इंदोरीकर महाराजांना समर्थन… पण बेकायदेशीर अध्यात्मिक संदर्भ वगळावेत

0
ओझर : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले यांच्याशी संवाद साधला. यावेळी आध्यत्मिक आघाडीचे जिल्हा समन्वयक बबन मुठे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे आदी. (छाया : रुपेश सिकची)

धर्मग्रंथातील बेकायदेशीर संदर्भ वगळण्यासाठी शासनाने समिती गठीत करावी

भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशध्याक्ष आचार्य तुषार भोसले यांची मागणी

सुभाष भालेराव। राष्ट्र सह्याद्री

पिंपरणे: इंदोरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य धर्मग्रंथातील संदर्भाला धरून आहे; मात्र ते कायदेशीरदृष्ट्या विसंगत आहे. एखाद्या विधानावरून त्यांना दोषी ठरवत त्यांनी आयुष्यभर केलेले प्रबोधनाचे कार्य विसरता येणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची अध्यात्मिक आघाडी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शासनाने धर्मग्रंथातील बेकायदेशीर संदर्भ वगळण्यासाठी समिती गठित करावी व समितीच्या निर्णयाची माहिती सबंध कीर्तनकारांना द्यावी, असे आवाहन भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले.

पुत्रप्राप्ती बाबत वादग्रस्त विधान केल्यावरून अडचणीत आलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या निवासस्थानी जाऊन आचार्य तुषार भोसले यांनी आज भेट घेतली. भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबनराव मुठे यांनी ही भेट घडवून आणली.

इंदोरीकर महाराज यांची भूमिका समजून घेतल्यानंतर आचार्य भोसले यांनी राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, हभप. शालिनिताई देशमूख, हभप. किरण महाराज शेटे, तात्या थोरात, विशाल त्रिपाठी, भागचंद मुठे, उपस्थित होते.

आचार्य भोसले म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. इंदोरीकर महाराज याच वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माची पताका घेऊन काम करत आहेत. आयुष्यभर त्यांनी प्रबोधनाचे मोठे कार्य केले. तरुणांना अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न केला. समाजातील विकृती वेगळ्या शैलीत समोर आणल्या व त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे काम करत असताना धर्मग्रंथातील संदर्भ देऊन एखादी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीच गोष्ट आजच्या कायदेशीर विसंगत आहे म्हणून काही लोक त्यावर बोट ठेवत इंदोरीकर महाराजांना दोषी ठरवत असतील तर हे योग्य नाही. धर्मग्रंथांमध्ये कालबाह्य झालेले अनेक संदर्भ आहेत. आताच्या कायद्याशी ते सुसंगत नाहीत. असे संदर्भ सांगितले जाऊ नये असे वाटत असेल तर शासनाने कालबाह्य व नियमबाह्य असलेले संदर्भ काढण्यासाठी एखादी समिती गठित करावी व कीर्तनकार महाराजांना त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन आचार्य भोसले यांनी केले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिर बंद आहेत. केंद्र शासनाच्या आदेशाने देशभरातील मंदिरे नियम पाळून दर्शनासाठी व पूजाअर्चेसाठी खुली करण्यात आली आहेत. असे असताना महाराष्ट्रात मात्र मंदिर कुलूपबंद आहेत. याबाबत आम्ही नुकतीच राज्यपाल महोदयांची भेट घेतली व त्यांना मंदिरे खुली करण्यासंदर्भात निवेदन दिल्याचेही आचार्य भोसले यांनी सांगितले.

शिवसेनेने हिंदुत्ववाद सिद्ध करावा
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साह्याने सत्तेत आलेली शिवसेना आता हिंदूत्ववादी राहिली नाही. त्यामुळे हिंदू धर्मावर होणाऱ्या आघातांची त्यांना काळजी वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार वगळता इतर कुणालाही भेटायला वेळ नाही. त्यामुळे मंदिरांबाबतचे निवेदन देण्यासाठी आम्हाला राज्यपाल महोदयांची भेट घ्यावी लागली. शिवसेना खरंच हिंदुत्ववादी असेल तर त्यांनी इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेऊन हिंदुत्ववाद सिद्ध करावा, असे आवाहन आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मीक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन माहिती घेतली समवेत अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा समन्वयक बबन मुठे ह भ प किरण महाराज शेटे आदी. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here