Newasa : सोनईत पाच पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने विलगीकरण कक्ष संशयाच्या भोव-यात

0
पोलिस व आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

सोनई – हाॅट स्पाॅट सोनईतील चार व शनिशिंगणापुरातील एकाचा कोरोना अहवाल बुधवारी रात्री उशिरा पाॅझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची धाकधूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विलगीकरण कक्षातील तेवीस संशयित कुणाच्या परवानगीने घरी सोडले हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 
मागील आठवड्यात एकाच दिवशी दहा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने टकारगल्ली, संत सावतागल्ली व संत सेनागल्ली कंटेन्मेट झोन करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. संपर्कातील एकशे पाच जणांचे स्राव घेण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी  ८२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आनंद साजरा करण्यात आला होता.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत निगेटिव्ह आलेल्या सर्वांना मुळा संस्थेच्या विलगीकरण कक्षातून होम काॅरंटाईनसाठी सोडण्यात आले होते. परवानगी नसताना अहवाल प्रतीक्षेत असलेले तेवीस जणांनी तेथून पळ काढला. विशेष म्हणजे यापैकीच काल पाच जण पाॅझिटिव्ह सापडले आहेत.

तेवीस जणांना कुणाच्या परवानगीने सोडण्यात आले हे  विलगीकरण कक्षातून बाहेर आल्यानंतर गावातील अनेकांच्या संपर्कात आले असल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून हा प्रकार खूप गंभीर असून याची चौकशी करुन संबंधीतांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष अॅड प्रफुल्ल जाधव व अॅड जमीर शेख यांनी केली असून या विषयी नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
सोनईत पोलिस बंदोबस्त वाढवून ‘त्या’ गल्लीतील लहान रस्ते पत्रे ठोकून सील करण्यात आले आहे. शनिशिंगणापुर ग्रामपंचायतीने पाॅझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या वस्तीवर औषध फवारणी करुन सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरु केल्याचे सरपंच बाळासाहेब बानकर यांनी सांगितले.आज दिवसभरात संपर्कातील स्राव घेणार असल्याचे डाॅ.अभिराज सुर्यवंशी यांनी सांगितले.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सर्व विभागातील संबंधिताची कान उघाडणी करुन सतर्कता बाबत सूचना केली आहे.
रात्रीतून घरवापसी..
मंगळवार (ता.१४) रोजी विलगीकरण कक्षातून प्रशासनास न विचरता घरी गेलेल्या संशयित रुग्णास ग्रामपंचायत पदाधिका-यांनी काल रात्री उशिरा पुन्हा मुळा संस्थेच्या विलगीकरण कक्षात नेऊन घातले आहे. या गोलमालची ग्रामस्थात चर्चा आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here