शहरात दोन अति संक्रमित क्षेत्रांत वाढ; संगमनेरमध्ये 16 रुग्ण

नगर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत 26 जणांची भर पडली. त्यात एकट्या संगमनेरमधील दहा जण आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी बागरोजा हडको आणि बुरुडगाव रस्ता ही दोन अति संक्रमित क्षेत्रे जाहीर केली असून तिथे अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.
नगर शहरात सारसनगर, आशा टाॅकीज चाैक आणि गुलमोहर रस्त्यावर प्रत्येकी एक रुग्ण आढळला. पुणे जिल्ह्यातील एकाचा जिल्हा रुग्णालयातील अहवाल होकारात्मक आला. नेवासे तालुक्यातील एक, राहाता तालुक्यातील लोणी येथील एक तर संगमनेर तालुक्यातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी नगर शहरातील बागरोजा हडको आणि बुरूडगाव रस्ता हे दोन्ही परिसर 24 जुलैपर्यंत अतदि संक्रमित क्षेत्र तर त्या भोवतालचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे.
या झोनमध्ये सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा बंद राहणार आहेत तसेच या परिसरात नागरिकांच्या संचारावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. अति संक्रमित क्षेत्रात अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बफरझोनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
भिंगारमध्ये आतापर्यंत 21 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर सात जण कोरोनामुक्त झाले. 108 जणांचे अहवाल नकारात्मक आले. 38 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. येणे बाकी आहे. नगरमधील एका वस्त्रदालनात काम करणाऱ्या तिघांचे कोरोना अहवाल होकारात्मक आले. ते भिंगारचे आहेत. त्यामुळे येथील कोरोना रुग्ण वाढतच चालले आहेत. एकाच कुटुंबातील रुग्णसंख्या जास्त असण्याचे प्रमाण येथे जास्त आहे. आता माळगल्लीतदेखील नव्याने दोन बाधित सापडले. खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट कोरोना समितीचे डॉ. श्याम जयस्वाल, सनियंत्रण अधिकारी रमेश साके, अभियंता महेंद्र सोनावणी, अशोक फुलसौंदर, गणेश भोर, शिशिर पाटसकर व मयूर पिल्ले हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्याची व्यवस्था कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातच करण्यात आल्याने धावपळ कमी झाली आहे. भिंगार प्रमाणेच नागरदेवळे व वडारवाडीतदेखील कोरोना रुग्ण आढळले आहेत. या भागात ग्रामपंचायत दक्षता घेत आहे.
महिलेच्या मृत्यूबाबत माैन
भिंगार परिसरातील एका महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला; मात्र तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला नाही. नातेवाइकांना फक्त अंत्यसंस्काराला बोलविण्यात आले होते. नगर परिसरात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही वृद्ध महिला कोरोनाबाधित होती, की नाही, हे सांगण्यात आले नाही. भिंगारमधून तिचे नातेवाइक अंत्यसंस्काराला गेल्यामुळे त्यांना तपासणी व विलगीकरणासाठी ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.