Karjat : राजगृह आमचं काळीज, हा आमच्या काळजावरील हल्ला – भास्कर भैलुमे 

राजगृहावरील हल्ल्याची चौकशी करत त्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना देताना भास्कर भैलुमे आणि कार्यकर्ते 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या मुंबई, दादर येथील राजगृह परिसरातील कुंड्यांची व सीसीटीव्ही फुटेजची तोडमोड करून दगडफेक केल्या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यातील आरोपींना तात्काळ अटक करून यामागचे खरे मास्टरमाइंड समोर येणे आवश्यक आहे. तसेच हा संपूर्ण प्रकार केवळ आंबेडकरी समुदायाच्या भावना भडकवून त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी समाजकंटकद्वारे सुरू आहे. तरी संपूर्ण आंबेडकरी जनतेने या प्रकरणी संयमाने वागावे, अशी अपेक्षा भास्कर भैलुमे यांनी व्यक्त केली.

दि ७ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन अज्ञात समाजकंटकांनी सदर प्रकार केला असून त्यांची संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. ते पोलिसांना कालच देण्यात आले आहेत. याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव आंबेडकर यांनी कायदेशीर फिर्याद दिलेली आहे. या घटनेचा तपास उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याने याचे सत्य लवकरच बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, जातीय अत्याचाराच्या प्रकरणी आंबेडकरी जनतेमध्ये असंतोषाची भावना असल्याची जाणीव असणाऱ्या समाजकंटकांनीच आंबेडकरी समुदायाला भडकवून रस्त्यावर आणण्याच्या दृष्टीकोनातून असे प्रकारचे कृत्य केलेले आहे, असेच प्राथमिक निदर्शनास येत आहे.
राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असणाऱ्या राजगृह या इमारतीचे तातडीने राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे. यासह वरील ठिकाणी संरक्षणासह अन्य उपाययोजना करण्यात यावे, अशी मागणी भास्कर भैलुमे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here