भाजपाच्या दडपशाहीला काँग्रेस घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नांवर

सरकारला जाब विचारतच राहू! : ना. थोरात

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
संगमनेर : काँग्रेस विचारांच्या काही संस्थांची ईडीकडून चौकशी होणार अशा बातम्या काही प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष व त्यांचे केंद्रातील सरकार यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार? चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्याने ईडीचा वापर करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.ना. थोरात पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी चीनची घुसखोरी व 20 जवानांच्या बलिदानावर पंतप्रधान मोदी तसेच केंद्र सरकारला सातत्याने जाब विचारण्याचे काम केले. इंधन दरवाढीवरूनही सरकारला प्रश्न केले तसेच कोरोनाचे संकट आल्याबरोबर हे अतिशय गंभीर असून सरकारने त्यावर तातडीने पावले उचलली पाहिजेत असा सल्ला राहुल गांधी यांनी सरकारला दिला होता. परंतु या सरकारला विरोधकांनी प्रश्न विचारलेले चालत नाहीत. लोकशाहीवर यांचा विश्वासच नाही फक्त विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी दडपशाहीचा, दहशतीचा मार्ग अवलंबायचा हीच भाजपा सरकारची निती राहिली आहे.
भाजपाच्या या दहशतीला, दडपशाहीला काँग्रेस जुमानत नसून राष्ट्रहितासाठी, जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेसचे नेते यापुढेही संघर्ष करतच राहतील. विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नात त्यांना कदापी यश येणार नाही, असेही थोरात म्हणाले.
राजगृहाची तोडफोड करणार्‍यांना कठोर शासन करा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची समाजकंटकांनी केलेली तोडफोड अत्यंत निषेधार्ह आहे. राजगृह हे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. आमच्यासारख्या आंबेडकर अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करुन या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
राजगृह हे लोकशाहीवर संविधानावर श्रद्धा असणा-यांचे प्रेरणास्थान आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती या वास्तू़शी जोडल्या गेलेल्या आहेत, असेही थोरात म्हणाले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here