Shrirampur : बांबुर्डी घुमट होणार डिजिटल व्हिलेज – डॉ. फरांदे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – बांबुर्डी घुमट या गावात स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना झाल्यापासून उपलब्ध होणा-या माहितीद्वारे पाण्याचा काटेकोरपणे वापर कसा करायचा हे कळेल. त्यामुळे याचा फायदा गावातील सर्व शेतक-यांना होणार आहे. हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पाद्वारे विद्यापीठाने विकसित केलेले विविध सुधारित तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविले जाईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून हे गाव डिजिटल व्हिलेज म्हणून नावारुपास येईल, असे मत अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पांतर्गत बांबुर्डी घुमट हे गाव डिजिटल व्हिलेज म्हणून विकसीत करण्यात येणार असून सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन डॉ. अशोक फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, कृषि प्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, अहमदनगर येथील सेवा संस्थेचे प्रमुख उमेश लगड, विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य शैलेंद्र अडसुरे, बांबुर्डी घुमट गावचे सरपंच जनार्दन माने व उपसरपंच उपस्थित होते.

डॉ. अशोक फरांदे यावेळी बोलतांना पुढे म्हणाले की, माती परीक्षण, उच्च उत्पादन देणा-या उत्तम पिकांच्या जाती, फळ लागवडीसाठी तंत्र व यंत्राचा वापर, पाण्याचा काटेकोर वापर, शेती मालाला चांगला बाजारभाव मिळणा-या बाजारपेठा व त्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर खूप महत्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी प्रकल्पाचा उद्देश व ग्राम विकासामध्ये प्रकल्पाचा असणारा सहभाग व त्यातून अपेक्षित असणारा विकास या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. मुकुंद शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

वनमहोत्सवाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम कड यांनी तर आभार नारायण माने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. मंगल पाटील, डॉ.गिरीश भणगे, बांबुर्डी घुमट या गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शासनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here