!!भास्करायण !! लोकशाहीचा तांडा चालला कोणीकडे….?

0
भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )
सौजन्याची ऐसी तैसी याची प्रचिती सध्या राजकीय क्षेञात येत आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकावर  एकदम खालच्या पातळीवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. यातून आपल्या राजकारणाची पातळी किती खालीवली आहे, हेच दिसते. या महाभागांमुळे राजकारण व समाजकारणातल्या पुढच्या पिढीला काय दिशा व शिकवण मिळत आहे, हा देशाच्या समाजजीवनासाठी चिंतेचा विषय आहे. 
उच्चपदस्थ नेत्यांमध्ये सध्या वाक्युध्द पेटले आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक असताना प्रसिध्दी माध्यमे, विशेषत: दृश्य वाहिन्या त्यांना व्यापक प्रसिध्दी देत आहेत. फुकटाची  प्रसिध्दी मिळत असल्याने, या महाभागांची ‘आधीच मर्कट,त्यात मद्य प्याला’ अशी स्थिती होत आहे. ‘टी.आर.पी.’ वाढविण्याच्या नादात, देशाच्या लोकशाहीचा ‘टी.आर.पी.’ रसातळाला जात आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी अशा विकृतीला थारा देता कामा नये. त्याचप्रमाणे  लोकांनीही असले विदूषकी चाळे खपवून घेतले जाणार नाहीत, असे या महाभागांना ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे.
खरे तर सार्वजनिक जीवन आणि खाजगी जीवन यांचा परस्पर संबंध जोडण्याचे कारण नाही. राजकीय व सार्वजनिक क्षेत्राचे निकष अत्यंत वेगळे असतात.सार्वजनिक जीवनात काम करणार्‍यावर सामाजिक बंधने असतात आणि ती पाळणे बंधनकारक असते. सामाजिक बंधनात नितीमत्ता, सुसंस्कृतपणा, सभ्यता, चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकी समाविष्ट असते.अशा व्यक्तींकडून म.गांधी म्हणतात त्याप्रमाणे ‘समाजाचे विश्‍वस्त’ अशी भूमिका अपेक्षित असते. आपल्या सार्वजनिक क्षेत्राचे सध्याचे चित्र याच्या अगदी उलटे आहे. भ्रष्टाचाराचे सरळ सरळ उदात्तिकरण होत आहे.
राजकीय पक्षांचे प्रवक्ते निर्लज्जपणे  भ्रष्ट नेत्यांची भाटगिरी करताना दिसतात. सुसंस्कृतपणा व सभ्यता  तर नावालाही उरलेली नाही. लोकशाहीत बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ स्वैराचाराला मुभा दिलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सरळसरळ स्वैराचार बोकाळला आहे. ज्यांच्याकडून समाजाचे विश्‍वस्त अशी भूमिका अपेक्षित आहे, ते समाजाचा विध्वंस करायला निघाले आहेत. अशा विध्वंसाला माध्यमेही भान व जबाबदारी विसरुन अमाप प्रसिध्दी देवून उत्तेजन देत आहे. त्यामुळे ‘ प्रसिध्दीसाठी वाट्टेल ते ’ अशी वृत्ती वाढत आहे.
राजकीय क्षेत्रात खरे तर धोरण, विकास, अर्थकारण, सामाजिक प्रश्‍न,परराष्ट्र निती, रोजगार निर्मिती, भवितव्याच्या उपाययोजना यावर भाष्य व चर्चा अपेक्षित असते.तसे न होता राजकीय प्रचारात एकमेकाचे उणेदुणे काढणे, चारित्र्यहनन करणे, शिवराळपणे भाषणे करणे, आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक करणे, लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करणे, एकमेकांच्या नकला करणे, विदुषकी चाळे करणे, अश्‍लिल विनोद करणे, एकमेकांच्या आई-बापांचा उध्दार करणे, इतकेच नव्हे तर शारिरिक व्यंगावर टिका टिपणी करणे, असे घाणेरडे प्रकार चालतात आणि खपवून घेतले जातात. कोणाला प्रेयसीवर भाष्य करुन ‘लव्हगुरु’ पदवी बहाल केली जाते, कोणाच्या पत्नीचा शोध लावला जातोय, कोणाला ‘बुद्धू’ किंवा ‘माकड’ अशी शेलकी विशेषणे लावली जात आहेत.
आपल्या लोकशाहीचा विकास इथपर्यन्त येवून पोहचलाय !
लोकशाहीच असं वस्त्रहरण, अध:पतन होण्यास जनता आणि माध्यमे जबाबदार आहेत. आपण या महाभागांचा वायफटपणा, भंपकपणा मुकाटपणे बघतो. त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली माध्यमेही खतपाणी घालतात. लोकशाहीमध्ये फक्त मत देणे ऐवढेच लोकांचं आणि प्रसिध्दी देणं इतकच माध्यमांचे काम नसते. लोकशाही समृध्द करणे आणि त्यासाठी लोकशाही व्यवस्थेवर म्हणजे राजकारणी, सार्वजनिक जिवनात वावरणार्‍यांवर अंकुश राखणे, हे लोकांचे आणि माध्यमांचे कर्तव्य असते. आपण आणि प्रसार माध्यमे आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याने आपली  लोकशाही मोकाट बनली आहे.
भ्रष्टाचारी नेते ताठ मानेने वावरतात, गुन्हेगार नेते तुरुंगातून सुटल्यावर त्यांचे स्वातंत्र्य सैनिकाच्या थाटात जंगी स्वागत करण्यात येते. शिवराळ, चारित्र्यहनन, चिखलफेकीच्या भाषणांना टाळ्या पडतात. अशा नेत्यांचा जयजयकार होतो. त्यांना लोकप्रियताही लाभते. लोकच अशा चुकीच्या लोकांना लोकशाहीत आश्रय देत असतील, तर ह्या  मोकाटांना ऊत येणार नाही तर काय होईल? लोकशाहीला कुठे न्यायचे हे लोकांच्या हातात असते. लोकशाहीतील गुण व दोष याचे धनीही लोकच असतात. याचे कारण लोकशाहीत लोक हेच लोकप्रतिनिधींचे जन्मदाते असतात.
मतपेटीद्वारे सज्जनाचा गर्भ पोसायचा, की दुर्जनाचा हे जनतेने ठरवायचे असते. जनता जर सध्या  जे घडतंय ते निमूटपणे बघणार असेल, माध्यमे आपल्या ’टी.आर.पी.’ साठी वाट्टेल त्याला प्रसिध्दी देणार असतील, तर आपल्या लोकशाहीचं अध:पतन थांबणे अशक्य आहे. या वाटचालीतून आपल्या लोकशाहीचं  बेधुंदशाहीत रुपांतर होणे अटळ आहे.अशास्थितीत लोकांनी आणि माध्यमांनी आपल्या लोकशाहीचा तांडा कोठे चाललाय, याचे आत्मपरिक्षण करण्याची आणि हा तांडा वेळीच रोखण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here