Karjat : निमगाव गांगर्डा येथील सीना धरण 51 टक्क्यांवर पोहोचले…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

मागील काही दिवसापासून सीना नदी पाणलोट क्षेत्रात होणा-या दमदार पावसामुळे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण 51 टक्यावर पोहोचले असल्याची माहिती, उपविभागीय अधिकारी बाजीराव थोरात यांनी दिली आहे.

सीना धरण निर्मितीपासून इतिहासात पहिल्यांदाच जुलै महिन्यात सीना धरण पाणलोट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने सीना धरण निम्यावर भरले आहे. यामुळे येथील लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या आशा आणखीन पल्लवित झाल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसाने पाण्याची आवक चांगली आली आहे. या कर्जत तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या सीना धरणाची पाणी साठवण क्षमता 2400 द.ल.घ.फू.असून मृतसाठा 552 द.ल.घ.फू. तर गाळ 185 दलघफू आहे. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी सीना धरण पाणलोट क्षेत्राची परिस्थिती पाहता नुकत्याच सोडण्यात आलेल्या कुकडी आवर्तनातून मागील काही दिवसांपूर्वी कुकडी आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे अवघे दोन दिवस पाणी सोडण्यात आले होते.
यावेळी धरणामध्ये अवघे 38 दलघफू पाण्याची आवक आली होती. आज दि.10 रोजीचा धरण पाणलोट क्षेत्रातील आजमितिचा पाणीसाठा 1251 द.ल.घ.फू आहे. यापूर्वी सीना धरणात परतीच्या पावसाच्या पाण्याची आवक आल्याचा इतिहास आहे. यंदाच्या वर्षीचा अपवाद वगळता सुरूवातीच्या पावसात सीना धरण निम्यावर भरल्याने सीना लाभक्षेत्रातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उपविभागीय अधिकारी बाजीराव थोरात यांनी सीना धरण पाणलोट क्षेत्रातील सध्याची परिस्थिती पाहता यंदा धरण ओव्हरफ्लो होईल, असा अंदाज आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितला आहे. तर धरण पाणलोट क्षेत्रातील साठा वाढत राहिल्यास यंदा लाभक्षेत्रातील पाणी नियोजन चांगल्यापैकी होईल असे, सीना धरण शाखाधिकारी प्रविण भांगरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here