प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा शहरात प्रशासनाची संयुक्त कारवाई होत असताना पुणे जिल्ह्यातील एका पोलिस निरीक्षकाने श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना २०० रुपयांच्या दंडासाठी फोन करून विनंती केली. पोलिस निरीक्षक जाधव यांनी त्यांची विनंती धुडकावत २०० रू दंड भरून घेतल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
याबाबत सविस्तर असे की श्रीगोंदा शहरात पोलिस महसूल व नगरपालिका यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात संयुक्त मोहीम उभारली आहे. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील एका पोलिस निरीक्षकांच्या मुलाला विना मास्क प्रवास करत असताना पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पकडले. या मुलाने आपल्या पोलिस असलेल्या वडिलांना फोन करून हकिकत सांगितली. त्यांनी श्रीगोंदा पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना फोन करून विचारणा करत व मुलाला विना दंड सोडण्याची विनंती केली.
मात्र, पोलिस निरीक्षक जाधव यांनी त्यांची विनंती धुडकावत पोलिस निरीक्षकांच्या मुलाकडून २०० रू दंड भरून घेतला. यामुळे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केलेल्या कारवाईचे शहरात स्वागत करण्यात येत असून त्यांच्या कारवाईची चांगलीच चर्चा सुरू आहे.