Parner : ‘अंतर्गत राजकारणाला कंटाळल्यानेच ‘ते’ नगरसेवक राष्ट्रवादीत’

रोहित पवार यांचे स्पष्टीकरण; शिवसेवनेच्या वरिष्ठांना अगोदरच कल्पना

नगरः पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश हा शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून झालेला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबत अगोदरच कल्पना देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. रोहित पवार यांनी दिले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना योद्ध्यांच्या मदतीसाठी साहित्य वाटपासाठी आमदार पवार हे नगर शहरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. या पक्षाचे पारनेर शहरातील नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याने महाविकास आघाडीत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा राज्यभरात रंगली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी या पक्षप्रवेशापूर्वी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केलेली होती. जर या नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला नसता, तर त्यांनी भाजपात प्रवेश केला असता. त्यामुळे पारनेरमधील महाविकास आघाडीची सत्ता गेली असती, म्हणून हा

निर्णय घेण्यात आल्याचे आ. लंके यांनी सांगितल्याचे आ. पवार म्हणाले.
भाजप देशातील इतर राज्यांमध्ये विरोधी पक्षाची सरकारे पाडत असून, तसा प्रयोग त्यांनी महाराष्ट्रातही करण्याचे प्रयत्न चालविलेले आहेत; मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते अनुभवी आणि हशार आहेत. त्यामुळे भाजपची डाळ इथे शिजणार नाही. हे सरकार

पाच वर्षांचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करील, असा विश्वास व्यक्त करून पवार म्हणाले, की  हे लोकहिताचे सरकार असून, अडचणीच्या काळातही चांगले काम करत आहे. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली जात

आहे. तरीही सरकार खंबीरपणे काम करत आहे. या कोरोना संकटाच्या काळात केंद्राने आणि राज्याने जनतेच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. या काळात राजकारण करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

भाजप नेत्यांना टोला

भाजप नेते इंधन दरवाढीविरोधात आवाज उठवतील, अशी अपेक्षा होती; परंतु तसे न करता ते ‘सोशल मीडिया’वर इतरांची बदनामी करण्याचे सातत्याने प्रयत्न करतात. चांगल्या कामालाही ते विरोध करतात. त्यांना सर्वसामान्य जनतेचे काही देणेघेणे नाही. जर थोडी तरी जनतेची काळजी असेल, तर राज्यातील भाजपचे नेते पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात तसेच केंद्र आणि राज्याला पुरविलेल्या दर्जाहीन व्हेंटीलेटर संदर्भात आवाज उठवतील, असा टोला आ. पवार यांनी लगावला. 

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here