!!भास्करायण !! चकवा आणि अफवा!

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )
आधुनिक प्रसार माध्यमे हे आपलं सर्वस्व बनलंय. मात्र आपल्यातलं माणूसपण हरवलंय. त्यामुळेच कोणेत्याही माहितीची खातरजमा न करता, ती पुढे पाठविली जाते. खोट्या माहितीच्या आधाराने माणूस ‘चकवा’ खातो आणि त्यातून अफवांचे पिक फोफावते. अशा अभासी दुनियेच्या बाहेर वेळीच पडले नाही, तर वाचविणारा कोणीच उरणार नाही. अफवांनी अनेक निरापधारांचे बळी घेतले, हे आपल्यातील संवेदना बोधट झाल्याचेच लक्षण ठरते.
गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमावरील अफवांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. मोबाईल, व्हॉटस्अॅप
अशा आधुनिक प्रसार माध्यामावर फिरणारे संदेश अनर्थ घडवीत आहेत. ज्याच्या हाती ही माध्यमे आहेत, ती बर्यापैकी शिकलेली आहेत. असे असताना आपण जे संदेश फॉरवर्ड करीत आहोत, त्यामुळे काय होवू शकते, याच्या परिणामांचा विचार न करता अविवेकाने असे संदेश अजाणतेपणी प्रसंगी जाणीवपूर्वक पाठविले जातात. अशा संदेशामुळे समाजमन अस्वस्थ बनले आहे. कशाचीही शहानिशा न करता किंवा त्याचा प्रत्यक्षात काहीही संबंध नाही,  बनावट क्लिप्स बनवून त्या सोशल मिडीयावर टाकल्या जातात. बघणारेही याची शहानिशा न करता प्रतिक्रीया देतात. यातून अफवांचे पिक फोफावते. समाज माध्यमे वापरणारे एका अमानवी चकव्यात अडकतात. यातून थेट सामुहीक हत्या, बलात्कार, खून, जातीय दंगली अशा समाजविघातक गोष्टी घडत असतात.

सुसंस्कृत व सभ्य दुनियेच्या निर्मितीत सोशल मिडिया ‘असोशल’ ठरत आहे. माणसांतलं माणूसपण हरवत चाललं असून एक सर्वजनिक विकृती समाजात, त्यातल्या त्यात तरुणाईत पेरली जात आहे. या विकृतीचे पदोपदी दर्शन घडत आहे. समाजाची वाढती विकृत मानसिकता हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. तथापि; संवेदना बोथट झालेल्या समाजमनाला यातून काय विनाश घडणार आहे, हे दुर्दैवाने लक्षात येत नाही. ही सभ्य  समाजाची शोकांतिका आहे.
साधारणतः मागील शतकातील नव्वदीच्या दशकात मोबाईल नावाचं अपत्य जन्माला आलं. या अपत्याने माणसाला इतका लळा लावला, की जितीजागती माणसे विसरुन आपण या अपत्याचे लाड करु लागलो. हळूहळू हे अपत्य घराघरात रांगू लागलं. ज्याला त्याला या नव्या माध्यमाची भूरळ पडली. पुढे अॅण्ड्रॉईड फोन अवतरला. ह्या अवताराची प्रत्येकाला मोहिनी पडली. फएसबुक, व्हॉटस्अॅळप, ट्विटर अशा सुविधांमुळे अॅण्ड्रॉईडचा मायाजाल पसरला.
या मायाजालात आपण इतके अडकलो, की मोहमयी ‘अभासी’ दुनियेलाच आपण खरी दुनिया मानायला लागलो. ज्याच्या हाती अॅण्ड्रॉईडस् तो प्रत्येक जण या अभासी दुनियेत रमला. इतका की, त्याला आपण मानवी दुनियेचा भाग आहोत याचाच विसर पडला. ही अभासी दुनियाच खरी दुनिया असा त्याचा समज दृढ झाला. मोबाईलच्या पडद्यावर जे काही दिसते, तेच खरे व वास्तविक अशी त्याची धारणा झाली. या धारणेतून या अभासी दुनियेच्या वलयात माणूस केव्हा अडकला, हे कोणाच्याच लक्षात आले नाही.

