!!भास्करायण !! ‘व्हल्यु की प्राईस’

2

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )

गेल्या काही वर्षात  समाजाचा आर्थिकस्तर वाढला. यावर डल्ला मारण्यासाठी मग  भांडवलदार व देशीविदेशी कंपन्या  सरसावल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चंगळवादाला जाणिवपुर्वक खतपाणी घातले. फॅशन शोपासून, तर मिस इंडिया, मिस युनिव्हर्स, विविध रिअ‍ॅलीटी शो यांचे पेव फुटले. सिनेमात ‘अ‍ॅटम साँग’ अत्यावश्यक बनले. जाहिरातीमधूनही  भावना चाळवणार्‍या दृश्यांचा मारा सुरु झाला. याचा विस्तार इतका वाढला की, क्रिकेट मॅचेचमध्येही क्रिकेटपेक्षा ‘चिअर्स गर्लस्’ महत्वाच्या बनल्या! चित्रपटातून अंगप्रदर्शन, आव्हानात्मक दृश्ये, लटके, झटके दाखविणे सुरु झाले. याचबरोबरीने संपर्क व संवादाच्या माध्यमांची व्याप्ती वाढली. मोबाईल, इंटरनेट, व्टिटर, ब्लॉग, फेसबुक यासारखी माध्यमे वाढली. त्याने संवाद व संपर्काची व्याप्ती वाढून ज्ञानाची कक्षा रुंदावण्याऐवजी ‘वेगळेच संपर्क’ विस्तारले. नको त्या दृश्यांची व माहितीची नेटवरुन, मोबाईलवरुन देवाण-घेवाण सुरु झाली. संवादाची माध्यमे वाढली, पण पालक व मुले, शिक्षक व विद्यार्थी आणि माणूस व समाज यांच्यातील संवाद मात्र हरवला. वाहिन्यांवरील मालिकांनी नात्यांना सुरुंग लावले. नवीन संपर्काच्या माध्यमांनी व्यक्तीला समुहापासून तोडून त्याला एकाकी बनविले.
चंगळवाद हा जीवनावश्यक बनला. भोगवाद ही संस्कृती बनली. आयुष्य म्हणजे जगणे बनण्याऐवजी अवघे जगणेच इव्हेन्ट बनले! या इव्हेन्टसाठी पैसा ही अत्यावश्यक बाब बनली. प्रत्येकजण पैशामागे धावू लागला. या धावण्यात माणूसपण, समाजपण गावपण आणि घरपण हरवले. समाजाने पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करुन चंगळवाद आणि भोगवादाची बिजे समाजव्यवस्थेत पेरली जे पेरले ते उगल्यावर, हे तण वेळीच उपटून फेकले असते तर आजची विकृत समाजव्यवस्था निर्माणच झाली नसती. आज घराघरात एकाकीपण आणि माध्यमं याद्वारे विकृतींची बिजे बालवयातच पेरली जात आहेत. पेरलंत  आता उगवलं असून या विकृतीच्या रोपट्याचं झाडात रुपांतर झालंय. या झाडाला रेव्ह पार्टी, खून, बलात्कार, लैंगिक धुडगूस, खंडणी, अपहरणे, भ्रष्टाचार, मनोरुग्णता अशी विषारी फळे लगडली.
आता प्रश्न उरतो एकच. याचा दोष कोणाला द्यायचा? मुले चुकली आपल्या गावाकडल्या भाषेत ‘‘ कां रं, हेच शिकविलं व्हय रे तुझ्या आई बापानं’’ असं म्हणतात. यातून मुलं घडविण्याची पहिली जबाबदारी कोणाची, हे ज्याने त्याने ओळखली पाहिजे.  समाजातील सर्व घटकांनी चंगळवाद आणि भोगवादाच्या नशेतून बाहेर येवून आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.  पन्नास वर्षापासून विचारवंत जाणकार चंगळवाद आणि भोगवाद पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण याचे दुष्परिणाम वृत्तपत्रातून, साहित्यातून, प्रबोधनातून, चित्रपट व नाटकातून समाजाला इशारे दिले जात होते. या इशार्‍याची आपण दखलच घेतली नाही. यापुढेही आपण बेफिकीरीने वागलो. तर भविष्यातील सामाजिक व सांस्कृतिक भूकंपाची नांदी ठरेल. त्यामुळे मुल्ये की किंमत [प्राईस]हे नक्की ठरवावं लागेल.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here