गिडेगांव येथील प्रकार ! पोलिसांच्या कृत्याचा गावातून तीव्र निषेध

नेवासा | प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
प्रेमाला नकार दिलाच्या रागातून एका युवकाने प्रेयसीच्या थेट घरात घुसून तिच्या लहान चुलूत बहिणीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात ही मुलगी जबर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. गिडेगांव येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली. याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांनाच पोलिसांनी मारहाण केली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण गावातून पोलिसांच्या कृत्याचा निषेध व्यक्त होत आहे.
नेवासा तालूक्यातील गिडेगांव येथील इयत्ता बारावीत शिक्षण घेत आसलेल्या एका विद्यार्थीनीला गावातीलच एका युवकाने प्रेमाची मागणी घातली होती. मात्र या महाविद्यालयिन युवतीने या युवकाला नकार दिला. त्यानंतर या मुलाने अनेक वेळा या मुलीचा पाठलाग पुरवून छेडछाड केली. मात्र मुलीचा ठाम नकार असल्याने या युवकाने ‘तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली होती. तरीही या युवतीने त्याला नकार दिला.
आपल्या प्रेमाला नकार दिल्याचा राग मनात धरून या युवकाने थेट युवतीचे घर गाठले. मात्र, त्यावेळी ही मुलगी शेतात कामासाठी गेली होती. त्यामुळे घरात असलेल्या तिच्या 12 वर्षाच्या चुलत लहान बहिणीवर चाकूने सपासप वार करून पसार झाला. दरम्यान, ही घटनेनंतर मुलीच्या घरच्यांनी जखमी झालेल्या बहिणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, प्रेयसीच्या वडिलांनी मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्याऐवजी उलट तिच्या वडिलांनाच मारहाण केली. पोलिसांच्या या कृत्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेत प्रेयसी घरात सापडली नाही. अन्यथा या युवतीला मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असते तसेच तिचा खून ही घडण्याची शक्यता होती. तरीही पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता फिर्यादी वडिलांनाच मारहाण केल्यामुळे त्यांचे हे कृत्य चोर सोडून सन्याशाला फाशी या प्रमाणे असल्याचे दिसून आले. दरम्यान, या प्रकरणी विचारणा करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.