Newasa : कामिका एकादशीला “पैस”खांबासह माऊलींच्या मूर्तीस अभिषेक, बंदमुळे मंदिर व परिसरात शुकशुकाट

कोरोनाच्या संकटातून मानवजातीला मुक्ती द्या- ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांचे माऊलींना साकडे

प्रतिनिधी |राष्ट्र सह्याद्री
 
नेवासा – आषाढी वद्य कामिका एकादशीच्या दिवशी दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरते. मात्र  यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने व प्रशासनाने यादिवशी नेवासा बंदच्या घेतलेल्या निर्णयामुळे गुरुवारी (दि.१६) मंदिर दर्शन व नेवासा बंद असल्याने परिसरात शुकशुकाट दिसून येत होता. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

एकादशी निमित्ताने पहाटेच्या सुमारास गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचे पालन करत वेदमंत्राचा उच्चार करत आरतीने माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. कोरोनाची महामारी जगातून जाऊ द्या, कोरोनाच्या संकटातून मानव जातीला लवकरच मुक्ती द्या, असे साकडे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांनी माऊलींना घातले. दरम्यान, कोरोना महामारीचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी एकादशीलाच नेवासा बंदचा निर्णय घेतला होता.

कोरोना महामारीच्या संकटामध्ये सद्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बंद आहे. फक्त नित्यनेमाने पूजापाठ केला जातो. आषाढी वद्य कामीका एकादशीच्या निमित्ताने गुरूवारी  दि.१६  जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास माऊली भक्त मच्छिंद्र भवार व शांताबाई भवार तसेच आशिष कावरे व शामल कावरे या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजेने मंदिरातील मुख्य माऊलींच्या पैस खांबासह विठ्ठल रुख्मिनीच्या मूर्तीस दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात येऊन आरती करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य नेवासा येथील ग्रामपुरोहित आचार्य ऋषिकेश जोशी यांनी केले.

यावेळी समाज प्रबोधनकार विनोदाचार्य ह.भ.प. मच्छिंद्र महाराज निकम, ह.भ.प.नंदकिशोर महाराज खरात,ह.भ.प. गहिनीनाथ आढाव, मंदिर विश्वस्त रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, डॉ. करणसिंह घुले, संत सेवक जालिंदर गवळी,गोरख भराट, मयूर डौले,मयूर दारुंटे, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पठाडे उपस्थित होते. प्रशासनाच्या सामाजिक अंतराचे पालन करत सकाळचा अभिषेक विधी करण्यात आला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आयोजित नेवासा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला तरी माऊलींचे दर्शन न झाल्याची खंत प्रत्येक वारकरी भाविक व्यक्त करतांना दिसत होता. कामिका एकादशीला दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरत असते. दिवसभरात सुमारे चार ते पाच लाख भाविक दर्शन घेतात. सुमारे शंभर ते दीडशे दिंड्यांची हजेरी लागत होती, असे या अगोदरच चित्र होते. मात्र, प्रशासनाने या दिवशी नेवासा बंदचा निर्णय घेतल्याने अनेक माऊली भक्तांनी नाराजी ही व्यक्त केली. नेवासा बंदच्या काळात प्रशासकीय पातळीवर तहसीलदार रुपेश सुराणा व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शहर व मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवून परिस्थितीचा फिरून आढावा घेतला. श्रीरामपूर रोडवरील खोलेश्वर गणेश मंदिर चौकासह नगरपंचायत चौक, संत तुकाराम महाराज मंदिर चौक येथे ब्यारीकेट लावून मंदिराकडे जाणारे मार्ग बंद केले होते.

फोटो ओळी-कामीका एकादशीला नेवासा बंद असल्याने असा शुकशुकाट दिसून येत होता(छाया-सुधीर चव्हाण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here