!!भास्करायण !! युवा पिढीचे सण-उत्सव

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )

काळानुसार उत्सवांचे संदर्भ आणि स्वरुप बदलतच असतात. दिवाळीचा सणही याला अपवाद नाही. पिढीगणिक बोलण्या चालण्यात, राहणीमानातही बदल होत जातात. सणांच्या आणि उत्सवांच्या बाबतही असच म्हणता येईल. युवक पिढीला आधीच्या पिढीने दोष देणे. ‘आमचा काळ वेगळा होता’ असे म्हणणे ही देखील एक अर्थाने पिढ्यान् पिढ्यांची परंपराच आहे.

आजचा युवक हा अधिक उत्सवप्रिय बनलाय, हे अनेक उत्सवांमधून, सोहळ्यांमधून, सण साजरे करण्याच्या पद्धतीवरुन दिसून येते. युवा पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी याकडे एक स्वाभाविक प्रक्रिया म्हणूनच बघतो, आणि तसंच बघायला हवं. प्रत्यक्षात तसं मात्र घडत नाही.

हा बदल नेमका कशामुळे घडतो किंवा घडला याचं यानिमित्ताने चिंतन होणं आवश्यक आहे. बदलण आणि बदलवणं हा तरुणाईचा नैसर्गिक स्वभाव असतो. कोणत्याही काळातील तरुणाई याला अपवाद नाही. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून उदाहरण घेतलं, तर त्या काळात ज्ञानेश्वरांनी वेगळेपण दाखवलं ते तरुण वयातच शिवाजी महाराज, म.फुले, डॉ.आंबेडकर, भगतसिंग, राजगुरु यांनीही बदलत्या तरुणाईचं आणि विचाराचं उदाहरण आमच्यापुढे ठेवलं. बदल घडवणं हेच तरुणाईचं काम असतं, हे एकदा मान्य केलं, की मग कोणताच वाद, अपवाद उरत नाही.

या संदर्भाच्या पार्श्‍वभुमीवर आजच्या बदलत्या तरुणाईकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. पूर्वी प्रसार माध्यमांना मर्यादा होत्या आणि माध्यमेही मर्यादित होती. आज संपूर्ण जग प्रसार माध्यमांनी व्यापलं गेलंय. प्रसार माध्यमांच्या या व्याप्तीमुळं अभिसरणाची प्रक्रिया कमालीची वेगवान बनलीय. तरुण पिढीच्या जडणघडणीचा विचार करता, प्रसार माध्यमांच्या या व्याप्तीचा विचार होणे अगत्याचे ठरते. हा बदलच आजच्या सण उत्सवांच्या आणि विविध कार्यक्रमांच्या बदलत्या स्वरुपास काणीभूत आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

पूर्वी घरात आई-वडिल, आजी-आजोबा असायचे. ते मुलांना गोष्टी सांगायचे. या गोष्टींमध्ये काही मूल्ये, संस्कार दडलेली असायची. त्यामुळेच जुन्या काळातल्या पिढ्यांवर आधीच्या पिढीचे संस्कार झाले. आज युवा पिढीला दोष देणारी आधीची पिढी ही जबाबदारी कां झटकते, याचं उत्तर तरुणाईला दोष देणार्‍या प्रौढ पिढीनं दिलं पाहिजे.

आज किती मुलांना आई-वडिलांचा, आजोबा-आजीचा सहवास लाभतो. किती पालक आपल्या मुलाशी संवाद ठेवतात. हा संशोधनाचा विषय आहेच, त्यापेक्षाही आत्मपरिक्षणाचा विषय आहे. आजची पिढी टी.व्ही.संस्कृतीच्या पाशात अडकलीय हे वास्तव आहे; पण या पिढीला टी.व्ही.संस्कृतीच्या जाळ्यात कोणी ढकलंलं याचा काही विचार होणार की, नाही? केवळ तरुण पिढीला दोषी ठरवणं, आरोपी ठरवणं हे कितपत न्यायाला धरुन आहे. तरुण पिढीला आज आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहावं लागत असेल, तर याबाबतचे खरे गुन्हेगार हे तरुण पिढीचे पालक आहेत. हे वास्तव स्विकारण्याची हिंमत आहे, पालक पिढीत? अशी हिंमत असेल तरच तरुणाईला दोष द्यावा.

