Rahuri : 120 टक्के खरीप पेरणी पूर्ण – कृषी अधिकारी ठोकळे

प्रातिनिधीक छायाचित्र

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी परिसरात पावसाचा अधिक जोर पाहता खरीप पेरण्यांमध्ये शेतकर्‍यांची चांगलीच आघाडी घेतली आहे. कृषि विभागाच्या निर्देशांकानुसार राहुरीमध्ये 120 टक्के खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी दिली आहे.

राहुरी परिसरामध्ये मान्सून पूर्व व मान्सून काळात वरूणराजाची कृपादृष्टी पहावयास मिळाली. राहुरी कृषि विभागाकडे यंदाच्या वर्षी खरीप क्षेत्र कमी करण्यात आले होते. मागील पाच वर्षाची सरासरी पाहता कृषी अनुसंधान केंद्राने खरीप क्षेत्र कमी केले होते. परंतु चालू वर्षी सर्वत्र पाण्याची समाधानकारक परिस्थिती तर दुसरीकडे पावसाची कृपा पाहता शेतकऱ्यांमध्ये अधिकच उत्साह दिसून आला. परिणामी राहुरी तालुका कृषि विभागाने घेतलेले 16 हजार 120 हेक्टर क्षेत्रावरील खरीप नियोजन पूर्णपणे यशस्वी ठरले आहे. 16 हजार 120 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होईल अशी अपेक्षा असताना शेतकर्‍यांच्या पाठबळामुळे राहुरी तालुक्यात 19 हजार 404 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे.

कापूस, सोयाबीन, मका व बाजरी या पीकांना शेतकर्‍यांनी सर्वाधिक पसंती दिली. ऊस क्षेत्रातही चांगलीच वाढ झाल्याने आगामी काळात कारखान्यांसाठी राहुरीत मुबलक ऊस उपलब्ध राहण्याची अपेक्षा आहे. 3 हजार 683 हेक्टर क्षेत्रावर बाजरीचे नियोजन असताना 6 हजार 90 हेक्टर क्षेत्रावर बाजरी पेरा पूर्ण झाला आहे. 1 हजार 702 हेक्टर क्षेत्रावर मका पीकाचे नियोजन असताना 1 हजार 906 हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झालेली आहे. सोयाबीन साठी 2 हजार 34 हेक्टर क्षेत्र ग्राह्य धरले असताना शेतकर्‍यांनी 2 हजार 480 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे.

कापूस 7 हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन असताना 7 हजार 628 हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी झालेली आहे. तूर व मूग पेरणीलाही शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला आहे. भुईमूग साठी 522 हेक्टर क्षेत्र ग्राह्य असताना 246 हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पेरणी झालेली आहे. 2 हजार 125 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली आहे. 4 हजार 847 हेक्टर क्षेत्रावर चारी पीके घेण्यात आलेली आहेत. कांदा लागवड 577 हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झालेले आहे. याप्रमाणे खरीप हंगामात एकूण 30 हजार 334 हेक्टर क्षेत्रावर विविध पीकांना शेतकर्‍यांनी पसंती दिली आहे. खरीप पीकांची 120 टक्के पेरणी पूर्ण झाली. तर चारा पीके, ऊस, कांदा यांसह झालेली लागवड पाहता एकूण 180 टक्के क्षेत्रावर पीके घेण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांसह कृषि विभागामध्ये खरीप आकडेवारी वाढलेला पाहता उत्साह दिसून येत आहे.

दरम्यान, राहुरी परिसरात पावसाचा मारा सुरूच आहेत. अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांचे खरीप पेरण्यांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड कृषि विभागापर्यंत आलेली आहे. यासाठी कृषि विभागाने कृषि सेवकांना शिवारफेरी द्वारे शेतकऱ्यांच्या  समस्या समजून घेण्याचे आदेश दिलेले आहेत. शेतकर्‍यांना कृषि विभागामार्फत मदत केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राहुरीत सरासरी 444 मिमी पाऊस पडल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे. अधि प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरीप पीकांचे पाने पिवळे पडत आहे. तसेच खरीप पेरणी वाया जाण्याची भिती असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडले आहे.

शेतकऱ्यांनी अधिक पावसाबाबत घाबरून न जाता उपाययोजना कराव्यात-  ठोकळे

कपाशी, घास, सोयाबीन, टोमॅटो, वांगी यांची पाने पिवळी पडत आहेत. अधिक पाऊस झाल्याने शेतातील पाणी बाहेर काढावे. त्यानंतर कॉपर अ‍ँक्सी क्लोराईड 25 ग्रॅम पावडर प्रति 10 लिटर पाण्यात खोडाजवळ (50 मिली) औषधाची आवळणी करावी. सोबत 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून ह्युमीक अ‍ँसिडची आवळणी करावी. पाऊस सलग 5 ते 6 दिवस सुरू राहिल्यास 8 दिवसानंतर बाविस्टीन 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आवळणी करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी केले ओह.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here