भास्करायण : भोगवादी संस्कृतीचे आव्हान!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१)

बलात्कारासारख्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा व्हावी, आजन्म जन्मठेपेची कायद्यात तरतूद करावी, येथपासून तर अशा गुर्‍हेगारांना भर चौकात विवस्त्र करुन फटके मारावेत आणि त्यांचे केमिकल रासायनिक कॅस्ट्रेशन (वंधत्व) करावे, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होतात. अशा संतप्त प्रतिक्रिया स्वाभाविक असल्या, तरी सगळ्याच सामाजिक समस्यांवर कायदा हाच इलाज; असे मानण्याचं कारण नाही. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकाने अशा घटना कां घडतात, याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

जो समाज  सभ्यतेची आणि संस्काराची भाषा बोलतो, तो समाज असे विकृत प्रकार कां घडतात, याला जबाबदार कोण, या प्रश्नाची उत्तरे शोधण्याची तसदी घेत नाही. समाजात गुन्हा घडण्यापेक्षा, गुन्हे घडणार नाहीत; यासाठी आपला समाज, सामाजिक संघटना, संसद काय करते, हे अधिक महत्वाचे ठरते.आपल्या तथाकथित सभ्य समाजाची व भारतीय संस्कृतीची आज  काय दुरवस्था झालीय? संस्कार व संस्कृतीचे गोडवे गाणारे या दूरवस्थेवरील इलाजासाठी काय करतात? मुलाखती, मोर्चे,अंादोलन केली की संपले कर्तव्य? तसेच सभ्य समाजाच्या उभारणीची अपेक्षा कोणाकडून ठेवायची? वाहिन्यां बघण्यात आणि पैसा कमविण्यात दंग असणार्‍या पालकांकडून, धंदा बनलेल्या शिक्षण क्षेत्राकडून, जाणिवा व संवेदना बोथट झालेल्या समाजाकडून व्हॅलेन्टाईन डे, फ्रेंडशिप डे, रेव्ह पार्ट्यात रमलेल्यांकडून की लपतछपत डर्टी सिनेमा आणि अश्‍लिल क्लिप्स् बघणार्‍या लोकप्रतिनिधींकडून?

वास्तव हे आहे की, आपल्या समाजाला चंगळवादी आणि भोगवादी संस्कृतीचं ग्रहण लागलंय. आज चित्रपटातील व मालिकातील अनेक दृश्ये आक्षेपार्ह, सभ्यतेची ‘ऐशी की तैशी’ करणारी असतात. या दृश्यांवर कोणताच अंकुश नाही की आक्षेप नाही. ‘अ‍ॅटमसाँग’च्या नावाखाली जो शृंगारिक धुडगूस चाललाय, त्याला विरोध होत नाही. उलट असले अ‍ॅटमसाँग शालेय वा महाविद्यालयीन स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यकम्रात सादर होतात! पालक व शिक्षकच या गाण्यांची निवड करतात व ‘हुबेहुब’ नाचायला लावतात! घराघरात घुसलेल्या छोट्यापडद्यावर काय झळकतंय? तारुण्य नासवतील असे कार्यक्रम बिनदिक्कतपणे दाखविले जातात. अश्‍लिलतेचंं उदात्तीकरण होतंय. नात्यांना सुरुंग लावणार्‍या मालिकांच पेव फुटलंय. या प्रकारांना आक्षेप घेतला जात नाही किंवा सेन्सारचे बोर्डाने कठोर कारवाई करावी, यासाठी कोणीही दबाव आणित नाही. व्हॅलेन्टाईन डे, फ्रंेडशीप डे राजरोसपणे समाज व संस्कृतीच्या उरावर बसून साजरे होताना, बंद करा हा तमाशा असे बजावण्यासाठी मोर्चे, आंदोलने होत नाहीत की,कॅण्डल मार्च निघत नाहीत. हा आपल्या समाजाचा, विचारवंताचा, बुध्दीजीवी आणि संस्कृतीच्या काळजीवाहकांचा दुटप्पीपणाच ठरतो.
आपल्या भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीवर नेहमीच टीका होत आली आहे. प्रदीर्घ काळाची समाजरचना बदलायची, तर त्यासाठी प्रदीर्घ प्रक्रिया आवश्यक असते. यासाठी कोणते प्रयत्न संघटना व समाज करतो? तसेच एखाद दोन विकृतांनी दूष्कृत्य केले म्हणून समस्त पुरुष समाजाला दोषी किंवा आरोपी ठरतात का? बलात्काराच्या घटनेनंतर जो प्रक्षोभ ऊसळतो, त्यात तरुण सर्वात आक्रमक होते. अशी टिका या युवकांवर अन्याय करणारी ठरत नाही कां?
पुरुषप्रधान समाजरचनेचे समर्थन करता येणार नाही. तसेच एकजात पुरुष समाज नसलेला, विकृतअसेही म्हणता येणार नाही. एक प्रश्‍न असाही निर्माण होतो तो असा व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे निमित्त प्रतिसाद देणार्‍या युवा पिढीला निर्दोष ठरवायचे का? येथे दोन्हीही घटक समान दोषी ठरतात, हे वास्तव मान्य केले पाहीजे.अशा विकृत पार्ट्या, डे, फेस्टीवल थांबविण्यासाठी आपण व समाज काय कृती करतो? याविरुद्ध टिकाकारांकडून, सामाजिक संघटना, महिला संघटनांकडून आवाज का उठत नाही? याचीही यानिमित्ताने सामाजिक चिकित्सा झाली पाहीजे. एकमेकांना दोष देण्यापेक्षा युवकांना एकत्रितपणे नविन समाजरचनेसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here