!!भास्करायण !! आयाराम-गयाराम,हे राम!

भास्कर खंडागळे ,बेलापूर [ ९८९०८४५५५१ ]
पारनेरचे पाच नगरसेवक स्वगृही परतले! आम्हाला काय आनन्द झाला सांगावा? आठ दिवसापूर्वी हातावरचं शिवबंधन सोडून या पाच जणांनी त्याच हातावर घड्याळ बांधलं. चक्क आठ दिवसात घड्याळ सोडून पुन्हा निष्ठेनं शिवबंधन बांधलं. ते देखिल दस्तुरखुद्द मुख्यमंञी उद्धव ठाकरे या वाघाच्या हस्ते! राज्याच्या राजकीय इतिहासाची आज गर्वाने छाती फुगली असेल. अर्थात छपन्न इंचाचं लिमिट असल्याने, त्यापेक्षा अधिक कोणीही छाती फुगवू शकत नाही, हा भाग वेगळा!

काय मजा आहे नाही? आठ दिवसापूर्वी माजी आ. विजय औटी यांच्यावर हे पाचजण नाराज झाले. या नाराजीतून त्यांनी पक्षत्याग करण्याचा निर्णय घेतला. आजकाल कोणीही त्यागाला तयार नसतो, लोकहो! त्यामुळे हा त्याग ‘मोलाचा ‘ ठरतो. शिवसेनेला सोडचिठ्ठी देत या महाशयांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला. आता याला कोणी मुहुर्ताचा सोडून गंधर्वाचा केला,असं हिनविल. पण नाही. असं हिनवणं म्हणजे या पाच जणांच्या त्यागाचं मातेरं करणं होय.असो. मातोश्रीवर हा प्रश्न मिटला आणि पारनेरचे पाच वीर स्वगृही परतले!

आजकाल राजकारणच असं झालंय बघा. पक्ष सोडून कोणी जाऊ नये म्हणून पक्षांतरबंदी कायदा करावा लागतो. इतकी महान आपली लोकशाही आणि थोर राजकारणी! सकाळी शिवबंधनात अडकायचेत, राञी घड्याळ बांधायचे तर पहाटे कमळाबाईकडे जायचे! आ रा रा….एवढं करुन ‘मी नाही त्यातली न कडी लावा आतली’ असा पतिव्रतेचा आव आणायचा. हि आपल्या महान लोकशाहिची थोर परंपरा बनलिय. धन्य,धन्य ती लोकशाही!

आणिबाणी पूर्वकाळ हा निष्ठा, तत्वे, मूल्यांचा होता. तत्वांसाठी वाट्टेल तो त्याग करणारी माणसं होती. प्रसंगी तत्वासाठी खूर्चीला लाथ मारणारे लालबहाद्दूर शास्ञी चिंतामणराव देशमुखांसारखे नेते होते. पुढे राजकारणात भजनलाल यांनी  आयाराम-गयाराम संस्कृती आणली. त्यांनी तर कमालच केली.आख्ख्या मंञीमंडळासह पक्षांतर करुन टाकले! लोकशाहीचा विजय असो!

येथून पुढे मग या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याची सर्कसच राजकारणात अवतरली. या पार्श्वभूमीवर स्व.राजीव गांधी या सदगृहस्थ पंतप्रधानाने पक्षांंतर बंदी कायदा आणला. यामुळे पक्षांतराला आळा बसेल असे वाटले होते. पण या कायद्यात एक तरतूद आहे. दोन तृतियांश सदस्यांनी फुटून वेगळा गट स्थापन केला तर,ते पक्षांतर मानले जाणार नाही. ती फूट मानली जावून या गटाला मान्यता दिली जाईल!झालं. या तरतूदीमुळं भलतंच घडलं.’करायला गेले गणपती आणि झाला मारुती’ यानुसार पक्षच फोडायची नवी रित आली. एकट्यादुकट्याने नाही तर समुहाने’ एकमेका साह्य करु अवघे करु पक्षांतर ‘रितीने सामुदायिक पक्षांतरे सुरु झाली. ते पक्षांतर न मानता फूट मानली जावून तिला मान्यता कायदेशीर मिळाली.लोकशाही जिंदाबाद !

