Shevgaon : ‘स्वाभिमानी’ने महावितरणच्या मुख्यालयासमोर केली वीजबिलांची होळी

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा अन्यथा मोठे आंदोलन उभारु: स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेवगाव

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत महावितरणचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एमएससीबीच्या तालुका मुख्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली. सदर वाढीव बिले माफ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज फक्त वीजबिले जाळली,जर विज बिले माफ केली नाही तर भविष्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

कोरोना काळात ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आले आहे. राज्यभरात वीजबिलांचा मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व प्रा. एन.डी.पाटील यांनी वीज बिलांच्या विरोधातील आंदोलनाचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आज १३ जूलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  शेवगाव येथे वीजबिलांची होळी केली. महावितरणच्या प्रवेश द्वारासमोर प्रचंड नारेबाजी करत वीजबिलांची होळी करून आंदोलकांनी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यानंतर महावितरणचे अधिक्षक अभियंता आणि तहसिलदार  मॅडम यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात बाळासाहेब फटागंडे, दत्ताभाऊ फुंदे, संतोष गायकवाड, दादासाहेब पाचरणे, प्रशांत भराट सर, प्रविण म्हस्के, प्रशांत घुमरे, मेजर अशोक भोसले, अमोल देवढे, संदीप मोटकर, नानासाहेब कातकडे, यांच्यासह परिसरातील नागरीक तसेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here