Editorial : वैज्ञानिकांचा इशारा

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

भारतात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. रुग्णसंख्या सात लाखांपर्यंत पोचली आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ही वीस हजारांच्या घरात आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतात आणि जगातही कोरोनाची धास्ती घेतली आहे. कोरोनावर लसी शोधण्याच्या कामाला गती देण्यात आली असली, तरी आतापर्यंत वारंवार अमुक तारखेला लस बाजारात येईल, असे दावे करण्यात आले.

कोरोनावरील लस ही काही अन्य उत्पादनांसारखी नाही. कोणतेही वैद्यकीय संशोधन नेमक्या याच तारखेला जाहीर होईल किंवा त्याचे उत्पादन अमुक तारखेलाच येईल, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही; परंतु भारतात मात्र १५ ऑगस्टलाच कोरोनावरील लस बाजारात येईल, असे सांगितले जात आहे. कोरोनावर भारतात निर्माण केलेली लस स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर जारी करण्याच्या सरकारच्या खटाटोपावर देशातील वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदही खरे तर स्वायत्त संस्था.

वैद्यकीय ज्ञान असलेल्या या संस्थेने पुढील महिन्यात कोरोनावरची स्वदेशी लस स्वातंत्र्यदिनापर्यंत तयार झालीच पाहिजे, असे फर्मान संबंधित औषध कंपन्या, रुग्णालये व वैज्ञानिक संस्था यांना सोडावे, हे केवळ आश्चर्यकारकच नाही, तर टीकेला निमंत्रण देणारे आहे. कोरोना होऊ नये, म्हणून लस बाजारात आणली जाणार आहे. खरेतर सध्या कोरोनावर प्रभावी औषध शोधण्याची गरज होती. त्याऐवजी सरकार आणि आयसीएमआरसारख्या संस्थेने वेगळा मार्ग अनुसरला आणि त्याचीही डेडलाईन ठरवून दिली, तीच आता टीकेचा विषय झाली आहे.

आयसीएमआरने वाद झाल्यानंतर स्पष्टीकरण दिले असले, तरी त्यातून वस्तुस्थिती झाकली जात नाही. जगात वेगवेगळ्या कंपन्यांनी कोरोनावरील लस लवकरच बाजारात येईल, असा दावा केला आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी या लसींचा उपयोग होणार असला, तरी खरेच एवढ्या लवकर त्या लसी बाजारात उपलब्ध होतील का आणि झाल्या, तर त्यांची परिणामकारकता काय असेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्याचे कारणच जागतिक आरोग्य संघटनेच्या विशेष दूतांच्या वक्तव्यात दडले आहे. पुढच्या काही महिन्यांत भारतासह जगात कोरोनावरील लस उपलब्ध असेल, असे जे सांगितले जाते, त्यावरच या दूतांच्या वक्तव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक लस मिळवण्यासाठी जगाला अजून अडीच वर्षे वाट पाहावी लागेल, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केले आहे.

डाॅ. नाबारो यांनी भारतातील एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन दोन दिवस होत नाहीत, तोच लगेच भारतात १५ आॅगस्टला कोरोनावरील लस उपलब्ध होईल, अशी घोषणा करण्यात आली. त्यात डाॅ. नाबारो यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. फक्त परिणामकारक लस मिळणे महत्त्वाचे नसून, तिची मोठ्या प्रमाणात निर्मिती होणेही गरजेचे असल्याने यासाठी इतका काळ लागेल असे डाॅ. नाबारो यांचे म्हणणे आहे. सध्याच्या घडीला कोरोनावर कोणतेही औषध किंवा उपाय उपलब्ध नाही.

जर कोणी असा दावा करत असेल, तर त्यांच्याकडे पुरावा मागितला पाहिजे असे त्यांचे म्हणणे विचारात घेण्यासारखे आहे. जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनावरील लसीची निर्मिती सुरू असून अनेकांनी मानवी चाचणीही सुरू केली आहे. यासंबंधी विचारण्यात आले असताना नाबारो यांनी सांगितले, की एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याचा संसर्ग होणार नाही, याची आपल्याकडे काहीच माहिती नाही.

लस आल्यानंतरही ती दिल्यानंतर तो पूर्णपणे सुरक्षित आहे, की नाही याची खातरजमा करण्यास वेळ लागेल. अनेक गोष्टी अद्याप सिद्ध व्हायच्या आहेत, असे नाबारो यांनी सांगितले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रस्तावित लसी सुरक्षित आहेत का, म्हणजे एखाद्याला ती दिल्यानंतर त्याचे वेगळे परिणाम तर होणार नाहीत ना? जेव्हा तुम्ही लसीचा वापर करता, तेव्हा त्याचे काही उलट परिणाम होणार नाहीत याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.