नव्वदीच्या दशकात तर पक्ष फोडीला उधाणच आले. रातोरात पक्ष फूटू लागले. आज या पक्षाचं सरकार तर उद्या दुस-याचं  पक्षाचं सरकार अस्तित्वात येवू लागले. महाराष्ट्रासारखे नितीमूल्ये जपणारे राज्यही यातून सुटले नाही. स्व.सुधाकरराव नाईक मुख्यमंञी व शरद पवार केन्दिय मंञी असताना जनता दलाचे बारा आमदार काँग्रेसमध्ये गेले.अशीच शिवसेनाही फुटली. एकेकाळचे शिवसेनेचे वाघ असलेले भुजबळ राञीतून ‘लखोबा’बनले! अशी राजकारणाची न्यारी त-हा राजकारणात सुरु झाली.

सन १९१४ मध्ये भाजपची केन्द्रात सत्ता आली. मग तर विरोधी सरकारे पाडून पक्ष फोडून आपला राज्याभिषेक करायचा सपाटाच सुरु झाला.खरंतरं भाजप हा स्वतःला तत्वनिष्ठ समजतो. मूल्ये जपणारा समजतो. पण कृती माञ उफराटीच करतो. भाजप एवढी सरकारे पाडून स्वपक्षाचा राज्याभिषेक अन्य कोणत्याही पक्षाने केला नाही. विरोधक फोडायचे, घोडेबाजार करायचा आणि आपला पक्ष घोड्यावर बसवायचा ही नवीच राजनिती भाजपने आणली आहे. विरोधी सरकारे पाडून स्वपक्षाची सरकारे स्थापायचा उच्चांक करुनही स्वतःला सुसंस्कृत, सभ्य, नितीमूल्ये जोपासणारा म्हणवायचे, हे म्हणजे ‘सौ चुहे खाँ के बिल्ली चली हज ‘अशातलाच प्रकार म्हणायचा!

अर्थात या घृणास्पद खेळाची सुरुवात काँग्रेसने केलेली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार तर या खेळात कसलेले. त्यांनी तर १९७८ मध्येच राज्यातील काँग्रेस फोडून पुलोद स्थापन केले. तशा अर्थाने शरद पवार हे राज्यापुरते फोडाफोडीचे जनक म्हणजे आद्यनेते ठरतात! माजी मुख्यमंञी देवेन्द्र फडणविस यांनी यावर कळस चढविला. गेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी त्यांनी ‘भाजप प्रवेश’हा खेळच ‘तिकिट’ लावून सुरु केला. काँग्रेस, राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदारांना भाजपात आणले. काँग्रेसने व पवारांनी जे पेरले तेच फडणवीस पेरते झाले!

तर हे असे आहे. लोकशाही ही सर्कस बनलीय. कोणी कधीही, कशाही संधी साधून उड्या मारायच्या. निष्ठेचा, तत्वाचा मुलामा देत पक्षांतर करायचं. तिथे जमलं नाही तर, पुन्हा निलाजरेपणे स्वगृही परतायचं. यात निष्ठावान कार्यकर्त्यांचे काय, या प्रश्नाचं काय उत्तर आहे? पक्ष व नेते कार्यकर्त्यांचे जोरावर मोठे होतात. पण स्वार्थ आला की, नेते निष्ठावान कार्यकर्त्यांना वा-यावर सोडून पदे मिळवतात. निष्ठा जपणारा कार्यकर्ता फाटलेलाच राहातो. हे सगळं बघून आयाराम-गयाराम,हे राम!असेच मनातून निष्ठावान सामान्य कार्यकर्ता म्हणत असेल….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here