या अभासी दुनियेत रममाण होणार्या प्रत्येकाने आपल्या भोवती भ्रामक कल्पनांचे, वास्तवाशी कोणताही संबंध नसणार्या गोष्टींचे वलय निर्माण केले. जगात माणसाच्या जगण्यासाठी आणि करमणूकीसाठी जे जे काही आहे, ते या अभासी दुनियेत मोबाईलने हातात उपलब्ध करुन दिले. ‘करलो दुनिया मुठ्ठीमे’ हे ब्रिद खरे ठरु लागले. चांगल्या व वांगल्या अशा सर्व गोष्टी मोबाईलवर झळकू लागल्या. त्याने मानवी मनाला वास्तववादी दुनियेतून खेचून, वास्तवापासून कोसो दूर असलेल्या स्वप्नांच्या दुनियेत नेले. त्यामुळे माणसा माणसातलां संवाद हरवला. चालता बोलता माणूस प्रसार माध्यमांमुळे मुका व बहिरा बनला. त्याला घरातल्या मुलाबाळांचे, आईवडिलांचे अगदी कोणाचेच संवाद ऐकू येईनात. तो बोलणं विसरला, हसणं विसरला, सहजिवन व सामाजिक जिवन भूलला. मानवी नात्यांचा त्याला विसर पडला. माणसांपेक्षा, मित्रांपेक्षा, मुलाबाळांपेक्षा त्याला प्रसार माध्यमातील अभासी नाते निकटचे वाटू लागले. घरातील माणसांपेक्षा व नातलगांपेक्षा त्याचे मालिकांमधील पात्रांची नाते घट्ट जुळत गेले. घरातलं घरपण आणि माणसातल्या माणूसपणाचा यात चेंदामेंदा झाला.
आज आपण एका भयानक दुनियेत प्रवेश केला आहे. या दुनियेत माणसापेक्षा बेगडी नात्यांना जास्त महत्व आलंय. ही माध्यमे थोडा वेळ जरी बाजूला झाली, की अस्वस्थ व्हायला होतं. माणूस बेचैन होतो. केवळ मोबाईल वापरु दिला नाही म्हणून प्रसंगी आई, बापाचा गळा घोटण्यापर्यंत मजल जाते. कुठली तरी बनावट क्लिप बनवून, तिला धार्मिक वा जातीय मुलामा देवून, ती अपलोड करायची. त्याद्वारे माणसांची, त्यातल्या त्यात युवकांची माथी भडकावून समाजासमाजात, जातीजातीत, धर्माधर्मात द्वेष पसरवायचा. यातून घडतो तो केवळ अनर्थ! असा अनर्थ की, ज्याने मानवी समुदायाच्या अस्तित्वापुढेच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे!
प्रसार माध्यमांनी बेभान झालेल्या समाजमनाने मानवी संस्कृतिच्या सर्व सिमारेषा ओलांडल्या आहेत. माणसाला आपले गुलाम बनविले आहे. इतके की, माणूस माणूस न राहाता, तो चक्क पशु बनला आहे! यातूनच घडताहेत पाशवी बलात्कार, खुन, दंगली. यातूनच उभ्या राहात आहेत धर्म व जातीच्या भिंती. यातूनच घराघरात बनले आहेत स्वतःचे स्वतंत्र कप्पे. या कप्प्यांमुळे घराला घरपण राहिलं नाही. मुलाने आईवर, बापाने मुलीवर, भावाने बहिणीवर, गुरुने शिष्येवर बलात्कार करावा, याला आपण समाज म्हणणार? याला आपण माणूस म्हणणार? या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करुन उत्तर शोधले नाही, तर विनाश अटळ आहे.
या विरुद्ध कडक कायदा करावा, अशी मागणी पुढे येत आहे. ती योग्यही आहे. प्रसारमाध्यांवरील विकृतीला आळा घालण्यासाठी कठोर कायदा व उपाययोजना आवश्यक आहेत. मात्र केवळ कायदा हाच यावर इलाज ठरेल, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. बलात्काराबाबतचे कायदे कठोर  करुन, अगदी फाशी सारख्या अंतिम शिक्षेची तरतूद करुनही बलात्काराची विकृती थांबली नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी विकृती पोसली जात आहे, त्याची कारणमिमांसा सध्याचे कुटूंब, समाजव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, संस्करहिन समाजरचना, ढासळलेली नितीमुल्ये भौतिक सुखाचा मोह व चंगळवाद यात दडलेली आहेत. त्यामुळे एकूणच समाजव्यवस्थेची व निकोप समाजमनाची नव्याने पायाभरणी करावी लागणार आहे.
आधुनिक प्रसार माध्यमांनी मानवी संस्कृतिपुढे मोठे आव्हान उभे के ले आहे. जगाच्या कानाकोपर्यातून ज्या समाज माध्यमांबाबत गोष्टी पुढे येत आहेत, त्या अस्वस्थ करणार्या आहेत. खरं तर ही माध्यमे संवादासाठी आहेत. माहिती व ज्ञानाचा खजिना आहेत. हे विसरुन नको त्या गोष्टीसाठी या माध्यमांचा वापर, हा मानवाचा काळ ठरत आहे. मानवी संस्कृतिचा गळा घोटला जात आहे. ज्याला संवेदना आहे तो गुदमरला जात आहे. प्रसारमाध्यमावरील ‘अफवा’ ह्या मानवी मनाला आणि माणूसपणाला ‘चकवा’ देत आहेत. या चकव्यातून वेळीच बाहेर पडले नाही, तर माणूस नावाचा प्राणी नामशेष होईल. माणसाची दुनिया अस्तगत होवून विनाशकारी ‘अभासी पाशवी दुनिया’ उभी राहिल. त्यावेळी वाचविणारा कोणीच उरणार नाही, कारण सगळेच हिस्त्र पशु बनलेले असतील!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here