Shrirampur : कोरोनाच्या कहरमुळे अर्धे श्रीरामपूर बंद अर्धे चालू

प्रातिनिधिक छायाचित्र

बंदवरून मर्चंट असोसिएशन विरोधात व्यापारी सक्रिय

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर – शहरांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढून 25 पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून शहरातील अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करुन बंद केले आहेत. तर चालू असलेल्या भागामध्ये लोकांचा वावर स्वैरपणे सुरु आहे. त्यातच मर्चंट असोसिएशनने आजपासून चार दिवस शहरातील बाजारपेठ बंद करण्याची घोषणा केलेली असताना सदरचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन न घेतल्याने काही व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शहरातील काही भाग बंद तर काही सुरू, असे चित्र निर्माण झाले आहे. परंतु यामुळे खरोखर कोरोना आटोक्यात येईल का, असा प्रश्न सामान्य लोक विचारित आहेत.

शहरातील वार्ड नंबर 2, पूर्णवाद नगर, चोथानी हॉस्पिटल परिसर, इंदिरानगर आदी भागांमध्ये कोरोनाचे पेशंट आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने या भागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून सर्व रस्ते बंद केले. लोकांनी बाहेर पडू नये. यासाठी नगरपालिकेचे मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्याचे उपाय योजले आहेत. नगराध्यक्षा अनुराधा आदिक या सातत्याने शहरांमध्ये स्वयंस्फूर्तीने बंद पाळून कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्यापारी असोसिएशन ने गुरुवार ते रविवार चार दिवस दुकाने बंद ठेवून बंद पाळण्याचे आवाहन केले.

मात्र, सदरचा निर्णय घेताना सर्व व्यापाऱ्यांना व दुकानदारांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न उपस्थित करून अशोक उपाध्ये व त्यांचे सहकारी यांनी गेल्या चार महिन्यापासून व्यापार नसल्याने छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार यांची अवस्था खूप बिकट झाली आहे. मोठे व्यापारी होलसेल मध्ये आपल्या मालाची विक्री करून पैसे कमवत आहेत. परंतु छोट्या-मोठ्या लोकांकडे बंद ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. तेव्हा या बदलाला विरोध करून आपले व्यवहार पूर्ववत सुरू ठेवावेत, असे आवाहन मेन रोड, शिवाजी रोड येथे फिरून केले. व्यापा-यांमधील या मतभेदांमुळे श्रीरामपूरची बाजारपेठ सुरू राहणार की बंद होणार हे आज कळेलच. परंतु कोरोनाचा मुकाबला करताना सर्वांनी एकजूट राखून निर्णय घेतला तर कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.

शेजारी बेलापूर गावांमध्ये सर्व व्यापारी, दुकानदार, नागरिक यांनी कडकडीत गाव बंद ठेवले त्याच पद्धतीचा निर्णय श्रीरामपूर शहरातही होण्याची आवश्यकता आहे. शहराचा जो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्या व्यतिरिक्त इतर भागातही स्वयंस्फूर्तीने काही बंधने पाळली गेल्यास शहरातून को रोनाचा नायनाट होण्यास वेळ लागणार नाही. शहरातील नागरिकांची घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी शासकीय यंत्रणेने पावले उचलण्याची मागणी केली आहे.

नवीन व्यापारी संघटनेचा उदय होणार

शहरामध्ये पाच हजार पेक्षा जास्त दुकानदार असून विद्यमान व्यापारी असोसिएशनमध्ये मात्र पाचशेपेक्षा जास्त व्यापारी सभासद नाहीत. इतर व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता व्यापारी असोसिएशन काम करीत असल्याने शहरातील सर्व छोटे-मोठे व्यापारी, भाजीपाला विक्रेते, सर्व प्रकारचे दुकानदार यांना सामावून घेऊन लवकरच श्रीरामपूर व्यापारी महासंघाची स्थापना करण्यात येणार असल्याचे संकेत काही व्यापाऱ्यांनी दिले आहे. छोटे व्यावसायिक, मध्यम व्यापारी व मोठे व्यापारी सर्वांना बरोबर घेऊन हा व्यापारी महासंघ कार्यरत होणार आहे.

बाहेरून येणाऱ्यांना आवरा

शहरांमध्ये रात्रीच्या वेळी व दिवसादेखील छुप्या मार्गाने बाहेर गावचे अनेक लोक दाखल होत आहेत. विशेषतः मुंबई आणि औरंगाबाद येथून मोठ्या संख्येने हे लोक येऊन घरात लपवून ठेवले जात आहेत. त्यांनी दवाखान्यातून आपली तपासणी करून घेऊन स्वतः धोका टाळावा व शहरातील लोकांचाही धोका कमी करावा, अशी अपेक्षा असून शहरातील सर्व रस्त्यांची नाकाबंदी करून बाहेरगावाहून विशेषत: रात्रीच्या वेळी येणाऱ्यांना प्रतिबंध करण्याची व बेकायदेशीरपणे येणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.  वार्डनंबर दोनमध्ये सध्या कार्यरत पोलिसांची व काही लोकांचे मधूर संबंध असल्याने या गोष्टीवर पडदा टाकला जात आहे. यासाठी या भागात नवीन पोलिसांची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here