Shrigonda : श्रीगोंदा बाजार समिती आवारातील लिंबू व्यापाऱ्यांचे लायसन्स कायमस्वरूपी होणार रद्द

संभाजी ब्रिगेडचे आंदोलन स्थगित

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील लिंबू व्यापाऱ्यांकडून जाहीर लिलाव न करता ठोक पद्धतीने लिंबू खरेदी केले जात असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाची प्रचंड आर्थिक लूट होत असल्याने सोमवार दि. १३ जुलै रोजी बाजार समितीच्या कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत सदरील लिंबू व्यापारी, आडते यांच्यावर कारवाई करत त्यांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करत असल्याचे आदेश पारित करत असल्याबाबतचे लेखी आश्वासन बाजार समितीकडून मिळाल्याने संभाजी ब्रिगेडचे गेट बंद आंदोलन स्थगित करण्यात आले, अशी माहिती संभाजी बिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दिली.

यावेळी सतीश बोरुडे, युवराज पळसकर, अजिनाथ मोतेकर, युवराज चिखलठाणे हे उपस्थित होते.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील लिंबू व्यापाऱ्यांकडून मागील तीन वर्षापासून जाहीर लिलाव न करता ठोक पद्धतीने लिंबू खरेदी केले जात असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाची प्रचंड आर्थिक लूट होत आहे, अशी तक्रार संभाजी ब्रिगेडने सहाय्यक निबंधक, सह. सं. श्रीगोंदा यांच्येकडे केली होती. यावर लिंबू व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत लिलाव पद्धतीने लिंबू खरेदी न करता दि. १२ जुलैपासून लिंबू खरेदी पूर्णपणे बंद करत असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, श्रीगोंदा तहसिलदार महेंद्र माळी आणि पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या समोर झालेल्या समन्वय बैठकीतही लिंबू व्यापाऱ्यांनी लिंबू खरेदी बंद करत असल्याचे सांगितले. यामुळे संभाजी ब्रिगेडने कठोर भूमिका घेत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर गेट बंद धरणे आंदोलन पुकारले होते. बाजार समितीकडून लिंबू व्यापाऱ्यांना लिंबू या शेतमालाचे जाहीर लिलाव करणे बंधनकारक असल्याबाबतची नोटीस देण्यात आली.

मात्र, सदरील व्यापाऱ्यांनी लिंबू खरेदी पूर्णपणे बंद केल्यामुळे तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनिमय) अधिनियम १९६३ चे कलम २९ (२) (३) चे उल्लंघन व महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनिमय) अधिनियम १९६७ चे नियम १३ ते २० चे उल्लंघन केल्याने तसेच भूखंड धारण करते वेळी व लायसन्स घेते वेळी केलेल्या करारनाम्यातील अटींचे हेतुपुरस्सर उल्लंघन केल्याने आणि बेकायदेशीर संप केल्या प्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारातील लिंबू आडते, व्यापारी यांचे लायसन्स कायमस्वरूपी निलंबित करणार आहे, असे आदेश पारित करत असल्याचे आश्वासन श्रीगोंदा बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी दिले. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे गेट बंद आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.

तसेच सदरील लिंबू व्यापाऱ्यांचे गाळे खाली करून लिंबू खरेदी तातडीने सुरु करण्यात यावी आणि लिंबू व्यापाऱ्यांच्या बेकायदेशीर संपामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस सर्वस्वी लिंबू व्यापारी, आडते जबाबदार असून शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानची भरपाई या व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी यावेळी केली.

लिंबू लिलाव सुरू व्हावेत व बाहेरील खरेदीदार यावेत ही भावना आहे. स्थानिक लिंबू व्यापारी मनमानी करत आहेत व लॉबिंग मुळे बाहेरील व्यापारी येत नाहीत. यात करोडो रुपये शेतकऱ्यांचा तोटा आहे. त्यामुळे शेतकरी हितासाठीचा लढा चालूच राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दिली.

नवीन लिंबू व्यापाऱ्यांना संधी

शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातील लिंबू खरेदीचे काटे योग्य भावात लिंबू खरेदी करून चालू ठेवण्यात यावेत तसेच नवीन होतकरू लिंबू व्यापारी लिलाव पद्धतीने लिंबू खरेदी करण्यास तयार असल्यास यांना बाजार समिती आवारामध्ये जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती उपसभापती वैभव पाचपुते यांनी यावेळी दिली.

1 COMMENT

  1. संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास बातमीरुपी साथ अशी लाभो
    शेतकऱ्यांच्या सन्मानात
    संभाजी ब्रिगेड सदैव मैदानात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here