प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
संचारबंदीमध्ये नागरिकांचे पिक कर्ज व इतर बँकेशी संबंधित कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता शनिवारी व रविवारी ११ व १२ जुलै २०२० रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी बीड शहरातील सर्व बँका त्यांच्या कार्यालयीन वेळेप्रमाणे सर्व ग्राहकांसाठी चालू ठेवण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

संपूर्ण बीड शहरात दिनांक १ ते ९. जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) अन्वये पूर्णवेळ संचारबंदी जाहीर केली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये या करिता उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांची बँकेशी संबंधित कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याने सदर आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
