Shrigonda : घोडेगाव सोसायटीचा कारभार; उपनिबंधकाचे आदेश धाब्यावर; अधिकार नसतानाही सचिवांच्या पावत्यांवर सह्या

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील घोडेगाव सोसायटीमध्ये लाखो रुपयांचे घोटाळे झाल्याची तक्रार सोसायटीचे चेअरमन आणि सचिवाच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर अहमदनगर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी दि. २० फेब्रुवारी २०२० पासून  संस्थेचे सचिव सचिन गंगाराम मचे यांचे सह्यांचे अधिकार कमी केले. तरीही गेली चार महिने म्हणजे दि. २० जून २०२० अखेर सचिव सचिन गंगाराम मचे यांनी सह्यांचा अधिकार वापरून सभासदांना दाखले आणि जमा पावत्या दिलेल्या आहेत. उपनिबंधकांचा आदेश धाब्यावर बसवून या सोसायटीचा कारभार चालू आहे, असा आरोप बापू भानुदास  मचे  यांनी केला आहे.

घोडेगाव सोसायटीचे चेअरमन गंगाराम भानुदास मचे हे असून, त्यांचे चिरंजीव सचिन गंगाराम मचे यांना सचिव केलेले आहे. तर कुटूंबातीलच काही व्यक्ती संचालक आहेत. या सोसायटीचा गेल्या अनेक वर्षापासून अजब कारभार चालू आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून, त्यांच्याशी आर्थिक तडजोडी करून सभासदांच्या नावावर खोटी नाटी कर्जे चढविली जात आहेत. काही सभासदांची खोटी नाटी कर्जे शासनाच्या दि. ३० सप्टेबर २०१९  अखेरच्या थकबाकीत बसून ती माफही झाली आहेत. या कर्जाचा मलिदा ज्यांनी खाल्ला  त्यांना माफी देऊन शासनाने हा फटका पदरात घेतला आहे. आंधळ दळतयं आणि कुत्र पीठ घातयं अशी शासनाची अवस्था या सोसायटीने केली आहे.

या घोडेगाव सोसायटीची ९ मे १९६१ रोजी स्थापन झाली. तिला ५९ वर्षे पूर्ण झाली आहेत. अत्यंत चांगली चाललेली ही सोसायटी गंगाराम भानुदास मचे यांच्या ताब्यात आल्यापासून, या सोसायटीत तुफान भ्रष्टाचार बोकळला असल्याचा आरोप चेअरमन गंगाराम मचे यांचे सख्खे बंधू बापू भानुदास मचे यांनी केला आहे. बापू मचे यांच्या मते, या सोसायटीत सुमारे २०० सभासद आहेत. त्यापैकी सुमारे ५० सभासदांच्या नावावर कर्ज काढलेली आहेत. त्यापैकी २५ सभासदांना अजिबात माहिती नसतांना त्यांच्या बनावट सह्या करून लाखो रुपयांची कर्जे चेअरमन यांनी काढली आहेत. तीन मयतांच्या नावावरही आणि बेबीबाई पांडुरंग अभंग या अनोळखी महिलेच्या नावावर आज देखील कर्ज दिसत आहे. ज्यांच्या नावावर जमीनच नाही, अशा देवकर कुटुंबियांच्या नावावर देखील लाखो रुपयांची कर्जे चढविली आहेत.देवकर कुटुंब इंदोर येथे राहाते. त्यांच्या नावावर जमीनही नाही. तरीही त्यांच्या नावावर कर्ज कसे चढविले ? त्यांच्या सह्या इंदोरला जावून आणल्या काय? असाही आरोप बापू मचे यांनी केला आहे.

या संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून संस्थेचे दप्तर चौकशीसाठी ताब्यात घ्यावे. संस्थेचे चेअरमन एवढे निर्ढावलेले आहेत. कि, ते कोणालाच दप्तर ताब्यात देणार नाहीत. कारण हे दप्तर त्यांचा जीव कि प्राण आहे. आख्खी सोसायटी चेअरमनने एका मोठ्या पिशवीत भरून ठेवलेली आहे. सोसायटीच्या ७८ सभासदांनी संस्थेची चौकशी करून बोगस कर्जातून सभासदांची मुक्तता करावी व संस्था अवसायनात (लिक्विडेशन) काढावी, अशी मागणी केली आहे. आढळगाव जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकारी या सोसायटीच्या कर्ज व्यवहारामध्ये पूर्णपणे बरबटलेले आहेत. त्यांना कर्ज माहितीसाठी पाठविलेले  रजिस्टर ए. डी. चे पत्र त्यांनी प्रेषकाचे नाव पाहून स्वीकारले देखील नाही. मालक घेत नाही असा पोस्टमनचा शेरा मारून ते मला परत आल्याचे बापू मचे म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here