प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
तालुक्यातील क-हेटाकळी येथे अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी व हातभट्टी दारू विक्री होत आहे. वारंवार पोलीस प्रशासनाला लेखी व तोंडी सूचना देऊन तसेच रास्तारोको आंदोलन करून सुद्धा पोलीस प्रशासन विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करत नाही. पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितेश कल्याण गटकळ यांनी दिला आहे.
नितेश गटकळ म्हणाले, सध्या एवढ्या कोरोना या रोगासारख्या भयंकर परिस्थिती असतानाही अवैध दारू विक्रीला कोणत्याही प्रकारचा आळा बसलेला नाही. उलट शेवगांव येथून मोठ्या प्रमाणात या विक्रेत्यांना घर पोहोच दारू मिळत आहे. दारू विक्री होत असतांना गावातील नागरिकांना व महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शेजारच्या गावातून जास्त प्रमाणात लोक दारू पिण्यासाठी येत असल्याने गावात रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

या दारू विक्रीमुळे गावाला कोरोना या रोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व गावकऱ्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून ही अवैध दारू विक्री थांबावी. अन्यथा कोणत्याही क्षणी गावकऱ्यांच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते नितेश गटकळ यांनी दिला आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे, चंद्रकांत लबडे, जमीरभाई शेख, शरद ढाकणे उपस्थित होते.
