Sangamner : शेडगाव शिवारात मृत बिबट्या सापडला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
संगमनेर तालुक्यातील शेडगाव शिवारात गुरुवारी सकाळी एक मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शेडगाव शिवारात असलेल्या डाळिंबी मळ्यात संतोष भिमाजी आमले यांची ५७०/५७१ मध्ये ऊसाची शेती आहे. दोन दिवसापूर्वी या ऊसाच्या शेतात विजेची तार तुटून पडली आहे, अशी माहिती आमले यांनी महावितरणला दिली होती. गुरुवारी सकाळी वीजतारेची जोडजाड करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी खराटे व त्याचे सहकारी आले असता त्यांना तुटलेल्या तारेला चिटकून एक बिबट्या मृत झाल्याचे दिसले.
त्यांनी तात्काळ संतोष आमले यांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे आमले यांनी माजी उपसरपंच दिलीप नागरे यांना फोन करुन वनविभागाला कळवण्यास सांगितले. वनविभागाने घटनास्थळी दाखल होत घडलेल्या घटनेचा पंचनामा केला असून नर जातीचा बिबट्या असल्याची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here