रशियन कोरोना लस चाचणीत भाग घेणाऱ्यांवर काय परिणाम झाला?

वृत्तसंस्था । राष्ट्र सह्याद्री

कोरोना व्हायरसवर प्रभावी लस शोधून काढल्याचा दावा रशियाने केला आहे. आता पुढे काय होईल आणि ही लस कधीपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. एकदा क्लिनिकल ट्रायल झाली तरी लस सर्वांसाठी उपलब्ध होईपर्यंत एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

रशियाने शोधलेल्या लसीचं व्यावसायिक स्तरावर उत्पादन कधी सुरू होणार ही माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. स्वयंसेवकांवर कोव्हिड-19 च्या लसीचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं असल्याचा दावा रशियाच्या सेकनॉफ युनिव्हर्सिटीने केला आहे. रशियाची वृत्तसंस्था तास बरोबर बोलत असताना विद्यापीठाचे प्रमुख संशोधक इलिना स्मोलयारचुक यांनी म्हटलं आहे की ‘ही लस प्रभावी आहे.’ त्यांनी सांगितलं “संशोधन पूर्ण झालं असून ही लस सुरक्षित आहे असंही आढळलं आहे. स्वयंसेवकांना 15 आणि 20 जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.” भारतातील रशियन दुतावासाने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलजीचे संचालक वादिम तरासोव यांनी जगातली पहिली कोरोना लस क्लिनिकल ट्रायलमध्ये यशस्वी झाली आहे, अशी माहिती रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने दिली आहे. मॉस्कोमधील सेकनॉफ विद्यापीठात ज्या लोकांवर चाचणी घेण्यात आली ते सुरक्षित आहेत. चाचणीतील सहभागी पहिल्या चमूला 15 जुलै रोजी आणि दुसऱ्या चमूला 20 जुलै रोजी रुग्णालयातून सोडण्यात येईल. या विद्यापीठाने 18 जून रोजी ‘गेमली इन्स्टीट्यूट ऑफ एपिडेमियॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी’द्वारा तयार करण्यात आलेल्या या लशीची चाचणी सुरू केली होती. सेकनॉफ विद्यापीठाचे आणखी एक वरिष्ठ अधिकारी अलेक्झांडर लुकाशेव यांच्या माहितीनुसार, लोकांसाठी ही लस सुरक्षित आहे की नाही हे पाहणं हा मूळ उद्देश होता. चाचणी यशस्वी झाली आहे आणि ती सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. आता लस उत्पादनासाठी काय काय तयारी करायची ते ठरवलं जात आहे.

स्वयंसेवकांवर काय परिणाम झाले?

ही लस दिल्यानंतर काही स्वयंसेवकांना डोकेदुखी आणि ताप आला. पण काही काळानंतर ही लक्षणं गेली असं सेकनॉफ विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. या संशोधनाच्या प्रमुख इलिना स्मोलयारचुक यांनी म्हटलं आहे की स्वयंसेवकांनी असा प्रतिसाद देणं साहजिकच आहे. डोकेदुखी आणि ताप ही लक्षणं 24 तास राहिली आणि नंतर ती निवळली असंही त्यांनी सांगितलं. पण आता सर्व स्वयंसेवकांची प्रकृती चांगली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here