Shrirampur : तहसील कार्यालयात खुलेआम जनतेची लूट, पैशाशिवाय मिळत नाही सही; व्हिडिओ व्हायरल

टाकळीभान येथील एकाने केले स्टिंग ऑपरेशन, तहसिलदाराच्या निर्णयाकडे लक्ष

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – नागरिकांना सेतू कार्यालयामधून करावयाचे प्रतिज्ञापत्र सहीसाठी तहसील कार्यालयात आल्यानंतर त्याठिकाणी संबंधित नागरिकांकडून पैसे उकळण्याचा गंभीर प्रकार एका व्हिडिओद्वारे समोर आला आहे.
दैनंदिन गरजेच्या अनेक कामासाठी सेतू कार्यालयामध्ये प्रतिज्ञापत्र करावे लागते. सेतू कार्यालयामध्ये नोंदणी केल्यानंतर सदरची कागदपत्रे सहीसाठी तहसील कार्यालयात जातात. तेथे तहसीलदाराची सही अपेक्षित असताना त्यांच्या अनुपस्थिती मध्ये नायब तहसीलदार सही करतात. परंतु सध्या हे अधिकार कार्यालयातील लिपिकांना सुद्धा दिले गेले असून त्या दर्जाचे लोक त्या ठिकाणी सह्या करतात. मात्र, तालुका भरातून येणाऱ्या नागरिकांना परत जाण्याची घाई असल्याने ते लवकर सहीसाठी आग्रही असतात. अशा वेळी पैसे दिल्यास लगेच सही केली जाते. त्यासाठी शंभर दोनशे रुपयांचा आग्रह केला जातो. पैसे न दिल्यास नंतर या, उद्या या, संध्याकाळी या अशा प्रकारची उत्तरे दिली जातात.

याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये संबंधित नागरिक हा पैसे दिल्यानंतर लिपिकाकडे पावतीची मागणी करीत आहे. पावती सध्या माझ्याकडे नसून नंतर देतो, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला जात आहे. मात्र, संबंधित नागरिकांनी पावतीचा आग्रह धरल्याने पावती नाही म्हणून त्याचे पैसे परत देण्याचा प्रकारही दिसून येत आहे.

वास्तविक पाहता सेतू कार्यालयामध्ये ज्यावेळी एखादा नागरिक प्रतिज्ञापत्र करण्यासाठी जातो. त्यावेळी त्याच्याकडून तेथे फी घेतली जाते आणि या फीमध्येच तहसीलदाराच्या सहीचे प्रतिज्ञापत्र द्यावयाचे असते. परंतु सेतू कार्यालय वेगवेगळ्या भागात असल्यामुळे सहीसाठी तहसीलमध्ये यावे लागते. सेतूमध्ये कागदपत्र एकत्र झाल्यानंतर एकत्रित रजिस्टरमध्ये नोंद करून सहीसाठी ती तहसीलदाराकडे पाठवली जातात. त्यामध्ये बराच वेळ खर्ची पडतो म्हणून नागरिक स्वतः सदरची कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात येतात.

त्या ठिकाणी शिक्का लावलेला असतो. त्यावर फक्त सही घ्यायची असते. या सहीसाठी संबंधित टेबलावर नेमलेले लोक पैसे मागत असल्याने लोकांना हा भुर्दंड कशासाठी आणि तहसीलदारांना याची कल्पना आहे का असे प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत. श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील व प्रांत अनिल पवार सध्या कोरोणाच्या मुकाबल्यासाठी आपल्या टीमसह रात्रंदिवस कार्यरत आहेत. अशा वेळी त्यांच्या कार्यालयातील अनुपस्थितीचा गैरफायदा घेऊन तहसील कार्यालयातील काही कर्मचारी या पद्धतीने राजरोसपणे कार्यालयातच लाच घेत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेने पैसे तरी कुठे कुठे खर्च करायचे असा प्रश्न समाजातून विचारला जात आहे.
यासाठी सेतू कार्यालयातील सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांची साक्षांकनाची अट रद्द करून स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र स्वीकारले जावेत अशी मागणी पुढे आली आहे. दरम्यान, प्रकरणाची व्हिडीओ क्लिप व माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांना व्हाट्सअप वर दिलेली आहे. या वायरल झालेल्या व्हिडिओमधील कर्मचाऱ्याबाबत तहसीलदार काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here