुप बदलायचं, तर मानवी नातेसंबंध, त्यातल्या त्यात हरवलेलं गुरुचं नातं शोधण्याची मोहीम सुरु झाली पाहिजे. असं झालं, तरच खर्‍या अर्थाने गुरुपौर्णिमा संपन्न झाली, असं म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here