आदिवासी भागातील शेतकर्‍यांच्या हाताला काम द्या- पिचड

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

अकोले : आदिवासी भागातील शेतकर्‍यांची आवणीचे कामे,शेत नांगरणीचे कामे व गाळ करण्याची कामे ही विशेष बाब म्हणून मनरेगा व रोजगार हमी योजनेमध्ये घेऊन या शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आ. वैभवराव पिचड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व रोजगार हमी योजना मंत्री यांच्याकडे केली आहे.
सध्या आदिवासी भागातील शेतकर्‍यांची आवणीचे कामे चालू असून यासाठी शेत नांगरणी, गाळ करणे यासाठी 5 ते 10 हजार रुपये मजुरी व इतर खर्च येतो. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भागातील आदिवासी समाजातील लोकांच्या हाताला चार महिन्यापासून काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.हे सर्व शेतकरी घरी बसून आहेत. सध्या आदिवासी वसतिगृह बंद असल्याने त्यांची मुलेही घरी आहेत. शासनाकडे खावटी कर्जे मागणी करूनही मिळाले नाही, एकाधिकार खरेदी योजनेअंतर्गत हिरडा खरेदीही केलेले नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांच्या हातात पैसे येत नाही. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. अशा आर्थिक संकटात सापडलेले आदिवासी शेतकरी हे भातआवणी, वरइ आवणी, नागली, आवणीची कामे, शेत नांगरणी व गाळ करणे यासाठी येणारा खर्च करू शकत नाही. हा शेतकरी वर्ग सर्वच बाजूने हतबल झालेला आहे. त्यामुळे त्यांची शेती पडीत राहण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीत त्यांच्या हाताला काम मिळावे व त्यांच्या शेतीच्या कामाला येणारा खर्च वाचविण्याच्या दृष्टीने शेत नांगरणी, गाळ करणे व आवणी करणे ही कामे मनरेगा/ रोजगार हमी योजनेत विशेष बाब म्हणून घेतल्यास यासाठी लागणारा खर्च आदिवासी शेतकर्‍यांचा वाचेल व त्यांना रोजगार हमी योजनेतून रोजंदारीही मिळेल व शेतीची कामेही होतील. या सर्व बाबीचा विचार करून ही कामे मनरेगा व रोजगार हमी योजनेमध्ये विशेष बाब म्हणून घेऊन या आदिवासी भागातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here