तरुण पिढीला पैशाचं वेड लागलंय असंही म्हणतात. पण या पिढीला वेडं बनवलं कुणी? तरुणांच्या बालपणाच्या लिलाव करुन त्याला शिक्षणाच्या दडपणाखाली, करीअरच्या ओझ्याखाली आणि जगण्यासाठी अमुक बनलं पाहिजे, तमुक बनलं पाहिजे, या धाकाच्या डोंगराखाली कोणी गाडलं? जे पेरलं तेच उगवणार ना! पालकांनी शिक्षणाची भिती, करियरची भिती घातली आणि उमलत्या मनांचा खून केला. आजचे पालक हे आपल्याच मुलांचे मारेकरी आहेत.

पैशाशिवाय जगता येत नाही, हे कुणी शिकवलं? पैसा, पैसा आणि पैसा. या पैशाला देव कुणी बनवलं? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? आज तरुणाईची घुसमट होत आहे. बेकारीच्या असह्य वेदनांच्या इंगळ्या त्याला डसत आहेत. ही घुसमट न बघता तरुणांना गुन्हेगार ठरवून त्याच्या मनाच्या ठिकर्‍या ठिकर्‍या केल्या जात आहेत.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या बाबतही नेहमी बोललं जातं. आजची पिढी पाश्चिमात्य संस्कृतीच्या मोहात अडकली असा कांगावा केला जातो. बुद्धीवंत, विचारवंत यावर रकानेचे रकाने लिहितात. तरुणाईला अपराधी ठरवतात. अरे, पण मुलाचा वाढदिवस साजरा करताना निरंजनाच्या ताटाच्या जागी मेणबत्या कोणी पेटवल्या आणि केक कोणी कापले? आजच्या तरुणांच्या आई-बापांनीच ना ? वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐवजी त्या कोवळ्या कानात ‘हॅपी बर्थ डे टू यू’ ही धून कोणी बिंबवली? पाळण्यात निजलेल्या तान्हुल्यानं की, जन्मदात्यांनी? पाळण्यातच अंगाई ऐवजी ‘हॅपी बर्थ डे टू यू’ ऐकावं लागत असेल, तर त्याचा दोषी कोण? यावर काय उत्तर आहे.

आज सण आणि उत्सवाचं स्वरुप बदललं. याचं प्रमुख कारण आजचे पालक बदलले. पालकत्व करणारा समाज बदलला. एकदा समाज बदलला की, संस्कृती आपोआपच बदलते. नव्या पिढीला वळवलं ते आधीच्या पिढीनं. त्यानुसार ही पिढी वळली आणि घडली. हे जर वास्तव असेल तर नव्या पिढीचा बदलही तितकाच स्वाभाविकपणे स्विकारला पाहिजे. एकमेकांचे उणे-दुणे काढण्यापेक्षा नव्या पिढीला गुण दोषांसह स्विकारणे हे अपरिहार्य असते. ही अपरिहार्यता जर समजली, तर तरुणांवरचे आरोप कमी होतील.

प्रसार माध्यमांनी, चित्रपटांनी उत्सव म्हणजे दिमाख, भव्य-दिव्य काहीतरी, हे बिंबवलंय. प्रसार माध्यमांच्या या विळख्याने आजच्या उत्सवांच्या स्वरुप पालटून टाकलंय. स्वरुप पालटलं हे निश्चित. आज सण-उत्सवात भावनांपेक्षा बेगडीपणाला महत्व आलंय. सणाच्या आनंदापेक्षा दिखाऊपणाला उत आलाय. सण-उत्सव हे केवळनिमित्त बनलेत किंवा नाईलाज म्हणून उरलेत. कारण डे आणि फेस्टीवलचा इतका सुळसुळाट झालाय की, प्रत्येक दिवस हा उत्सवच बनलाय. त्यामुळे उत्सवाचं नव्या पिढीला अप्रुप किंवा आकर्षण राहिलेल नाही. दिवाळी सणही असाच बनलाय. येते आणि जाते अशा रोजच्या वीजेसारखी दिवाळीची गत झालीय. तरुणाईचं प्रतिनिधीत्व करताना, जे वाटलं किंवा वाटतं ते मांडलंय. आता यावर आत्मपरिक्षण करायचं की नाही, हे त्या त्या पिढीनेच ठरवलेलं बरं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here