डाॅ. नाबारो यांच्या या इशा-यानंतर भारतातील वैज्ञानिकांनीही हीच बाब उचलून धरली आहे. वैज्ञानिकांनी याबाबत म्हटले आहे, की लसीची खूप निकड असली, तरी ती तयार करण्यासाठी अनेक महिने लागत असताना दोन महिन्यांच्या कालावधीत ती तयार करायला सांगणे, यात कुठलाच समतोल दिसत नाही. आयसीएमआर म्हणजे भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने लस स्वातंत्र्यदिनापर्यंत आणण्याची केलेली घोषणा आशादायी असली, तरी त्यात धोकाही आहे. प्रतिकारशक्ती विषयक तज्ज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितले, की आयसीएमआरचे पत्र अयोग्य असून त्याची भाषा, आशय हा तांत्रिकदृष्टया वास्तववादी पातळीशी मेळ खाणारा नाही. प्रा. रथ यांनी या चाचण्यांकडे आपण आशादायी दृष्टिकोनातून पाहत असल्याचे स्पष्ट केले आहे. सार्स सीओव्ही लस घटक व त्याच विषाणूवरील डीएनए लस घटक आपण तयार केले आहेत, ही चांगली प्रगती आहे पण त्याचे निकाल काय येतात याची वाट बघावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स’चे संपादक अमर जेसानी यांनी, लसीचा पहिला आणि दुसरा टप्पा एकत्रितरित्या करण्यात येणार असून तो ही इतक्या कमी वेळात राबविण्याची सूचना वैज्ञानिकदृष्टय़ा अतार्किक आहे, असे म्हटले आहे.  वैद्यकीय चाचण्यांचा तिसरा टप्पा महत्वाचा असून यात मोठया संख्येने दोन गटांमध्ये या लसींची परिणामकता तपासली जाते. यात एका गटाला लस दिली जाते आणि दुसऱ्या गटाला न देता यामधील बदल नोंदविले जातात. याला किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो.

त्यानंतरच लस सार्वजनिकरित्या उपलब्ध केली जाते; परंतु आयसीएमआरच्या निर्णयामध्ये हा तिसरा टप्पा पूर्णपणे वगळून थेट लस उपलब्ध करण्याचे आदेश आहेत. लसनिर्मिती हे वैज्ञानिक संशोधन असून जगाचे डोळे याकडे लागले आहेत. राजकीय धोरणामुळे यातील काही टप्पे वगळले किंवा अतिघाई केल्यास हे संशोधन अपयशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा देशातील वैज्ञानिकांच्या विश्वासार्हतेचादेखील प्रश्न आहे, असा इशाराच जेसानी यांनी दिला आहे.

विषाणूतज्ज्ञ उपासना राय यांनीही कोरोना विषाणूविरोधात लस तयार करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे; पण आपण त्यात जास्त घाई करीत नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे, असा सावधानतेचा सल्ला दिला आहे. वैज्ञानिक व कंपन्यांवर जास्त दबाव टाकून सार्वजनिक वापरासाठी चांगली लस तयार करू शकू अशातला भाग नाही, असे त्यांनी म्हटले आहे. लस तयार करण्यासाठी १२ ते १८ महिने हे वैद्यकीय चाचण्यांसाठी लागतात. १५ ऑगस्ट या मुदतीचा विचार केला, तर कंपन्यांकडे चाचण्यांसाठी एक महिनाच आहे.

इतकी कमी मुदत त्यांनी कशी दिली, इतक्या कमी वेळात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण होतील याचे पुरावे कोण देणार आहेत, यातील सुरक्षा व औषध विकास तसेच इतर टप्प्यांचे काय, वैद्यकपूर्व अभ्यास तरी पूर्ण करण्यात आला आहे का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली आहे. जर जास्त घाई केली जात असेल, तर त्यात जोखीम आहे यात शंका नाही, असा इशारा त्या देतात. लसीमुळे किती प्रमाणात प्रतिपिंड तयार होतात, याची चाचणी महत्त्वाची असते. त्यालाच महिना ते दोन महिने लागतात. नंतर लसीच्या सुरक्षा चाचण्या करून मग मानवी चाचण्यांना लस सिद्ध होते. काही काळ वाट पाहायलाच पाहिजे; परंतु तेवढा धीर सरकारकडे नाही.

रेमेडिसीवीर या आैषधांच्या फार चाचण्या न करताच अमेरिकेच्या अन्न व आैषध प्रशासन विभागाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार हे आैषध बाजारात आणले, तसाच हा प्रकार आहे. कोरोना विषाणूवर या वर्षांत तरी लस येणे शक्य नाही, असे मत हैदराबादच्या सीसीएमबी या सीएसआयआर संचालित संस्थेचे प्रमुख राकेश के. मिश्रा यांनी व्यक्त केले आहे. आयसीएमआरने लसीच्या चाचण्यांबाबत घाई करण्यासाठी जे पत्र लिहिले, तो अंतर्गत संवादाचा भाग असू शकतो. त्यात मानवी चाचण्या वेगाने करण्याचा हेतू असेल; पण जरी सगळे काही पुस्तकी आदर्शानुसार पार पडले, तरी अजून लस येण्यास सहा ते आठ महिने तरी लागतील. याचा अर्थ या वर्षी तरी लस उपलब्ध होणार नाही.

टीका झाल्यानंतर मात्र आयसीएमआर आपण देशवासीयांची सुरक्षितता आणि हिताच्या रक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्टीकरण दिले. लस विकसित करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने करण्याचा निर्णय जागतिक मान्यताप्राप्त नियमांनुसारच घेण्यात आला आहे. लसीची मानवी चाचणी व प्राण्यांवरील चाचणी या एकाच वेळी केल्या जाऊ  शकतात, असे समर्थन ‘आयसीएमआर’ने केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here