!!भास्करायण !! तरुणाईला विकृत बनविणारा राक्षस

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )

आज आर्थिक भ्रष्टाचार प्रश्नी देशात विचारमंथन सुरु आहे. तथापि; प्रसिद्धी माध्यमे, व  चित्रपटांतून जो ‘सांस्कृतिक भ्रष्टाचार’ फोफावतो आहे, त्याकडे बघायला, बोलायला कोणाला सवड नाही. ज्या आर्थिक भ्रष्टाचाराचा आज बोलबाला आहे, त्याचे उगमस्थान भोगवाद, चंगळवाद आणि त्यांना जन्म देणार्‍या सांस्कृतिक भ्रष्टाचारात दडलेला आहे. या सांस्कृतिक भ्रष्टाचाराचा परिपाक म्हणजे बलात्कार, खून वाढती गुन्हेगारी, खंडणी, धर्म व जातीय भेदभाव होय. आज मनोविकृतीची आग घराबाहेर असली, तरी ती घरात शिरायला फारसा वेळ लागणार नाही. याचे कारण घराला ‘उंबरठे’ राहिलेतच कुठे!
सध्या प्रसिध्दी माध्यमे, ज्यात लिखित, दृकश्राव्य आणि चित्रपट यांचा समावेश होतो, याकडे बघावे लागेल. वृत्तपत्र घेतले की, लफडी, खंडणी, एकतर्फी प्रेमातून खून, हाणामार्‍या, तस्करी, बलात्कार अशा बातम्यांची रेलचेल. दररोज एखाद्या तरी मदनिकेचे मादक छायाचित्र, हा तर अविभाज्य भाग बनलाय. चित्रपटांनी  तर ‘अभिरुची’ रसातळाला नेवून ठेवली आहे. अचकट विचकट अंगविक्षेप, देहप्रदर्शन, करमणूकीच्या नावाखालील अश्‍लितेचं आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं उदात्तीकरण. हा सगळा ‘धूम’ स्टाईल लैंगिक धूमाकूळ किशोरवयावर काहीच परिणाम करीत नसेल? ज्या ‘डर्टी फिल्म’चा मंत्र्याना आणि आमदारांनाही ‘मोह’ होतो, त्याचे युवकांना आकर्षण वाटत नसेल? त्यांच्या पौगंडावस्थेत अशातर्‍हेने माध्यमे दडलेल्या भावनांना ‘उत्तेजन व आव्हान’ देत असतील, तर या भावना उफाळून येवून विकृत घटना घडणे अपरिहार्यच ठरते.
छोटा पडदा (टी.व्ही.) तर प्रत्येकाच्या घरात ठाण मांडूण बसलाय! विशिष्ट वाहिन्या सोडून इतर वाहिन्यांवर काय दाखवलं जातंयं? मनोरंजनाच्या नावाखाली सरळसरळ विकृती, हिंसाचार, अनैतिकता आणि लैंगिकतेचा धुमाकुळ सुरु आहे. अनेक मालिकांमधून मानवी नात्यांनाच सुरुंग लावायचे काम सुरु केले आहे. या नात्यांमध्ये तिरस्कार, द्वेष, मत्सर, अनैतिक संबंध वाढीस लागेल अशा कथानकांची पेरणी केली जात आहे. पालकही अशा संस्कृती, नाते व घरपणाला उद्धवस्त करणार्‍या अर्थहिन मालिका सहकुटूंब बघत आहेत. संस्काराला व घराला गिळंकृत करणारा ‘छोटा विकृत राक्षस’ आपणच घरात पोसतोय.

छोट्या पडद्यावरच्या बॉडी स्प्रे, शेव्हींग क्रीम, साबणी, सौंदर्यप्रसाधने, दारु व शितपेये यांच्या दहा वीस सेकंदाच्या जाहिराती बघा, म्हणजे दहा वीस मिनिटात किती ‘विनाश’ दडलाय ते कळेल. प्रसार माध्यमे, त्यातल्या त्यात वाहिन्या आणि चित्रपटांनी लैंगिकता, व्याभिचार व स्वैराचाराची परिसिमा गाठली आहे. पौगंडावस्थेत शारिरीक व भौतिक आकर्षणाचे सुरुंग घराघरातल्या किशोरवयीन मनात ठासले जात आहेत. अण्वस्त्रांपेक्षाही घरा घरांत निर्माण होत असलेली ‘विकृत मन्वास्त्रे’ अत्यंत विनाशकारी आहेत. याचा बंदोबस्त केला नाही, तर घराघरात ‘सांस्कृतिक अतिरेकी’ आणि ‘सांस्कृतीक मानवी बॉम्ब’ची निर्मिती होईल.
हे अतिरेकी सामाजिक स्वास्थाची शिकार करतील आणि संस्कृतीची असे घडण्याआधीच समाजातील सर्व घटकांनी जागरुक राहिले पाहिजे. सरकार, राजकारणी, सेन्सॉरबोर्ड यासह माध्यमांचे सूत्रधारांवर सामुदायीक दबाव व दडपण आणले हा तमाशा बंद पाडला पाहिजे. माध्यमांनीही सामाजिक भान राखून स्वत: होवून हे चित्र बदलले; तर अधिक बरे होईल. शेवटी पालक, शिक्षक, समाज आणि प्रसिद्धी माध्यमे, ही संस्कार व संस्कृतीची केंद्रे आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here