Akole : कोरोना काळात अकोलेचे राजकारण तापले…आजी-माजी आमदारांना तिसऱ्या गटाचे आव्हान!

3

अल्ताफ शेख । राष्ट्र सह्याद्री

अकोले : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राजकारणी मंडळी मात्र निवडणुकांच्या तयारीस लागलेली दिसत आहे. आजी-माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या तिसऱ्या एका गटाने जलपूजन केल्याने एका धरणाच्या पाण्याचे तीनदा जलपूजन केल्याचा प्रकार तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे घडला. तालुक्यात अगस्ती कारखाना, नगरपालिका व इतर निवडणुकीच्या राजकारणाची सुरुवात झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.

अकोले तालुक्यात चालू वर्ष हे निवडणुकीचेच वर्ष राहणार आहे. काही महिन्यात तालुक्याची कामधेनू अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले नगरपंचायत, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, तालुक्यातील प्रमुख गावातील ग्रामपंचायत आदिच्या निवडणुका होणार आहे. त्यादृष्टीने तालुक्यातील सत्ताधारी व विरोधकांनी तयारी चालू केल्याचे चित्र आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना धक्का देत त्यांचेच कार्यकर्ते असलेले जिल्हा परिषद सदस्यासह ज्येष्ठ सहकारी यांनी ही आपण राष्ट्रवादीतच असल्याचे म्हटल्याने तालुक्यात राष्ट्रवादीत जुन्यांचा नवा गट तयार झाला आहे. या गटाने कारखान्यासह इतर संस्थाच्या निवडणुकीत शड्डू ठोकण्याचा अथवा राष्ट्रवादीचा पॅनल तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. तर विद्यमान आमदारांना निवडणुकीत साथ देणारे काही नेतेही त्यांच्यावरच शरसंधान करत या गटाच्या सोबतीला आल्याचे प्राथमिक चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी राजूर येथील अशियाखंडातील पाण्यातील सर्वात मोठ्या जलसेतुच्या (पुलाचे) पहिल्या स्लॅबचा शुभारंभ  विद्यमान आमदार डॅा. किरण लहामटे यांनी भल्या पहाटे ५:३० वाजता  केले. त्यानंतर माजी आ. वैभव पिचड यांनी धरणग्रस्तांच्या बरोबरीने सकाळी ११:३० च्या दरम्यान याच जलसेतुचे स्लॅबचा शुभारंभ केला. यानंतर श्रेय वादाचे आरोप प्रत्यारोप झाले. नंतर मुळा परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे पिंपळगाव खांड धरण भरले व लगेच सुरु झाली ती धरणाचे जलपुजन करुन राजकिय पोळी भाजण्याचे राजकारण.

पिंपळगाव खांड धरण भरताच या धरणाचे जनक म्हणवणारे माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभव पिचड यांनी धरणावर जाऊन साडी अर्पण करत जलपूजन केले. त्यानंतर लगेच विद्यमान आमदार डॅा. किरण लहामटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी जि.प.अध्यक्ष अशोकराव भांगरे, युवानेते अमित भांगरे आदिनी कार्यकर्त्यासह पिंपळगाव खांड धरणावर जाऊन जलपुजन केले. या आजी माजी आमदारांच्या सुरु असलेल्या लढाईत मध्येच उडी घेत तिस-यांदा माजी मंत्री पिचड याचे विश्वासू ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, कोतुळ जिल्हा परिषद सदस्य रमेशराव देशमुख, साखर कारखाना संचालक सुरेश गडाख, माजी जि.प. सदस्य बाजीराव दराडे आदि कार्यकर्त्यांनी काल पुन्हा जलपूजन करत पिचड यांनी केवळ आपला वापर केल्याचा दावा केला. येत्या निवडणुकांमध्ये आपणही पिचड यांच्या विरोधात रिंगणात उतरु, असे संकेत त्यांनी दिले.

यावेळी जि.प.सदस्य रमेश देशमुख यांनी शरद पवार व अजित पवार हे आपले नेते असून पूर्वीपासून राष्ट्रवादीचे आहोत, असे सांगत माजी मंत्री तालुक्यातील फक्त पाच ते सहा व्यक्तीचा विकास करीत आहे. जिल्हा परिषदेमध्ये निवडून न येणाऱ्या जागेवर आपण निवडून आलो तरी जलपूजन व अगस्ती कारखान्याच्या कार्यक्रमाला आपणाला डावलले जाते, अशी खंत व्यक्त करत आमचा फक्त वापर करून फेकून दिले असल्याचा आरोप केला.

तर पिंपळगाव खांड धरणासाठी ज्यांची जमीन गेली. ज्या लोकांचे योगदान आहे, जे या भागाचे प्रतिनिधीत्व करतात, अशा लोकांना आजी माजी लोकप्रतिनिधीनी जलपूजनासाठी बोलावले नाही, याची खंत वाटते. म्हणून आम्ही सर्व एकत्र जलपूजनासाठी आलो आहोत. अजित पवार व शरद पवार यांच्यामुळे अनेक विकास कामे झाली असल्याने आम्ही त्यांच्या बरोबर असल्याचा दावा ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे यांनी केला.

आम्ही तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या मागे उभे राहिलो, तुम्हाला निवडून आणले. राज्यात महाविकास आघाडी आहे, याचे भान ठेवून तालुक्यात सर्वाना बरोबर घेऊन चला, ठराविक चार लोकाना घेऊन जलपूजन केले हे बरोबर नाही, म्हणून आम्ही आज सर्व एकत्र जलपूजन करण्यासाठी आलो आहे, असा टोला शिवसेनेचे बाजीराव दराडे यांंनी विद्यमान आमदारांना लगावत जमिनीवर पाय असूद्या, हवेत जाऊ नका, असा सल्लाही दिला. या सर्व घडामोडीत आजी व माजी आमदारांपासून असंतुष्ट असलेल्यांनी तिसरा सुंभा उभा केल्याचे चित्र सद्या तरी आहे. मात्र, यात राष्ट्रवादीचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री लक्ष घालून या गटातटाला एकत्र करत पिचडांविरोधात एकत्र लढाई होऊ देणार की पिचड असंतुष्टांना पुन्हा जवळ करणार? का ही माजी मंत्री पिचड याचीच खेळी आहे? अशा अनेक प्रश्नाची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here