श्रीरामपूर : शहरामध्ये काल आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यात कोरोनाग्रस्त मोठ्या नेत्याच्या पत्नी व गाडीचालकाचा समावेश आहे. तिसरा रुग्ण वॉर्ड नंबर दोनमधील आहे. तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २५ झाली आहे.

याबाबत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले, की येथील एका मोठ्या नेत्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या पत्नी व गाडीचालकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचप्रमाणे शहरातील वॉर्ड नंबर दोनमधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. या तिघांचा अहवाल काल प्राप्त झाला. त्यात तिघेही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अहवाल आल्यानंतर काल प्रशासनाने वॉर्ड नंबर दोनचा परिसर दि. १८ जुलैपर्यंत हॉटस्पॉट पॉकेट म्हणून घोषित केला असून सिल केला आहे. या परिसरातून नागरिकांना व वाहनांना ये-जा करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. रुग्णांच्या संपर्कातील ३६ संशयित व्यक्तींचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे. ते आज प्राप्त होण्याची शक्यता आहे.
श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे २५ रुग्ण आढळून आले आहेत. प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी, व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.